श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जय विश्वंभरा विश्वेशा । विश्वपालका अविनाशा । तू पूर्ण करी माझी आशा । भवपाशा छेदूनिया ॥१॥
ब्रह्मा म्हणे ऋष्युत्तमा । अंगारकीचा ऐक महिमा । जीचे श्रवणमात्रे अधमा । गती उत्तमा पावते ॥२॥
अवंती नामे एक नगरी । आहे विख्यात अवनीवरी । भारद्वाजऋषि वस्ती करी । त्या नगरीभीतरी विख्यात ॥३॥
जो तपोधन जितेंद्रिय । नदीतटाकी ऋषिराय । तप करिता पराशरतनय । चमत्कार जाहला ॥४॥
नदीतीरी एक रमणी । चमके जैशी सौदामिनी । कुरंगाक्षी मानिनी । स्नानार्थ जीवनी प्रवेशली ॥५॥
करिता उदकी तिने स्नान । अवयव दिसती वस्त्रांतून । पीनोन्नतकुच जघन । उरू पीन कदलीपरी ॥६॥
ऋषीने अवलोकितांचि बाला । ह्रदयी पंचबाण खडतरला । तेणे वीर्य अधोगतीला । पावोनि इला प्रवेशले ॥७॥
तिचे उदरी ऋषिवीर्य पावता । अवनी मानी निजधन्यता । मग ती प्रसवली सुता । आरक्ता देही त्याचे ॥८॥
सप्तवर्षाम्चा जाहला बाळक । रूपस रक्तवर्णे सुरेख । मातेस म्हणे माझा जनक । कोठे वसे सांग गे ॥९॥
येरू तयास धरूनि हाती । भारद्वाजदर्शना गेली क्षिती । नमून त्याचे चरणाप्रती । सुहास्य वदने बोलत ॥१०॥
अवनी म्हणे प्राणेश्वरा । तव रेते हा आला उदरा । आजवर वाढवूनिया कुमरा । आता घरा येऊनि आले ॥११॥
ज्ञानदृष्टी आणोनि मना । मग ऋषी त्या निजनंदना । करिता जाहला मौजीबंधना । गणेशमंत्रे उपदेशिला ॥१२॥
भारद्वाज सांगे बाळकाशी । तुवा करावे दीर्घ तपाशी । प्रसन्न होता गणेश तुजशी । सुख पावसी क्षणमात्रे ॥१३॥
तो बाळ येऊनिया वनी । तपे तोषवी कैवल्यदानी । जो भक्तपालक अंकुशपाणी । भक्ताभिमानी दयाळू ॥१४॥
देहत्रयातीत नित्य अनंत । निराकृती आकारत । प्रगट झाला एकदंत । वरदहस्त उभारीतसे ॥१५॥
पाहोनिया वरदमूर्ती । घाबरला बालक चित्ती । नेत्रातून प्रेमबिंदू स्त्रवती । रोमांचित जाहला स्वशरीरी ॥१६॥
अष्टभावे सद्गद होउनी । मस्तक ठेवी गणेशचरणी । म्हणे बालकासि मोदकपाणी । माग मनी इच्छिसी ते ॥१७॥
येरू म्हणे देवाधिदेवा । अमृतपान लाभ द्यावा । त्वत्पदी अखंडभाव व्हावा । राहो विसावा त्वन्नामी ॥१८॥
माघकृष्णचतुर्ही चंद्रोदयेवेळी । तू भेटलासि दूर्वामाली । ही चतुर्थी करणार जनास भली । जोड असावी त्वत्पदी ॥१९॥
माझे नाम असावे मंगल । ऐसा ऐकता त्याचा बोल । कृपेने द्रवोन भक्तपाल । ना भी व्याल बोलतसे ॥२०॥
तू पावशील नाम मंगल । सुधा भक्षी बहुसाल । आरक्तपणे अंगार बोल । शेखी पावशील बालका ॥२१॥
जे करितील अंगारकी । ते पावतील माझे लोकी । सर्व कामना पूर्ण लौकिकी । पावोन सुखी होतील ते ॥२२॥
अंगारकी चतुर्थीचा महिमा । येथून विस्तारेल रे भौमा । अंगारकीची पुण्यगरिमा । कोण गणील मद्भक्ता ॥२३॥
अवंती नगरी तू नृप । होउनि सुख भोगिसी अमुप । ऐसे बोलता गणाधिप । सुख तयाशी अत्यंत पै ॥२४॥
ऐसा देऊनिया वर । अदृश्य जाहला लंबोदर । मंगलमूर्ती स्थापी अवनीकुमर । करोनि मंदिर कांचनाचे ॥२५॥
गणेशवरदप्रसादे । स्वर्गी राहोनिया प्रमोदे । अमृतपान करी स्वच्छंदे । मग नांदे अक्षयपदी ॥२६॥
ऐसा अंगारकीचा महिमा । तुज सांगितला पुरुषोत्तमा । पुढे ऐके कथा उत्तमा । संसारतमा नाशी जी ॥२७॥
स्त्रष्टा म्हणे सत्यवतीनंदना । एके दिनी मी शिवदर्शना । जावोनि नमिले गौरीरंजना । स्तुतिवचना अनुवादलो ॥२८॥
तव तेथे नारदमुनी । आला अमृतफळ घेउनी । ते शंभूसि अर्पूनी । पिनाकपाणी तोषविला ॥२९॥
ते फळ घेऊनिया हाती । शंकर पुसे मजप्रती । हे द्यावे कवणाप्रती । मग म्या तयासी सांगितले ॥३०॥
हे फळ दीजे स्कंदासी । ऐसे ऐकता वचनाशी । वटारोनि नयनाशी । गनेश मानसी क्षोभला ॥३१॥
गणपती येवोनि सत्यलोकाशी । धरोनिया विकटरूपाशी । भेडसाऊ लागला मजशी । पसरोनि मुखाशी तेधवा ॥३२॥
भक्षीन म्हणे मोदकपाणी । मी लागलो त्याचे चरणी । मग संतोषूनि कैवल्यदानी । अभयवचनी गौरवी मज ॥३३॥
विक्राळ पाहता त्याचे वदन । त्यासि हासला रोहिणीजीवन । तेणे क्षोभोनि वारणानन । शापवचन बोलिला ॥३४॥
गणेश म्हणे चंद्रा नष्टा । तुझे मुख पाहाता पापिष्टा । जन पावेल अतिकष्टा । अपयश वाटा तयासी ॥३५॥
ऐसे होता शापवचन । चंद्रे आच्छादिले आपले वदन । मग सकल देव येऊन । त्याणी गजानन तोषविला ॥३६॥
गणेश म्हणे मागा वर । मग बोलती सुरवर । शुद्ध करी का रोहिणीवर । कृपा अपार करोनिया ॥३७॥
ऐकोनि बोले दूर्वावंतस । असत्य करू आला मद्वचनास । परी वर्ज होईल एक दिवस । या इंदूस पाहावया ॥३८॥
माझे वरद चतुर्थीशी । न पाहावे याचे मुखाशी । इतर दिनी हा शशी । दर्शनासी शुद्ध असे ॥३९॥
ऐसा घेऊनिया वर । चंद्रासि म्हणती अदितीकुमर । मूढा तू आता तर । भजे लंबोदर निजभावे ॥४०॥
शक्रापासोनि नक्षत्रेश । एकाक्षर मंत्रोपदेश । घेऊनि गेला तपास । गंगा दक्षिणतटाकी ॥४१॥
तेथे करी शरीरशोषण । पाहोनि कळवळिला गजकर्ण । प्रसन्नचित्ती वरदान । देता जाहला चंद्रासी ॥४२॥
संकष्टिचतुर्थी व्रतदिवशी । माझी पूजा तवोदयशी । करोनि अर्घ्य देता तुजशी । तरीच व्रतासि पूर्णता ॥४३॥
द्वितीयेसि करी जो तुला नमन । तो नर होईल सुखसंपन्न । तू तपे तोषविले मजलागुन । म्हणोन भाळी धरितो तुज ॥४४॥
ऐसी वदोनि वरदवाणी । अदृश्य जाहला सृणीपाणी । शशांक सुखी तेथुनी । निजाश्रमी पावला ॥४५॥
कृतवीर्यपिता म्हणे कमलासना । दूर्वाच प्रिय का गजानना । हे कथिजे प्रसन्नमना । कृपा करोनि देववरिष्ठा ॥४६॥
कृतवीर्य पित्यास म्हणे कमलासन । दूर्वा माहात्म्य करी श्रवण । दक्षिणदेशामध्ये जाण । जांबनगर विख्यात पै ॥४७॥
तेथे सुलभनामा क्षत्रियवर । धर्मशील धनी मानी चतुर । सामुद्रानामे अतिसुंदर । भार्या त्यासी प्रियपात्र पै ॥४८॥
मधुसूदन नामे विप्रोत्तम । तेथे पातला भिक्षाकाम । वस्त्रदंडे मलिन परम । दारिद्रपने नेसला ॥४९॥
सुलभ पाहून तयाते । करिता जाहला उपहास्याते । ऐसे पाहता मधुस्दन त्याते । दे शापाते तेधवा ॥५०॥
मदोन्मत्त तू सुलभ । हलाकर्षी हो वृषभ । ऋषिशाप पावता सुलभ । सामुद्रा प्रिया क्रोधे वदे ॥५१॥
निर्दया शापिले माझे पतीसी । आता शापिते मी तुजसी । तू गर्दभ हो निश्चयेसी । विप्र तिसी शापी तदा ॥५२॥
तू असोनि स्त्री पापिण । मज शापिलेसि व्यर्थ जाण । तरी तू हो चांडाळिण । विण्मूत्र भक्षण करणारी ॥५३॥
मग ती जाहली चांडाळी । अमंगळपणे फिरू लागली । पर्जन्यामध्ये भिजली । थंडावली बहुसाल ॥५४॥
मेळऊनिया तृणभार । तिणे चेतविला वैश्वानर । त्यातून एक दुर्वांकुर । वातवेगे उडाला ॥५५॥
देवालयी लंबोदर । त्यावरी पडला दूर्वांकुर । तव तेथे पातले वृषभखर । परस्पर भांडती ॥५६॥
दोघे करिती युद्ध अद्भुत । चांडाळीचे उधळिले गवत । त्यातून दुर्वांकुर अकस्मात । गणेशावरी पडियेले ॥५७॥
तेणे तुष्टोन गजानन । मग पाठविले विमान । चांडाळी खर बलवर्धन । विमानी घालोनि चालविले ॥५८॥
ऐकोनि विमानाचा घंटानाद । येऊनि पाहती ब्रह्मवृंद । म्हणती यांचे पुण्यविशद । काय सांगा दूत हो ॥५९॥
आम्ही गणेशोपासक सदा । तपे भोगितो आपदा । परि न देखो गणेशपदा । स्मरणे सर्वदा सादर ॥६०॥
ऐकोनि त्यांचे वचन । गणेशदूत बोलती हास्यवदन । म्हणती दूर्वार्पण महिमान । तुम्हा लागोन नाही ठावे ॥६१॥
स्थावरनामे विख्यात नगर । तेथे कौंडिण्यनामे ऋषीश्वर । गणेशोपासक निरंतर । परम तीव्र तप ज्याचे ॥६२॥
आश्रयानामे गुणवती । गुणनिधान त्याची युवती । वंदोनिया पतिचरणाप्रती । विचारिती जाहली ते ॥६३॥
आश्रया म्हणे ऋषिवरा । दूर्वा प्रिय का लंबोदरा । हे मज सांगा प्राणेश्वरा । प्रियदारा म्हणोनिया ॥६४॥
ऐकोनिया प्रियावचन । कौंडिण्य सांगे आनंदोन । प्रिये दूर्वामहात्म्य तुजलागोन । सांग सांगतो श्रवण करी ॥६५॥
यम एके दिवसी स्वनगरी । परमानंदे उत्साह करी । देव मिळाले ते अवसरी । स्वकीय नारी समवेत ॥६६॥
सभा भरली घनदाट । सुरवरांचे बैसले थाट । अप्सरा नृत्य करिती सुभट । स्तुती भाट करिताती ॥६७॥
तिलोत्तमा नृत्य करी । पदर पडला भूमीवरी । पीनोन्नत कुचमंडल उरी । यम ते अवसरी अवलोकिले ॥६८॥
पाहाता तिचे कुचमंडळ । कामे जाहला उतावीळ । निर्लज्जपणे तत्काळ । धावोनि तीते आलिंगी ॥६९॥
करे मर्दोनि कुचद्वय । मुखचुंबन करिता निर्भय । अधोगती पावले वीर्य । महाकाय जाहला तेथे ॥७०॥
महादुःसह अनलासुर । तेणे मांडिला प्रळय थोर । सकळ पळाले सुरवर । त्याणी मुरहर आठविला ॥७१॥
धाव धाव गा श्रीहरी । अनलासुर प्रळय करी । त्याचा आता वध करी । जग पावते विलयाते ॥७२॥
ऐकोनि त्याची सद्गदवाणी । प्रगट होऊनि शार्ङ्गपाणी । म्हणे तुमचे संकटहरणी । मोदकपाणी समर्थ असे ॥७३॥
मग सकल देव समवेत । स्तवने तोषविला एकदंत । तेणे तुष्टला भगवंत । दर्शन देत तयाते ॥७४॥
विष्णुरूपी गजानन । बाळक वेष अवलंबून । सहस्त्रकोटी सुर्यदर्शन । दैदीप्यमान प्रगटला ॥७५॥
त्यासि करूनि नमस्कार । म्हणती तू कोणाचा कुमर । येरू म्हणे अनलासुर । त्याचा संहार करू आलो ॥७६॥
परस्पर म्हणती सकळ देव । न कळे याचे आम्हा लाघव । तो अनलासुरे घेतली धाव । सकळ देव पळाले ॥७७॥
असुर करी शब्द विक्राळ । तेणे दुमदुमिले निराळ । पृथिवी कापे चळचळ । ब्रह्मांडगोळ डळमळिला ॥७८॥
देव करिती हलकल्लोळ । बाळके मुख पसरोनि विशाळ । अगस्ती जेवी समुद्रजळ । तैसा तो खळ गिळियेला ॥७९॥
गणेशे गिळिला असुर । सुखी जाहले चराचर । देव करिती जयजयकार । पुष्पसंभार वर्षती ॥८०॥
ब्रह्मांडदहन करणार । गणेशे गिळिला असुर । तेणे शरीरी दाह थोर । होवोनि लंबोदर त्रासला ॥८१॥
अमृतमय शीत परम । पुलोमजानाथे दिधला सोम । तेणे भालचंद्र नाम उत्तम । जगामाजी मिरवले ॥८२॥
तथापि नोहे दाहशमन । कमल अर्पी कमलाजीवन । ठाईठाइ नागबंधन । करी गजानन निजांगी ॥८३॥
तथापि नोहे दाहशांती । मग ऋषिगण दूर्वा अर्पिती । अमृताची अगाध ख्याती । दाहशांती तेणे जाहली ॥८४॥
स्वस्थ जाहला गजवदन । मग बोले सुहास्यवदन । माझी पूजा तुम्ही येथून । दूर्वावाचोन करू नये ॥८५॥
दूर्वाविणे करिता पूजन । व्यर्थ त्याचे जाईल अर्चन । एकवीस अथवा एक जाण । दूर्वार्पण मज करा ॥८६॥
जो मज अर्पील दूर्वांकुर । त्याचे पुण्यास नाही पार । त्याचे माथा संसारभार । मी लंबोदर न ठेवी ॥८७॥
जो अर्पील दूर्वांकुर । त्याचा संसार करूनि सार । मुकी करीन दासी साचार । तोच प्रियकर मजलागी ॥८८॥
कौंडिण्य म्हणे गे गजगामिनी । दूर्वामहात्म्य कथिले तुजलागुनी । ऐकता आनंदली मानिनी । ऋषिलागुनी वंदन करी ॥८९॥
जयजयाजी विश्वपालका । दूर्वावतंसा विनायका । भक्तभवभयबाधाच्छेदका । रक्षी विनायका निजभक्ता ॥९०॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । सप्तदशोध्याय गोड हा ॥९१॥
अध्याय ॥१७॥ ओव्या ॥९१॥
अध्याय सतरावा समाप्त