‘लाइट ऑफ एशिया’चा परिणाम

त्यानंतर १८७९ साली एडविन आर्नाल्ड (Edwin Arnold) यांचा ‘लाइट ऑफ एशिया’ (Light of Asia) नावाचा प्रख्यात काव्यग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढेल, पण यज्ञयागांचा विध्वंस करून अंहिसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला, या समजुतीला दृढता येत चालली आणि ही कल्पना थोड्याबहुत प्रमाणाने अद्यापही प्रचलित आहे. या कल्पनेत कितपत तथ्य आहे हे पाहण्याच्या उद्देशाने बुद्धसमकालीन श्रमणांचे आणि खुद्द बुद्धाचे यज्ञयागासंबंधी काय म्हणणे होते, याचा विचार करणे योग्य वाटते.

हरिकेशिबलाची कथा

श्रमणपंथापैकी जैन आणि बौद्ध या दोन पंथाचेच तेवढे ग्रन्थ आजला उपलब्ध आहेत. त्यात जैनांच्या उत्तराध्ययनसूत्रात हरिकेशिबल यांची गोष्ट सापडते. तिचा सारांश असा –
हरिकेशिबल हा चाण्डालाचा (श्वापाकाचा) मुलगा होता. तो जैन भिक्षु होऊन मोठा तपस्वी झाला. कोणे एके समयी महिनाभर उपास करून पारण्याच्या दिवशी भिक्षाटन करीत असता तो का महायज्ञाच्या स्थानी पोहचला. मलिनवस्त्राच्छिदत त्याचे ते कृश शरीर पाहून याजक ब्राह्मणांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला तेथून जावयास सांगितले. तेथे तिंदुक वृक्षावर राहणारा यज्ञ गुप्त रूपाने हरिकेशिबलाच्या स्वराने त्या ब्राह्मणांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, तुम्ही केवळ शब्दाचा भार वाहणारे आहात, वेदाध्ययन करता, पण वेदांचा अर्थ तुम्हाला समजत नाही.” याप्रमाणे त्या भिक्षुने अध्यायक ब्राह्मणाचा उपमर्द केला असे मानून त्या ब्राह्मणांनी आपल्या तरुण कुमारांना त्याला मारहाण करावयास लावले. त्या कुमारांनी दांड्यांनी, छड्यांनी आणि चाबकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली. ते पाहून कौसलिक राजाची कन्या व पुरोहिताची स्त्री भद्रा यांनी त्यांचा निषेध केला. इतक्यात अनेक यक्षांनी येऊन या कुमारांना रक्तबंबाळ होईपर्यंत ठोकून काढले. त्यामुळे ब्राह्मण घाबरून गेले, आणि शेवटी त्यांनी हरिकेशिबलाची क्षमा मागून त्याला अनेक पदार्थांसह तांदळाचे उत्तम अन्न अर्पण केले.

ते अन्न ग्रहण करून हरिकेशिबल त्यांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, आग पेटवून पाण्याच्या योगाने बाह्य शुद्धि मिळविण्याच्या मागे का लागला आहे? ही तुमची बाह्य शुद्धि योग्य नाही, असे तत्त्वज्ञ म्हणतात.”

त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, “हे भिक्षु आम्ही याग कशा प्रकारचा करावा, आणि कर्माचा नाश कसा करावा?”

हरि.— सहा जीवकायांची* हिंसा न करता, असत्य भाषण आणि चोरी न करता, परिग्रह, स्त्रिया, मान आणि माया सोडून साधुलोक दान्तपणे वागतात. पाच संवरांनी  सवृत्त होऊन, जीविताची चाड न ठेवता देहाची आशा सोडून, ते देहाविषयी अनासक्त होतात व (अशा प्रकारे) श्रेष्ठ यज्ञ यजीत असतात.

ब्रा.—तुझा अग्नि कोणता? अग्निकुंड कोणते? श्रुचा कोणती? गोवर्‍या कोणत्या? समिधा कोणत्या? शांति कोणती? आणि कोणत्या होमविधेने तू यज्ञ करतोस?
हरि.—तपश्चर्या माझा अग्नि आहे; जीव अग्निकुंड, योग श्रुचा, शरीर गोवर्‍या, कर्म समिधा, संयम शांति; असा विधीने ऋषींनी वर्णिलेला यज्ञ मी करीत असतो.
ब्रा.—तुझा तलाव कोणता, शातीतीर्थ कोणते?
हरि.—धर्म हाच माझा तलाव व ब्रह्मचर्य शांतितीर्थ आहे. येथे स्नान करून विमल, विशुद्ध महर्षि उत्तम पदाला जातात.
याशिवाय यज्ञयागांचा निषेध करणारी याच उत्तराध्ययन सूत्राच्या 25 व्या अध्यायात दुसरी एक गाथा सापडते ती अशी—
पसुबंधा संब्वे या जठ्ठं च पावकम्मुणा।
न तं तायंति दुस्सीलं कम्माणि बलवंतिह।।
‘वेदांत पशुमारण सांगितले असून यजन पापकर्माने मिश्रित आहे. यज्ञ करणाऱयांची ती पापकर्मे त्यांचे रक्षण करू शकत नाहीत.
हरिकेशिबलाच्या कथेत यज्ञाचा तेवानिषेध केला आहे. पण या गाथेत यज्ञाचाच नव्हे, तर वेदांचाही निषेध स्पष्ट दिसतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*पृथ्वीकाय, आमकाय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकय आणि त्रसकाय असे सहा जीवभेद पृथ्वीपरमाण्यदिकात जीव आहे, असे जैन मानतात. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पतिवर्ग, त्रसकायात सर्व जंगम किंवा चर प्राण्यांचा समावेश होतो.
** पाच संवर म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांनाच योगसूत्रात यम म्हटले आहे. साधनपाद सूत्र 30 पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel