लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ते ६ जून १९६४ पासून ११ जानेवारी १९६६ ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत जवळपास १८ महिने भारताचे पंतप्रधान राहिले. या पदावरील त्यांचे कार्य अद्वितीय राहिले.
जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान पदावर असतानाच २७ मे १९६४ रोजी मृत्यू झाल्यानंतर चांगल्या चारित्र्यामुळे शास्त्रीजींना १९६४ मध्ये देशाचे पंतप्रधान बनवण्यात आले. ९ जून १९६४ रोजी त्यांनी पंतप्रधान पदाचा स्वीकार केला.
त्यांच्या शासनकाळात १९६५ चे भारत - पाक युद्ध सुरू झाले. याच्या तीन वर्षे अगोदर भारत चीनशी युद्धात पराभूत झालेला होता. शास्त्रीजींनी अनपेक्षितपणे या युद्धाच्या वेळी नेहरूंच्या तुलनेत देशाला उत्तम नेतृत्व प्रदान केले आणि पाकिस्तानला उत्तम शह दिला. पाकिस्तानने स्वप्नात देखील ही कल्पना केली नव्हती.
ताश्कंद मध्ये पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष अयूब खान याच्यासोबत युद्ध समाप्त करण्याच्या तहावर स्वाक्षरी केल्यानंतर ११ जानेवारी १९६६ च्या रात्री त्यांना रहस्यमय परिस्थितीत मृत्यू आला.
त्यांचा साधेपणा, देशभक्ती आणि इमानदारी यांच्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.