त्यानंतर किंवा त्याच्या मागेपुढे कांही काळाने लिहिलेला सातवा खंड होय . हा मज्झिमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत, निदानवग्गसंयुत्तांत (६।१) आणि महावग्गाच्या आरंभीं सापडतो. ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे बुध्दाने धर्मोपदेशाला सुरवात केली, हें दाखवून देण्यासाठी खंड रचला गेला. मैत्री, करूणा, मुदिता आणि उपेक्षा या चार उदात्त मनोवृत्तींवर हे रूपक आहे असें मी बुध्द धर्म आणि संघ या पुस्तकांतील पहिल्या व्याख्यानांत दाखवून दिलेंच आहे.

यानंतर चौथा तीन प्रसादांचा खंड . त्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त ३८) आणि मज्झिमनिकायांतील मागन्दियसुत्तांत (नं. ७५) आला आहे. पहिल्या ठिकाणीं, मी पित्याच्या घरीं असताना मला राहण्यासाठी तीन प्रसाद होते. असा उल्लेख आहे पण दुसर्‍यांत, तरूणपणीं मी तीन प्रसादांत राहत होतों असा मजकूर असून पित्याचा उल्लेख नाही. शाक्य राजे वज्जींएवढे संपन्न नव्हतेच, आणि वज्जींचे तरूण कुमार देखील अशा रीतीने चैनींत राहत होते याबद्दल कोठेच पुरावा सापडत नाही. याच्या उलट, ते अत्यंत साधेपणाने वागत व चैनीची मुळीच पर्वा करीत नसत, असें वर्णन ओप्पमसंयुत्तांत (वग्ग १, सुत्त ५) सापडतें. भगवान म्हणतो, ''भिक्षुहो, सध्या लिच्छवी लाकडाच्या ओंडक्याच्या उशा करून राहतात, आणि मोठया सावधगिरीने आणि उत्साहाने कवाईत शिकतात. यामुळे मगधाच्या अजातशत्रू राजाला त्यांच्यावर हल्ला करतां येत नाही. परंतु भविष्यकाळीं लिच्छवी सुकुमार होतील, आणि त्यांचे हातपाय कोमल बनतील. ते मऊ बिछान्यावर कापसाच्या उशा घेऊन निजतील आणि तेव्हा अजातशत्रू राज त्यांच्यावर हल्ला करण्यास समर्थ होईल.

वज्जींसारखे संपन्न गणराजे जर इतक्या सावधानपणें वागत तर त्यांच्या मानाने बरेच गरीब असलेले शाक्य राजे मोठमोठाल्या प्रासादांत चैनींत राहत असत हें संभवतच नाही. जर खुद्द शुध्दोदनालाच शेती करावी लागत असे, तर आपल्या मुलाला तो तीन प्रासाद कसे बांधुन देईल? तेव्हा ही प्रासादांची कल्पना बुध्दाच्या चरित्रांत मागाहून शिरली यात शंका राहत नाही. ती महापदान सुत्तावरून घेतली किंवा स्वंतत्रपणे एखाद्या भाविकाने बुध्दचरित्रांत दाखल केली, हें सांगतां येणें शक्य नाही.

वर दिलेला सहावा खंड आणि निदानवग्गसंयुत्ताचीं नं. ४ ते ६ सुत्तें तंतोतंत एकच आहेत. यावरून असे दिसतें की, या महापदान सुत्तावरूनच तीं सुत्तें घेतलीं असावींत. गोतम बुध्दाच्या पूर्वीचे सहाही बुध्द विचार करीत असतांना त्यांनी ही प्रतीत्यसमुत्पादाची कारणपंरपंरा जशी सापडली, तशीच ती गोतमाला देखील बोधिसत्त्वावस्थेंत असतांनाच सापडली, असें निदानवग्गसंयुक्ताच्या दहाव्या सुत्तांत वर्णिलें आहें. परंतु महावग्गात बुध्द झाल्यानंतर गोतमाने ही कारणपरंपरा मनांत आणली असा आरंभींच उल्लेख आहे. हा प्रतीत्यसमुत्पाद गोतम बुध्दाच्या परिनिर्वानंतर एक दोन शतकांनी लिहीला असावा आणि त्याला महत्त्व आणण्यासाठी पूर्वीच्या बुध्दाच्या चरित्रांत तो दाखल केला गेला असावा. होतां खुद्द बुध्दाच्या चरित्रांत देखील त्याला विशेष महत्त्व देण्यात आलें. याचा परिणाम एवढाच झाला की, चार आर्यसत्यांचें साधें तत्त्वज्ञान मागें पडून या गहन तत्तवज्ञानाला नसतेंच महत्त्व आलें.

उद्यानयात्रेचा पाचवा खंड त्रिपिटक वाड:मयांत गोतम बुध्दाच्या चरित्रांत मुळीच घालण्यांत आला नाही. तो ललितविस्तर, बुध्दचरित्र आणि जातकाची निदानकथा यांत जशाचा तसा किंवा थोडीबहुत अतिशयोक्ति करून घेण्यांत आला. या शेवटल्या प्रकरणांत तर,''ततो बोधिसत्तो सांरथिं सम्म को नाम एसो पुरिसो केसा पिस्स न यथा अञ्ञेसं ति महापदाने आगतनयेन पुच्छित्वा' असें म्हटलें आहे. त्यावरून या सर्व ग्रन्थकारांनी हा मजकूर महापदानसुत्तावरून घेतला असें सिध्द होतें.

पहिल्या खंडांत सांगितल्याप्रमाणें गोतम बुध्दाचे अग्र श्रावक वगैरेचीं नांवें या सुत्ताच्या प्रस्तावनेंत दिलींच आहेत. गोतम बुध्द क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या बापाची राजधानी कपिलवस्तु होती असें म्हटलें आहे. याशिवाय त्याचें गोत्र गोतम ठरविलें आहे. याची चर्चा चौथ्या प्रकरणांत केली असून शुध्दोदन शाक्य कपिलवस्तूंत कधीच राहत नव्हता हें सिध्द केलेंच आहे. शाक्यांचें गोत्र आदित्य होंतें आणि त्यांना शाक्य या नांवानेच विशेष ओळखत असत. तसें नसतें तर बुध्द भिक्षूंना शाक्यपुत्रीय श्रमण ही संज्ञा मिळली नसती. बुध्दाचें गोतम गोत्र असतें तर त्यांना गोतम किंवा गोतमक श्रमण म्हणण्यांत आलें असतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel