परंतु मुहंमद कांहींहि सांगोत, कुरेशांचें शेपूट वांकडेंच असे. मुहंमदांचें सारें सांगणें पालथ्या घडयावरचें पाणी होई. ते परमेश्वराच्या खुणा पहात ना, ईश्वरी संदेश ऐकत ना. डोळे असून आंधळे व कान असून बहिरे ते झाले. पूर्वीच्या दुष्ट रुढी, वाईट रीतिरिवाज सोडायला ते तयार होत ना. ते मुहमदांचे कट्टे शत्रु बनले. ते म्हणाले, 'एक तूं तरी मरशील, मातींत मिळशील. नाहीं तर आम्ही तरी मरुं, जमीनदोस्त होऊं. परंतु तुझा पिच्छा पुरविल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. तुझा अधार्मिक प्रचार बंद करायला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. ध्यानांत धर.'

असे दिवस जात होते. मक्केंतील जीवन फार अशांत व भयाण झालें होतें. त्यांच्या अनुयायांचे जे छळ होत होते ते नाहीं कमी करतां येणार ? नाहीं का हे विरोध मिटवतां येणार ? एकेश्वरी धर्माचा परंपरागत धर्माशीं समन्वय नाहीं का करतां येणार ? मक्केंतील हीं भांडणें कमी होऊन गुण्यागोविंदानें नाहीं का राहतां येणार ? असे का विचार पैगंबरांच्या मनांत या वेळेस खेळत होते ? एके दिवशीं काबाजवळ तन्मय होऊन कुराणांतील त्रेपन्नाव्या सूरे नजममधील भाग मुहंमद म्हणत होते. 'अल-लात, अलउज्जा, मनात् यांच्याविषयीं काय ?' जवळच एक मूर्तिपूजक होता. तो मोठयानें म्हणाला, 'त्या परमेश्वराच्या कन्या. त्याहि ईश्वराजवळ भक्तांसाठीं रदबदली करतील.' जुन्या धर्मांतील या तीन चंद्रदेवता. काबाच्या मंदिरांत यांच्या मूर्ति होत्या. अल्ला त-आला म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या त्या मुली असें मानीत, 'या देवतांचें   काय ?' असें मुहंमद म्हणत आहेत तोंच तो मूर्तिपूजक म्हणाला, 'त्याहि देवकन्या. त्या ख-या आहेत.' इतर लोकांस, आसपास जे होते त्यांना, वाटलें कीं कुराणांतीलच हे शब्द आहेत. या देवतांना कुराण मान्यता देत आहे. कुरेश आनंदले. कोणी म्हणतात कीं मुहंमदांचा हा तडजोडीचा प्रयत्न असावा. त्या विचारांच्या तीव्रतेंत असतांना 'त्याहि देवता आहेत.' असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. 'त्या देवतांना मान द्या. ईश्वराजवळ तुमच्यासाठीं क्षमेची रदबदली त्या करतील. म्हणून त्या परमेश्वरासमोर नमा, लवा. त्याची सेवा करा.' आणि जमलेले तमाम सारे लोक लवले, प्रणाम करते झाले. सर्वांना बरें वाटलें. तडजोड जणुं झाली. मक्केचा द्वितीय धर्म झाला. परंतु मुहंमदांच्या चित्ताला चूकचूक लागली. नाहीं, या परमेश्वराच्या कन्या नाहींत. तो परमेश्वर कोणाचा मुलगा नाहीं, त्यालाहि मुलेंमुली नाहींत. असत्यावर मुहंमद कसे स्थिर होणार ? सत्य असत्याशीं तडजोड कशी करील ? जें नाहींच तें आहे असें कसें म्हणावें ? मुहंमदांनीं पुन्हां या पूर्वविधानाचा निषेध केला व म्हणाले, 'या देवता नाहींत. हीं तीन पोकळ नांवें आहेत. तुम्हीं व तुमच्या पूर्वजांनी तीं शोधून काढलीं.'

मुहंमदांच्या मनांत तडजोड करावी असें प्रथम असेलहि कदाचित्, परंतु असा विचार मनांत आला म्हणून का मुहंमद हिणकस ठरतात ? ख्रिश्चन चरित्रकार मुहंमदांचा अध:पात, घसरले मुहंमद, घाबरले वगैरे....या गोष्टीसंबंधीं लिहितात. मुहंमद क्षणभर परम सत्यापासून जरा खालीं आले तरी ते कां खालीं आले ? त्यांच्या अनुयायांचे अपार हाल होत होते. मूर्तिपूजेविरुध्द मुहंमद झगडत होते. यश येत नव्हतें. छळ पाहून त्यांचें दयार्द्र मन दु:खी होई. आणि म्हणून करावी थोडी तडजोड, असें आलेंहि असेल त्यांच्या मनांत. परंतु सा-या जीवनांत ही पहिली व अखेरीचीच तडजोड ! याप्रसंगांनें मुहंमद हिणकस न दिसतां अधिकच उदात्त दिसतात. अनुयायांच्या छळानें क्षणभर कसे खालीं येतात, परंतु पुन्हां धैर्यानें उभें राहून, 'नाहीं, त्या देवता नाहींत. मला मोह पडला, सैतानानें मला क्षणभर भूल पाडली.' असें ते जाहीर करते झाले. सत्यासत्याचा हा केवढा झगडा ! क्षणभर डोकावलेलें असत्य त्यांनीं साफ उडवून दिलें. पुन्हां स्वत:ला व स्वत:च्या अनुयायांना आगींत घालण्यासाठीं ते उभे राहिले. किती झालें तरी मुहंमद मर्त्य मनुष्यच होते. ते कांहीं ईश्वर नव्हते. ते स्वत:ला साधा मर्त्य मानवच म्हणत. मुहंमदांचें जीवन मानवी आहे. आणि त्या छळामुळें क्षणभर झालेली जी ही चलबिचल तिच्याविषयीं पुढें ते कितीदां तरी बोलत. आपल्या प्रवचनांतून सांगत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel