॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॐ जयजयाजी विघ्नदमना ॥
आदिपुरुषा निरंजना । सर्वभूतस्था गजानना । पार्वतीनंदना सुखाब्धे ॥१॥
जयजय गणेशा विश्ववंद्या । आनंदकंदा विश्वाद्या । तुझेपासूनि सकलविद्या । प्राप्त सद्या त्वद्भक्ता ॥२॥
रजोगुणे कमलासन । सत्त्वगुणे तूचि जनार्दन । तमोगुणे ईशान । तेजोनिधान सूर्य तू ॥३॥
तुझे कृपेने सकल देव । निजपदी भोगिती राणीव । सप्रेम स्मरता तुझे नाव । सकल वैभव संसारी ॥४॥
वेदा अगम्य त्वन्महिमा । भक्ता सुलभ तू सर्वोत्तमा । आनंदसदना पूर्णकामा । मनविश्रामा जगद्गुरो ॥५॥
वर्णिता तुझे महिमान । चकित जाहला सहस्त्रानन । तेथे माझे एकवदन । कैचे अवधान धरील पै ॥६॥
मी मर्त्य देहबुद्धि अधम । संसारधीषण सकाम । षड्रिपूंचे वास्तव्यधाम । परि वदनी नाम तुझे ॥७॥
आधी कागद तो अपवित्र । त्वन्नामलेखनेयुक्त पत्र । शुद्ध सोवळे अतिपवित्र । पूजापात्र होय जैसे ॥८॥
तैसे त्वन्नामरसनालेखने । रहित जाहलो दुरभिमाने । सर्वभूती त्वद्भावज्ञाने । अतिआवडी वागवी ॥९॥
जन्मा येउनी हेचि सार्थक । वदने वदावे कथाकौतुक । वंदावे तुझे उपासक । आत्मसुखदायक जे ॥१०॥
हीच माझे मनीची आवड । त्वत्कथामृत अतिगोड । वदोन मोक्षग्रामकवाड । अतिसुघद उघडावे ॥११॥
हे घडणे तुझी सत्ता । तुजवाचोनिया अनंता । दुजा नाही कुशल कर्ता । जगी कर्ता एक तूची ॥१२॥
ह्रदयस्थ तू परमपुरुष । निजलीला वदवी निःशेष । श्रवण पठण कर्ते पुरुष । पावोत तोषत्वत्कृपे ॥१३॥
जयजय ज्ञानकळे सरस्वती । सौभाग्यगंगे ब्रह्मस्फूर्ती । जगत्कारणे कल्याण मूर्ती । विश्वस्थिति तुझेनी ॥१४॥
आद्यशक्ती तूचि रमा । शिवशक्ती तूचि उपमा । जगज्जननी सर्वोत्तमा । अगाध महिमा तुझा पै ॥१५॥
तुझी होता कृपादृष्टी । नांदो लागे सकलसृष्टी । तुवा उपेक्षिलियापाठी । होय कष्टी लोक सदा ॥१६॥
विद्या अविद्या येणे दोन्ही । तूचि नटलीस विश्वजननी । निजभक्ताते रक्षुनी । स्वरूपध्यानी लाविशी ॥१७॥
तुझा पावता अपांग । पाषाण होती पद्मराग । मुका पढे वेद सांग । गुरु दंग त्यापुढे ॥१८॥
तूच माझी कुळदेवता । तूचि सदया माझी माता । अंबे तुझी कृपा होता । जगी धन्यता पावेन ॥१९॥
माझे मनी हीच आस । त्वत्कथा वदावी सुरस । आरंभलिया कार्यास । पूर्णतेस त्वा न्यावे ॥२०॥
मी मतिमंत ज्ञानहीन । माझा अभिमान तुवा धरून । करी सर्वदा अवन । निजभक्ती मन लावोनिया ॥२१॥
मस्तकी अर्पोनि वरदकर । ईप्सित कामना पूर्ण कर । गणेशकथा निरंतर । मुखे माझे वदवी वो ॥२२॥
जय गुरो महादेवा । ब्रह्मानंदा सदाशिवा । क्षेत्रपाला भैरवा । साधनठेवा तुमचेनी ॥२३॥
गुरु हेचि परब्रह्म । गुरुसेवा सकलधर्म । गुरुस्मरणे सकलकाम । भक्ती सुगम गुरुभजने ॥२४॥
करिता सद्गुरूचे स्मरण । तेणे तुष्टे वारणानन । सकलसिद्धि पुढे येऊन । प्रसन्नवदन तिष्ठती ॥२५॥
ज्याचे मुखी सद्गुरुस्मरण । तेणे टाळिले जन्ममरण । त्याचे दर्शने कल्याण । पातकीगण पावती ॥२६॥
काय वर्णू सद्गुरुमहिमा । जयजय गुरो मंगलधामा । न कळे तुझा अगाध महिमा । त्वा मज अधमा उद्धरिले ॥२७॥
गुरूस उपमा नाही नाही । कल्पतरू जाहला उणा तोही । कल्पीतमात्र पुरवी पाही । निर्विकल्प करीना ॥२८॥
गुरुसमान म्हणावा परिस । स्पर्शे कनकत्व दे लोहास । परि स्वसामर्घ्य न दे त्यास । गुरु आपणासम करी ॥२९॥
समुद्री समुद्र उपमा साजे । गगनी उपमा गगन विराजे । तैसी निजोपमा स्वतेजे । सद्गुरुराजे करावी ॥३०॥
ज्यासि सद्गुरुभक्ती नाही । ते वृथा जन्मोनिया देही । जन्मयात्रा भोगिती पाही । व्यर्थ कायी चिरायु ते ॥३१॥
गुरु तोचि गजानन । गुरु तोचि कमलासन । गुरुरूपे जनार्दन । स्मर सूदन गुरुरूपे ॥३२॥
ऐसे तुम्ही सद्गुरुराज । कुशाग्र बुद्धी द्यावी मज । तेणे घडो मत्काज । सत्कीर्तीभाज मज वरो ॥३३॥
चित्ती उसळे हेचि वासना । मुखी वर्णोन गजानना । करोनि त्वत्कथा पद्मरचना । समाधाना साधीन मी ॥३४॥
हे तो महद्बुद्धीचे बळ । मी तो मतिमंद अज्ञानबाळ । परंतु कर्ता तूचि केवळ । दीनदयाळ गुरुराया ॥३५॥
होता तव कृपा गोमटी । मग पडेल काय अटाअटी । शरण तुजला याचसाठी । पूर्ण दृष्टी पाहे पा ॥३६॥
म्हणोनि घातले लोटांगण । न धरत पातले स्फुंदन । मुखी पडोनिया मौन । विकळ मन जाहले ॥३७॥
ऐसी दश अवलोकुन । कृपेने द्रवोनि दयाघन । मस्तकी वरदहस्त ठेऊन । अभयवचने गौरवी ॥३८॥
ऊथ वत्सा धरी धीर । कार्यारंभी वर्ते सादर । मत्प्रसादे लंबोदर । झाला सत्वर साह्य तूते ॥३९॥
वर्णावे आता त्याचे गुण । स्वस्थ राखी अंतःकरण । निर्विघ्नकर्ता गजकर्ण । संकटहरण तुष्टला ॥४०॥
ऐकता ऐसी अभयगोष्टी । आनंद न माये माझे पोटी । चरणी घालोनिया मिठी । शकुनगाठि बांधिली ॥४१॥
पावोनिया समाधान । करू लागलो पुढे लेखन । मातृपितृपदी नमन । करोनि ध्यान आरंभिले ॥४२॥
जयापासोनी माझा जन्म । पिता महादेव त्याचे नाम । अतिसुशील विप्र उत्तम । स्वधर्मकर्मी रत सदा ॥४३॥
जो भावे भगवत्परायण । साम्य ज्याचे अंतःकरण । सर्वभूती नारायण । हेचि देखणे चराचरी ॥४४॥
धर्माऐसी ज्याची क्षमा । वशिष्ठापरि शांति उत्तमा । रामापरि इंद्रियनेमा । एक रामा जयाते ॥४५॥
तियेचे नाम पार्वती । पतिव्रता ती महासती । गुणनिधान गुणवती । साध्वी जननि माझी ती ॥४६॥
तिचे पवित्र ह्रदयकमळ । तेथे माझे जाहले जन्म सुफळ । विनायक नाम ती स्नेहाळ । ठेविती जाहले कौतुके ॥४७॥
सत्कुळी जन्मताच बालपणी । विनटलो गणेशचरणी । त्याची कथा अघहारिणी । माझी वाणी वदतसे ॥४८॥
कथारंभाकरिता मंगल । विनयभावे बहुसाल । संतसज्जनाचे पादकमळ । अत्यादरे वंदिले ॥४९॥
जो पुराणाचा स्पष्टवक्ता । सत्यवतीसुत शुकपिता । त्याचे चरणकमळ आठविता । ग्रंथकथा चालिली ॥५०॥
ज्ञानेश्वर एकनाथ । रामदासादि साधु समस्त । ग्रंथकर्ते कविनाथ । वंदोनि श्रोते नमियेले ॥५१॥
विश्वामित्रेचे तटाकी । गुर्जरदेशी अतिनेटकी । बडोदे नामे नगरी लौकिकी । अए भूलोकी प्रसिद्ध जी ॥५२॥
तेथे निजानंदगुरुकृत प्रसाद । विनायकपदारविंदी मिलिंद । माझे भक्तीस्तव कथानुवाद । आनंदकंद बोलवी ॥५३॥
महाराष्ट्रभाशा व्युत्पत्ती पदे । औट त्यास ओवीछंदे । गणेशाप्रतापग्रंथ आनंदे । वाणी वदे सप्रेम ॥५४॥
श्रोते व्हावे सावधान । निर्वेध करा अवधान । गणेशकथाश्रवणी मन । तेचि धन मुमुक्षूचे ॥५५॥
ऋषि म्हणती शौनकालागुन । सर्वज्ञ तू तुझे दर्शन । होता आमुचे उल्हासे मन । सुखसंपन्न होतसे ॥५६॥
त्वन्मुखे पुराण श्रवण । होता विकासती आमुचे कर्ण । याहून लाभ तो अन्य कोण । संसारि जाण मानवा ॥५७॥
ऐसे वचन ऐकून । सूत म्हणे शौनकालागून । धन्य धन्य तुम्ही सज्जन । सुखसाधन तुमचेनी ॥५८॥
तुमचे प्रश्ने लोकांवर । अत्यंत जाहला उपकार । सांगेन कथा अतिमधुर । आता सादर श्रवण करा ॥५९॥
गणेशपुराण श्रवणसुलभ । मर्त्यलोकी हे दुलर्भ । ज्याचा महिमा पद्मनाभ । शिव विरंची गाताती ॥६०॥
तथापि तुमचे भक्तीस्तव । त्यातील जो सारभाव । सांगेन आता अभिन्नव । श्रवणे शिव श्रोतिया ॥६१॥
चतुरास्य पंचमुख । सहस्त्रानन शेष देख । वर्णिता भागले तेथे एक । माझे मुख कायसे ॥६२॥
ओंकाररूपी भगवंत । जो वेदा अधिप्रतिष्ठित । संपूर्ण जगता हेतुभूत । जो अनंत परमात्मा ॥६३॥
हरिहरादि देव सकल । अर्चिती ज्याचे पदकमल । ज्याचे आज्ञेने ब्रह्मांडगोळ । ब्रह्मा बहुसाल करितसे ॥६४॥
ज्याचे सत्तामात्रे भ्रमण । सदा करी सहस्त्रकिरण । ज्याचे आज्ञेने समीरण । दिशा पुर्ण वाहतसे ॥६५॥
ज्याचे चरित्र गुप्त गहन । जैसे कृपणाचे निजधन । अद्यापि हे पुराणकथन । नाही केले कवणाशी ॥६६॥
ज्याचे गाठी अगाध पुण्य । तेच श्रवणार्थ मानव धन्य । ज्याचे पुत्रदारादिकी नसे मन । कथा पावन नित्य ते ॥६७॥
गणेशपुराण महिमान । व्यासास सांगे कमलासन । व्यासे कथिले भुगूलागुन । सोमकांतासि तो सांगे ॥६८॥
तेचि कथा मधुरसुधा । संक्षेपे कथितो तुम्हा बुधा । श्रवणमात्रेच साधा । गणेशपदा अविलंबे ॥६९॥
श्रोते ऐका सादर । पुढे गणेशकथा अतिमधुर । श्रवणमात्रे भवसागर । तरोनि पार पावणे ॥७०॥
जयजयाजी विश्वनाथा । पुढे बोलवी निजकथा । माझे पूर्ण मनोरथा । कर्ता सर्वथा तूचि पै ॥७१॥
स्वस्तिश्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । गणेशप्रतापग्रंथ अद्भुत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७२॥
श्रीगजाननापर्णमस्तु ॥ शुभंभवतु ॥ अध्याय ॥१॥ ओव्या ॥७२॥