विपस्सी भगवंताने आपल्या मनांतील विचार तीनदा प्रगट केला आणि ब्रह्मदेवाने तीनदा भगवताला तशीच विनंती केली. तेव्हा भगवंताने ब्रह्मदेवाची विनंती जाणून आणि प्राण्यावरील दयेमुळे, बुध्द नेत्राने जगाचें अवलोकन केलें आणि ज्यांचे डोळे धुळीने थोडे भरले आहेत, ज्यांचे फार भरले आहेत, तीक्ष्णेंद्रियांचे, मृदु इंद्रियांचे, चांगल्या आकाराचे, वाईट आकाराचे, समजावून देण्यास सोपे, समजावून देण्यास कठीण; आणि काही परलोकांचे व वाईंट गोष्टींचें भय बाळगणारे, असे प्राणी त्याला दिसले. ज्याप्रमाणें कमलांनी भरलेल्या सरोवरांत कांही कमलें पाण्याच्या आतच बुडून राहतात, कांही पाण्याच्या सपाटीवर येतात, आणि कांही पाण्याहून वर उगवलेलीं असतात, पाण्याचा त्यांना स्पर्श होत नाही. तशा प्रकारें विपस्सी भगवंताने भिन्नभिन्न प्रकारचे प्राणी पाहिले.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताच्या मनातील हा विचार जाणून ब्रह्मदेवाने पुढील गाथा म्हटल्या-

''शैलावर, पर्वताच्या मस्तकावर उभा राहून ज्याप्रमाणें सभोवारच्या लोकांकडे पाहावे, त्याप्रमाणें हे सुमेध, धर्ममय प्रासादावर चढून समन्तात पाहणारा असा तूं शोकरहित होत्साता जन्म आणि जरा यांनी पीडीलेल्या जनतेकडे पहा! ॥

''वीरा, उठ. तूं संग्राम जिंकला आहेस. तूं ऋणमुक्त सार्थवाह आहेस. अतएव जगात संचार कर॥
''भगवन् धर्मापदेश कर, जाणणारे असतीलच।''

आणि भिक्षुहो, अर्हन् सम्यक् संबुध्द विपस्सी भगवंताने ब्रह्मदेवाला गाथांनी उत्तर दिलें.

''त्यांच्याकरिता अमरत्वाचीं द्वारें उघडलीं आहेत. त्यांस ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी भाव धरावा॥

''उपद्रव होईल म्हणून मी लोकांना, हे ब्रह्मदेवा, श्रेष्ठ प्रणीत धर्म उपदेशिला नाही॥''

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताने धर्मोपदेशक करण्यांचे वचन दिलें, असे जाणून तो महाब्रह्मा भगवंताला अभिवादन आणि प्रदक्षिणा करून, तेथेच अंतर्धान पावला.

ह्या सात खंडात तिसरा खंड पहिल्याने रचण्यांत आला असावा कां की तो त्रिपिटकामधील सर्वात प्राचीन सुत्तनिपात ग्रथांतील सेलसुत्तांत सापडतो. हेंच सुत्त मज्झिमनिकायांत (नं ९२) आलें आहे. त्यापूर्वीच्या (नं ९१) ब्रह्मयुसत्तांत आणि दीघनिकायांतील अंबट्टसुत्तातही याचा उल्लेख आला आहे. बुध्दकालीन ब्राह्मण लोकांत ह्या लक्षणांचें फार महत्व समजलें जात असे. तेव्हा बुध्दाच्या शरीरावर हीं सर्व लक्षणें होतीं असे दाखवून देण्याच्या उद्देशाने बुध्दानंतर एक दोन शतकांनी हीं सुत्तें रचण्यांत आलीं असावीं, आणि त्यानंतर ह्या महापदान सुत्तांत ती दाखल केलीं असावीं. गोतम बोधिसत्व बुध्द झाल्यानंतर ब्राह्मण पंडीत त्याचे लक्षणें पहात. परंतु ह्या सुत्तांत विपस्सी कुमाराचीं लक्षणें त्याच्या जन्मानंतर लवकरच पाहंण्यांत आलीं असें दर्शविलें आहे आणि त्यामुळे एक मोठी विसंगति उत्पन्न झाली आहे. ती ही की, त्यास चाळीस दांत आहेत, ते सरळ आहेत, त्यांच्यांत विवरें नाहीत आणि त्याच्या दाढा शुभ्र पांढर्‍या आहेत., ही चार लक्षणे त्यात राहून गेलीं. जन्मल्याबरोबर मुलाला दांत नसतात, याची आठवण या सुत्तकाराला राहिली नाही!

त्यानंतर दुसरा खंड तयार करण्यात आला असावा. त्यांत जे स्वभावनियम सांगितले आहेत ते मज्झिमनिकायांतील अच्छरियअब्भुतधम्मसुत्तांत (नं. १२३) सापडतात. बोधिसत्वाला विशेष महत्व आणण्यासाठी ते रचले आहेत. त्यांपैकी त्याची माता उभी असतां प्रसवली, व तो सात दिवसांचा झाल्यावर परलोकवासी झाली, हे दोन खरोखरच घडून आले असावेत. बाकी सर्व कविकल्पना.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel