राजा.- तो भगवान् हयात असता, तर आम्ही त्याच्या दर्शनासाठी शंभर योजनें देखील प्रवास केला असत. पण आता परिनिर्वाण पावलेल्या देखील त्या भगवंताला आम्ही शरण जातों, त्याचप्रमाणें त्याच्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातों. आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक आहें असें समजा.

बुध्दाच्या हयातींत मथुरेंत बौध्द धर्माचा फारसा प्रसार झाला नव्हता, हें दुसर्‍या प्रकरणांत दिलेल्या अंगुत्तरनिकायांतील सुत्तावरून दिसून येईलच. (पृ. ३८). अवंतिपुत्र राजा बुध्दाच्या परिनिर्वाणानंतर गादीवर आला असावा. कां की, तो जर बुध्दाच्या हयातींत गादीवर असता, तर त्याला बुध्दासंबंधाने थोडीबहुत माहिती असतीच. वरील सुत्ताच्या शेवटल्या मजकुरावरून दिसून येईल की, बुध्द परिनिर्वाण पावला हें देखील त्याला माहीत नव्हतें. बुध्दाच्या हयातींत त्याचा बाप गादीवर होता व त्याला ब्राह्मणधर्माचें फार महत्त्व वाटत होतें आणि त्यामुळे बुध्दाकडे त्याने दुर्लक्ष केलें असावें. महाकात्यायन अवन्तीचा राहणारा, मूळचा ब्राह्मण आणि विंद्वान असल्याकारणाने या तरूण अवंतिपुत्र राजावर त्याचा प्रभाव पडला असें समजणें योग्य आहे.

श्रमणांना जातिभेद मोडतां आला नाही

वर दिलेल्या चार सुत्तांपैकी पहिला वसिष्ठसुत्तांत जातिभेद नैसर्गिक कसा नाही हें बुध्द भगवंताने स्पष्ट करून दाखविलें आहे. दुसर्‍या अस्सलायनसुत्तांत ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण झाले ही कल्पना खोडून काढली आहे. आणि तिसर्‍या एसुकारिसुत्तांत ब्राह्मणांना इतर वर्णांचीं कर्तव्याकर्तव्यें ठरविण्याचा अधिकार कसा पोचत नाही, हें सिध्द केलें आहे. चौथ्या माधुरसुत्तांत महाकात्यायनाने अर्थिक आणि नैतिक दृष्टया जातिभेदाची कल्पना कशी निरर्थक ठरते हें स्पष्ट केलें आहे. या सर्व सुत्तांचा नीट विचार केला असतां असें दिसून येतें की, बुध्दाला किंवा त्याच्या शिष्यांना जातिभेद मुळीच पसंत नव्हता, आणि तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली, परंतु हें कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचें होतें. ब्राह्मणांनी मध्यहिंदुस्थानांतच नव्हे, तर गोदावरीच्या तीरापर्यंत जातिभेदाची लागवड करून ठेवली होती. आणि तो सर्वस्वीं उपटून टाकणें कोणत्याही श्रमणसंघाला शक्य झालें नाही.

श्रमणांत जातिभेद नव्हता

तथापि ऋषिमुनींच्या परंपरेला अनुसरून श्रमणानीं आपल्या संघांत जातिभेदाला थारा दिला नाही. कोणत्याही जातीच्या मनुष्याला श्रमण होऊन एखाद्या श्रमण संघात दाखल होतां येत असे. हरिकेशिबल चांडाळ असून निर्ग्रंथाच्या (जैनांच्या) संघात होता हें नवव्या प्रकरणांत सांगितलेंच आहे.(पृ. ५३ पहा). बुध्दाच्या भिक्षुसंघात तर श्वपाक नांवाचा चांडाळ आणि सुनीत नांवाचा भंगी यांच्यासारखे अस्पृश्य वर्णांत जन्मलेले मोठे साधु होऊन गेलें. * आपल्या संघात जे मोठे गुण आहेत त्यांपैकी जातिभेदाला थारा नाही हा एक होय, असें बुध्द भगवंताचें म्हणणें आहे. भगवान् म्हणतो,'' भिक्षुहो, गंगा, यमुना, अचिरवती, सरभू (शरंयू), मही, या महानद्या महासमुद्राला मिळाल्या म्हणजे आपलीं नांवें टाकून महासमूद्र हें एकच नांव पावतात. त्याप्रमाणें क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे चार वर्ण तथागताच्या संघांत प्रवेश केल्यावर पूर्वीचीं नामगोत्रें टाकून 'शाक्यपुत्रीय श्रमण' या एकाच नामाभिधानाने ओळखले जातात.'' (अदान ५।५ व अंगुत्तरनिकाय, अट्ठकनिपात).
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel