अरबांच्या उदारतेचा प्रतिनिधी हातिम !

अरबी आतिथ्यास सीमा नसे. जवळ असेल तें सारें पाहुण्यांसाठी ठेवायची अरबी नीति होती. आतिथ्यांत उणीव उरत असेल तर दूध देणारी उरलेली शेवटची उंटीणहि तो मारी व रसोयी करी. हातिमताईच्या गोष्टी जगप्रसिध्द आहेत. ताई कुळांतील तो हातिम अति शूर अति उदार होता. तो कविहि होता. त्याचें जीवनच काव्य होतें. आतिथ्याचा तो आदर्श होता. एकदा मोठा दुष्काळ होता. हातिमहि अन्नान्नदशेला पोचला होता. एकदां सबंध दिवसांत त्याच्या कुटुंबातील मुलांमाणसांच्या पोटांत कांहीं अन्न गेलें नव्हतें. रात्रीच्या वेळेस गोष्टी सांगून त्यानें मुलांना रमवलें. तीं बाळें झोपीं गेली. गोष्टी सांगण्यांत अरबांची बरोबरी कोणी करूं शकणार नाहीं! मुलें निजल्यावर पत्नीनें सुध्दा भूक विसरून जावें म्हणून तिच्याशी तो गोष्टी विनोद करीत होता. इतक्यांत तंबूजवळ कोणीतरी आलें.

''कोण आहे?''

''मी तुमचा शेजारी. मुलांना आज खायला कांहींहि मिळालें नाही. लांडग्यांप्रमाणें वखवखलीं आहेत. तुमच्याजवळ मदत मागायला आलों आहे.''

''तुझीं मुलें घेऊन ये.'' हातिम म्हणाला.
तो मनुष्य गेला.

बायकोनें विचारलें, ''काय देणार, काय करणार?''

''थांब, गडबड नको करूं.'' तो म्हणाला.

''स्वतःची मुलें उपाशीं निजवलींत. दुस-यांना काय देणार?''

''बघ आतां.''

असे म्हणून हातिम आपला घोडा घेऊन आला. तो घोजा जातिवंत म्हणून नामांकित होता. अति चपल व अति सुंदर. त्या घोडयावर हातिमचें अति प्रेम. स्वतःच्या मुलांबाळांसाठी तो घोडा त्यानें मारला नाहीं. परंतु आतां त्यानें घोडा मारला. रस्ता तयार झाला. शेजारी, त्याची पत्नी, त्याचीं मुलें सारी जेवलीं.

''आपल्या तळावरचे सारेच उपाशी आहेत. त्यांनाहि बोलवा.'' तो म्हणाला. इतरांनांहि बोलावलें. सकाळी घोडयाची फत्तच् हाडें शिल्लक होती! हातिमनें सर्वांना जेऊं घातलें. परंतु त्यानें एक घांसहि घेतला नाही. अंगरख्यांत लपेटून तंबूच्या एका कोप-यात तो बसला होता.

इस्लामपूर्व अरबांचा हातिम हा परमोच्च आदर्श होता. तो युध्दंत शूर होता. परंतु वैरानें औदार्याला तो नष्ट करीत नसे. दुस-याचा प्राण न घेण्याची त्यानें शपथ घेतली होती. प्राणांतिक घाव त्यानें कधीं घातला नाहीं. तो अति विनयी असे तरी सदैव विजयी होई. तो पुष्कळ लुटून आणी व राजाप्रमाणें सर्वांस वांटून देई. औदार्यामुळें व स्वतःच्या वचनपालनामुळें त्याच्यावर कधीं संकटें येत. परंतु तो तत्त्वच्युत झाला नाहीं. कोणी कांही मागितलें तरनाहीं म्हणायचें नाहीं असा त्याचा नियम असे! एकदा एका द्वंद्वयुध्दंत प्रतिस्पर्ध्यास त्यानें निःशस्त्र केलें. तो वैरी म्हणाला, ''हातिम, तुझा भाला मला दे.'' हातिमनें भाला फेंकला. स्वतः निःशस्त्र होऊन तो उभा राहिला. परंतु तो प्रतिस्पर्धीहि तसाच उदर व दिलदार होता म्हणून बरें. नाहीं तर हातिम मरता. हातिमचे वणि-वृत्ति व्यवहारी मित्र त्याच्यावर रागावले. हातिम म्हणाला, ''त्यांने देणगी मागितली. ती का मी नाकारू?'' जे कैदी गुलाम होत त्यांची खंडणी तो भरी व त्यांना मुत्तच् करी! एकदां हातिम प्रवासांत होता. खंडणी भरण्याची साधनें त्याच्याजवळ नव्हतीं. एका कैद्यानें 'मुक्त करा' प्रार्थना केली. त्या गुलामाच्या धन्याजवळ हातिम कैदी म्हणून राहिला, तो गुलाम मुक्त झाला! पुढें हातिमच्या नातलगांनी खंडणी पाठविली व तो सुटला.

आणि असा हा शूर, दिलदार, उदार हातिम कविहि होता. अरबी गुणांचा पेला त्याच्या जीवनांत कांठोकांठ भरला होता. त्याच्या काव्यंतहि त्याच्या जीवनाची उदात्तता दिसते. तारुण्यांत तो काव्याचा फार भोत्तच होता. कवींचें आदरातिथ्य करी. एकदां आजोबानें या उधळया नातवास उंट चारायला ठेवलें. उंटांचे कळप चारीत हातिम बसला होता. आणि एक काफिला जात होता. त्यांत तीन कवि होते. ते अल्-हिराच्या राजाकडे जात होते. हातिम त्या कवींना म्हणाला, ''येथें थांबा, विश्रांति घ्या.'' त्यानें प्रत्येकासाठीं एकेक उंट मारला. एकच उंट पुरे झाला असता, परंतु आतिथ्य व औदार्य दिसावें म्हणून तीन मारले! ते तिघे हातिमची व त्याच्या कुळाची कीर्ति काव्यांत गाऊं लागले. तें स्तुतिस्तोत्र ऐकून, कुळाच्या गौरवाचें ते महागान ऐकून हातिमला कृतार्थ वाटलें. त्यानें त्या प्रत्येकाला शंभर शंभर उंट दिले! आजोबा आले तो उंट नाहींत !
''कोठें आहेत उंट?''

''आजोबा, तुमच्या कुळाभोवतीं सदैव कीर्तिवलय चमकत रहावें म्हणून ते उंट मीं दिले. आपल्या कुळाच्या मस्तकासाठी कीर्तीचा शाश्वत मुकुट घेऊन त्याचा मोबदला म्हणून ते उंट मीं दिले. कायम टिकणारा मुकुट! आपल्या कुळाचें तें गुणगान सर्व अरबस्थानभर जाईल. सर्वांच्या ओठांवर तीं गाणीं नाचतील!''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel