देवीपुराण –
शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
स्कंदपुराण -
स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.
स्कंपुराणाच्या ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणार्या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले. या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.
बृहद्धर्मपुराण –
बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले. पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.