भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात-
सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।। (गणेशध्यानम्)
एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम्।। (गणेशप्रणामः)
देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः।। (गणेशप्रार्थना)
सुरवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेशमूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल असे म्हटले आहे. गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांचि विविधता दिसते. गणपती चतुर्भूज, द्बिभूज, षड्भूज अशा अनेक रूपात दिसतो. हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे रूप असते.
नृत्यरत बौद्धगणेश, मध्य तिबेट मधील चित्र - कालः पंधराव्या शतकाचा प्रथमार्ध
भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रन्थ तन्त्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तन्त्र- या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.
महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.
हेरम्ब-गणपती – हेरम्ब-गणपती तन्त्रसार- ग्रंथात उल्लेखित आहे.हे रूप पंचानन (पाचतोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेल्) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.
नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.
विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.
बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो.तो द्बादशभूज (बारहाती) आहे.त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.
इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणार्या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पहायला मिळतात - आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात अल्लेखित गणेशपत्नी - गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.