८) भिक्षुहो, बोधिसत्त्व जन्मून सात दिवस झाल्यावर त्याची माता मरण पावते व तुषित देवलोकात जन्म घेते. असा हा स्वभावनियम आहे.
९) भिक्षुहो, ज्याप्रमाणए इतर स्त्रिया नवव्या किंवा दहाव्या महिन्यात प्रसूत होतात, तशी बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. बोधिसत्त्वाला दहा महिने परिपूर्ण झाल्यावरच ती प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.
१०) भिक्षुहो, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया बसल्या असता किंवा निजल्या असता प्रसूत होतात, त्याप्रमाणे बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. बोधिसत्त्वाला दहा महिने परिपूर्ण झाल्यावरच ती प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.
११) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा प्रथमत: त्याला देव घेतात आणि मग मनुष्य घेतात. असा हा स्वभावनियम आहे.
१२) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा जमिनीवर पडण्यापूर्वी चार देवपुत्र त्याला घेतात व मातेच्या पुढे ठेवून म्हणतात, ‘‘देवी, आनंद मान; महानुभाव पुत्र तुला झाला आहे.’’ असा हा स्वभावनियम आहे.
१३) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो, तेव्हा उदरोदक, श्लेष्मा, रुधिर अथवा इतर घाणीने लडबडलेला नसतो; शुद्ध आणि स्वच्छ असा बाहेर निघतो. भिक्षुहो, रेशमी वस्त्रावर बहुमूल्य मणि ठेवला तर तो ते वस्त्र घाण करीत नाही, किंवा ते वस्त्र त्या मण्याला मलिन करीत नाही, का तर दोन्ही शुद्ध असतात. त्याचप्रमाणे बोधिसत्त्व बाहेर निघतो तेव्हा शुद्ध असतो. असा हा स्वभावनियम आहे.
१४) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या कुशीतून बाहेर निघतो, तेव्हा अंतरिक्षांतून एक शीतल व दुसरी उष्ण अशा उदकधारा खाली येतात व बोधिसत्त्वाला व त्याच्या मातेला धुवून काढतात. असा हा स्वभावनियम आहे.
१५) भिक्षुहो, जन्मल्याबरोबर बोधिसत्त्व पायावर सरळ उभा राहून उत्तरेकडे सात पावले चालतो- त्या वेळी त्याच्यावर श्वतछत्र धरण्यात येते- आणि सर्व दिशांकडे पाहून तो गर्जतो, ‘‘मी जगात अग्रगामी आहे; ज्सेष्ठ आहे; श्रेष्ठ आहे; हा शेवटचा जन्म; आता पुनर्जन्म नाही.’’ असा हा स्वभावनियम आहे.
१६) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा देव, मार, ब्रह्मा (पुढील मजकूर कलम २ प्रमाणे)..

३)
भिक्षुहो, विपस्सी कुमार जन्मल्याबरोबर बंधुमा राजास कळविण्यात आले की, ‘‘महाराज, आपणाला पुत्र झाला आहे, त्याला महाराजांनी पाहावे.’’ भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सी कुमाराला पाहिले आणि ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून त्याची लक्षणे पाहावयास सांगितली.

ज्योतिषी म्हणाले, ‘‘महाराज, आनंदित व्हा; आपणाला महानुभाव पुत्र झाला आहे. आपल्या कुळात असा पुत्र झाला हे आपले मोठे भाग्य होय. हा कुमार बत्तीस महापुरुषलक्षणांनी युक्त आहे. अशा महापुरुषाच्या दोनच गति होतात, तिसरी होत नाही. तो जर गृहस्थाश्रमात राहिला तर धार्मिक धर्मराजा, चारी समुद्रांपर्यंत पृथ्वीचा मालक, राज्यात शांतता स्थापन करणारा, सात रत्नांनी समन्वित असा चक्रवर्ती राजा होतो. त्याची सात रत्ने ही- चक्ररत्न, हस्तिरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहपतिरत्न व सातवे परिणायकरण. त्याला हजाराच्या वर शूरवीर, शत्रुसेनेचे मर्दन करणारे असे पुत्र होतात. तो समुद्रापर्यंत ही पृथ्वी दण्डावाचून आणि शस्त्रावाचून धर्माने जिंकून राज्य करतो. परंतु जर त्याने प्रव्रज्या घेतली तर तो जगामध्ये अर्हन् सम्यक् संबुद्ध व अविद्यावरण दूर करणारा होतो.

महाराज, ती बत्तीस लक्षणे कोणती ती ऐका. (१) हा कुमार सुप्रतिष्ठितपाद आहे; (२) त्याच्या पादतलाखाली सहस्र आरे, नेमि व नाभि यांनी संपन्न व सर्वाकारपरिपूर्ण अषी चक्रे आहेत; (३) त्याच्या टाचा लांब आहेत; (४) बोटे लांब आहेत; (५) हातपाय मृदु व कोमल (६) जाळ्यासारखे आहेत; (७) पायाचे घोटे शंकूसारखे वर्तुळाकार; (८) हरिणाच्या जंघांसारख्या जंघा; (९) उभा राहून न वाकता हाताच्या तळव्यांनी त्याला आपल्या गुढग्यास स्पर्श करता येतो, ते चोळता येतात; (१०) त्याचे वस्त्रगुह्य कोशाने झाकले आहे; (११) त्याची कान्ति सोन्यासारखी; (१२) कातडी सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या शरीराला धूळ लागत नाही; (१३) त्याच्या रोमकूपात एकएकच केस उगवलेला आहे; (१४) त्याचे केस ऊध्वीग्र, निळे, अंजनवर्ण, कुरळे व उजव्या बाजूला वळलेले आहेत; (१५) त्यांची गात्रे सरळ आहेत; (१६) त्याच्या शरीराचे सात भाग भरीव आहेत; (१७) त्याच्या शरीराचा पुढला अर्धा भाग सिंहाच्या पुढल्या भागाप्रमाणे आहे; (१८) त्याच्या खांद्यावरील प्रदेश भरीव आहे; (१९) तो न्यग्रोध वृक्षाप्रमाणे वर्तुळाकार आहे; जितकी त्याची उंची तितका त्याचा परीघ आणि जितका परीघ तितकी उंची; (२०) त्याचे खांदे एकसारखे वळलेले आहेत; (२१) त्याची रसना उत्तम आहे; (२२) हनुवटी सिंहाच्या हनुवटीप्रमाणए आहे; (२३) त्याला चाळीस दात आहेत; (२४) ते सरळ आहेत; (२५)  ते निरंतर आहेत; (२६) ते पांढरे शुभ्र आहेत; (२७) त्याची जिव्हा लांब आहे; (२८) तो ब्रह्मस्वर असून करवीक पक्ष्याच्या स्वराप्रमाणे त्याचा आवाज मंजुळ आहे; (२९) त्याची बुबुळे निळी आहेत; (३०) गाईच्या पापण्यांप्रमाणे त्याच्या पापण्या आहेत; (३१) त्याच्या भुवयांमध्ये मऊ कापसाच्या तंतूप्रमाणए पांढरी लव उगवलेली आहे; (३२) त्याचे डोके उष्णीषाकार (म्हणजे मध्ये जरा उंच) आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel