मक्केंत केव्हां वादळ सुरु होईल नेम नव्हता. घरांना कुलुपें लागत होतीं. सारे गेले. अलि, अबुबकर व मुहंमद तिघेच आतां राहिले. मुहंमद निसटून जातील, अशी कुरेशांना भीति वाटली. कुरेशांची एक सभा भरली. इतरहि घराण्यांचे व जमातींचे मक्केंतील प्रमुख लोक तेथें बोलावण्यांत आले होते. सभा जोरांत चालली. प्रक्षुब्ध होतें वातावरण. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असें म्हणूं लागले.

"मुहंमदांस येथून हाकलून द्यावें.' कोणी म्हणालें.

"त्याला मरेतों तुरुंगात ठेवावें.' दुसरे म्हणाले.

"त्याचा खून करावा.' आणखी कांहींनीं सुचवलें.

अनेक सूचना येऊं लागल्या. एकानें खून केला तर त्याचें सारें कुटुंब व तो यांच्याबरोबर हाशिमांची व मुत्तलिबाची सूडाची लढायी सुरु होईल. तेव्हा एकटयानें खून करणें हें बरें नाही. 'मी युक्ति सुचवितों' अबुजहल म्हणाला.

"अबुजहल म्हणजे अबुल हिकम-अकलेचा बाप. सांगा तुमची युक्ति सांगा.' लोक म्हणाले.

"निरनिराळया कुटूंबांतून मारेकरी घ्यावे. त्यांनी एकदम मुहंमदांच्या अंगांत तरवारी खुपसाव्या. म्हणजे खुनाची जबाबदारी त्या सर्वांवर येईल. मुहंमदांच्या नातलगांना या सर्वांच्या घराण्याशीं मग सूडाची लढाई करावी लागेल. तशी ते करणार नाहींत. त्यांची हिम्मत होणार नाही.'

"वा! असेंच करावें.' सारे म्हणाले.

अबुल हिकम याला अबु जहल हें नांव मुहंमदांनी दिलें होतें. अबुजहल म्हणजे अज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप नसून हा मनुष्य अज्ञानाचा बाप आहे, असें मुहंमद म्हणत. महाकवि सनाई म्हणतो,

"अहमद-इ-मुर्सल निशिस्त कैरवा दारद खिरद.'
"दिल असीर-इ-सीरत-इ-बू-जहले-इ-काफिर दाश्तन.'

तुमच्यामध्यें पैगंबर बसले असतां तुमची बुध्दि तुमच्या हृदयाला अश्रध्दाळु अबुजहलच्या गुणाचें गुलाम होऊ देणार नाहीं.

असो. त्या रात्री मुहंमदांच्या घराभोंवतीं मारेकरी निरनिराळया स्थानीं बसले. मुहंमद पहाटे तरी बाहेर येतील, अशी त्यांना आशा होती. मधूनमधून ते खिडकींतून डोकावत. परंतु मुहंमद कधींच खिडकींतून पळून गेले होते ! अली मुहंमदांच्या बिछान्यावर पडून राहिला होता. मुहंमदांनीं आपलें हिरवें वस्त्र त्यांच्या अंगावर घातलें होतें. मुहंमदच झोपले आहेत, असें मधूनमधून डोकावणा-या मारेक-यांस वाटत होतें. मुहंमद तेथून निसटले. ते अबुबकरच्या घरीं गेले. आणि दोघे मक्का सोडून रात्रीं बाहेर पडलें. जन्मभूमि सोडून बाहेर पडले. सौर पर्वतावरील गुहेंत दोघे कांही दिवस लपून राहिले. हा पर्वत मक्केच्या दक्षिणेस आहे. मुहंमद निसटले, हें जेव्हां कुरेशांना कळलें तेव्हां त्यांच्या संतापास सीमा राहिली नाहीं. ते चवताळले. पाठलागासाठीं घोडेस्वार दौडले. मुहंमदांच्या डोक्यासाठी शंभर उंटांचें बक्षिस जाहीर करण्यांत आलें ! एकदां तर पाठलाग करणारे गुहेच्या अगदीं जवळ आले होते.

"ते येणार. आपण सांपडणार. आपण दोघेच.' असें अबुबकर घाबरुन म्हणाले.

"दोघे कां ? आपण तिघे आहोंत. तिसरा परमेश्वर आहे.' मुहंमद शांत श्रध्देनें म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel