श्रीभक्तवत्सलायै नमः ।
मध्यदेशींचा वसुमती पती । शूरसेन नामा पुण्यकीर्ती । शत्रुतापन महामती । त्रिजगती यश ज्याचे ॥१॥
शांतदांत गुणगंभीर । धीर वीर उदारतर । सेना चातुरंग गंभीर । गणिता पार लागे ॥२॥
त्याची कांता पुण्यशीला । राजास प्रिय ती महिला । तिचे मुखचंद्रे लाजविला । क्षयो लाविला चंद्रासी ॥३॥
रती उर्वशी तिलोत्तमा । म्हणती इचे रूपासी सीमा । वर्णिता भागेल शेषमहिमा । सदा आम्हा लाजविते ॥४॥
तनमने पतिपरायण । सदा सेवी प्राणेशचरण । पतिव्रता सती सुलक्षण । जे भूषण राजकुला ॥५॥
ऐसा तो नराधीश सहज । सभेत बैसला महाराज । भोवती अमात्य पंडितसमाज । जैसा बिडौज शोभतसे ॥६॥
तव एकाएकी घंटाघोष । अप्सरा गाती नृत्यविशेष । ऐकता पावोनि तोष । दूतास म्हणे शोध करा ॥७॥
लक्षानुलक्ष त्याचे दास । बाहेर पाहती आसमास । तव देखिले विमानास । जे सूर्यास उणे म्हणे ॥८॥
त्यामाजी एक कुष्टीदास । तेणे अवलोकिले विमानास । पावोनिया अधोगतीस । ते भूमीस पतन जाहले ॥९॥
हाहाःकार करिती सुरवर । खिन्न जाहला पुरंदर । रायास सांगती अनुचर । समाचार सर्वही ॥१०॥
राजा तुरंगारूढ होउनी । तेथे आला धावूनी । शतक्रतूते अवलोकुनी । कर जोडून नमन करी ॥११॥
राजा म्हणे इंद्रासी । दुर्लभ दर्शन मानवांसी । कोण्या दोषे पडलासी । उघड दिससी समस्त जना ॥१२॥
कोणीकडोनि जाहले आगमन । आहे कोणीकडे गमन । कोण्या दोषे विमानपतन । कश्यपनंदना जाहले ॥१३॥
ऐकोनि त्याची विनयवाणी । प्रत्युत्तर वदे र्हादिनी पाणी । राजा ऐके निश्चलकर्णी । गमनागमनी कारण जे ॥१४॥
नारदे येवून उठाउठी । सांगीतली भृशुंडीची गोष्टी । पुण्यश्लोक असा सृष्टी । दुजा दृष्टी पडेना ॥१५॥
साक्षात तो गजानन । इंद्रा त्याचे करे दर्शन । ऐसे ऐकता मुनीचे वचन । घेतले दर्शन मी त्याचे ॥१६॥
ज्याते वंदिती मुनिगण । त्याचे वंदोनिया चरण । स्वर्गलोकी परतलो जाण । विघ्नदारुण जाहले येथे ॥१७॥
तुझे दासांमध्ये कुष्टी । विमानी पडता त्याची दृष्टी । पतन पावले विमान कष्टी । तेणे नृपती जाहलो ॥१८॥
राजा म्हणे गा पुलोमजानाथा । आधी सांगे भृशुंडीची कथा । इंद्र म्हणे ऐक आता । पूर्वील वृत्तांत तयाचे ॥१९॥
कैवर्तकनामे कुनर । स्वदोषे पीडी नगर । त्रास पावले थोरथोर । दुष्टाचार सदा त्याचा ॥२०॥
पापकर्मी सदा रत । पैजा घालोन द्युत खेळत । सदा जारिणीसि रमत । मदिरा पीत यथेच्छपणे ॥२१॥
कलह करोनि चोरी करी । घरोघरची निंदा करी । ऐसा तो दुराचारी । नगराबाहेरी घालविला ॥२२॥
मग कुटुंबासमवेत । जाऊन राहिला अरण्यात । वाट मारोन पोट भरित । प्राण घेत पांथिकांचे ॥२३॥
ब्रह्महत्या तेणे अनेक । करोन गांजिले बहुत लोक । वस्तुजात हरोनि अनेक । दारादिक प्रतिपाळी ॥२४॥
लोकांच्या हरोनिया धना । भूषा करोनि सजवी ललना । स्वेच्छाक्रीडा करोनि मना । सुखसदना रिघवी ॥२५॥
एके दिनी मार्ग रोधून । बैसला तव पांतस्थजन । येता देखोनिया धाऊन । गेला हरण करावया ॥२६॥
तव तो काढाकाढी निष्ठला । चोर पाठीमागे लागला । क्रोशपर्यंत पळाला । तव तो गेला निर्भयस्थळी ॥२७॥
येरू परतला मग मागे । धावता श्रमला निजांगे । स्नान करीत या प्रसंगे । मार्गी येता गणेशतीर्थी ॥२८॥
करोनिया पान जीवन । पुढे चालला लक्षूनि सदन । झाले मुद्गलाचे दर्शन । शस्त्र नग्न केले तेणे ॥२९॥
मारावया झेप घाली । तव शस्त्रे हातींची गळाली । मनालागी भूल पडली । स्वच्छ जाहली बुद्धी त्याची ॥३०॥
गणेशभक्तांचे दर्शन होता । पापबुद्धीशी जाहली विकलता । हे पाहोनि ऋषि तत्वता । जाहला पुसता तयासी ॥३१॥
कारे शस्त्रे तुझी गळाली । येरू म्हणे त्वद्दृष्टी पडली । तीर्थी स्नान करिता उपरमली । धिषणा पहिली पापाची ॥३२॥
होता साधूचे दर्शन । निर्वैर जाहले माझे मन । मग करोनिया नमन । दीनवदन बोलत ॥३३॥
महापातकी मी दारुण । जन्मादारभ्य आहे जाण । परी आलो तुजला शरण । करी तारण गुरुराया ॥३४॥
पश्चात्तापे तापलो साच । आंगी उभारले रोमांच । माते उद्धरसील तूच । दुसरा नाहीच जगत्रयी ॥३५॥
शरण आलियाचे रक्षण । करणे हेचि तुम्हा भूषण । ऐसे वचन त्याचे पूर्ण । करी श्रवण ऋषिवर्य ॥३६॥
मग म्हणे गा अधमाधमा । तुझे पापकर्मासि नाही उपमा । अधिकार नसे उपदेशकर्मा । तुज आम्हा करावया ॥३७॥
तथापि विनायकनाम । सांगतो आता जप उत्तम । तेणे तुष्टोन पुरुषोत्तम । खंडील कर्म कल्मषाचे ॥३८॥
जो पुन्हा होईल आगमन। तो जपे मंत्र येथे राहुन । उद्धरीन तुजला येऊन । सत्य वचन हे मानी ॥३९॥
येतील शुष्कयष्टीस पल्लव । तेव्हा खंडेल पाप सर्व । ऐसे सांगोनि भक्तराव । गेला आपले कार्यार्थी ॥४०॥
तेथेच बैसला तो तस्कर । शुद्धभावे जपे सादर । काळ लोटला अपार । अंगावर वारूळ जाहले ॥४१॥
वरी वाढले लताद्रुम । मागे परतला ऋषिसत्तम । येऊन पाहे त्याचे कर्म । म्हणे उत्तम जाहला खरा ॥४२॥
मग खणोनि त्या वारुळा । काढिता जाहला अस्थिमाळा । कमंडलु जीवन ते वेळा । शिंपुन पुतळा जीवविला ॥४३॥
त्याची दिव्य तनू जाहली । भृकुटीपाशी शुंडा फुटली । गणेशाने कृपा केली । चिन्हे अर्पिली स्वरूपाची ॥४४॥
पाहोनि त्याचे महिमन । संतोषले मुद्गलाचे मन । नेत्री गळे प्रेमजीवन । आलिंगन देत त्यासी ॥४५॥
जन्म जाहला पुन्हा त्याशी । ठेविले भृशुंडी नामासी । वर्तमान कळले ऋषीसी । दर्शनासि धावले ते ॥४६॥
वसिष्ठअत्रिभृगुभार्गव । कश्यपगौतमवामदेव । भरद्वाजादि ऋषि सर्व । येवोनि खेव देती तया ॥४७॥
मग एकाक्षरे उपदेशिला । तेणे तो अद्भुत तपे तापला । भक्ति पाहोनिया धावला । प्रसन्न जाहला वारणास्य ॥४८॥
सहस्त्रगभस्ती प्रकाशमान । प्रगटोनिया गजानन । शिरी वरदकर अर्पून । सावध मन केले त्याचे ॥४९॥
म्हणे व्यर्थ का कष्ट करिशी । माझे स्वरूप पावलाशी । सुर ऋषि वंदितील तुजशी । राहशी कल्पवरी या लोकी ॥५०॥
अंती मत्पदपावन । होशील जाण सत्य वचन । ऐसा वर करोनि अर्पण । अंतर्धान पावला ॥५१॥
तव तेथे देव ऋषी । दर्शन घेवून वंदिती त्याशी । हे येऊनिया मजशी । कथिता जाहला नारदमुनी ॥५२॥
ऐसे ऐकता अवनीपती । मी गेलो दर्शनाप्रती । वंदोनि त्याचे चरण प्रीती । पुन्हा मागुती परतलो ॥५३॥
जाणे आहे स्वर्गभुवनी । विमान पडले माझे मेदिनी । ऐसे ऐकोनिया कानी । राजा मनी चमत्कारला ॥५४॥
मग म्हणे गा देवदेवा । विमानगतीचा उपाय सांगावा । रायासि म्हणे तो मघवा । यत्न ऐकावा भूपती ॥५५॥
संकष्टीचतुर्थीव्रताचरण । केले असेल गा जेणे । त्याणे करिता पुण्यार्पण । तेणे विमान चालेल पै ॥५६॥
राजा म्हणे पुरुहूता । कवणेपरी आचरावे व्रता । मागे कोण जाहला कर्ता । हे आता मज सांगे ॥५७॥
शक्र म्हणे गा राजसत्तमा । ऐके संकष्टीचतुर्थी व्रतमहिमा । जिचेनि पावोनि सकलकामा । मोक्षधामा पावणे ॥५८॥
कृतवीर्य राजा पुण्यपरायण । जे अवनिचे निजमंडण । ज्याचे आश्रये ब्राह्मण । ब्रह्मपरायण राहती ॥५९॥
दानी मानी धर्मवेत्ता । निजबळे भोग भोगी अनंता । सुगंधा नामे त्याची वनिता । पतिव्रता महासती ॥६०॥
तिचे उदरी नोहे सुत । म्हणोनि राजा तप करित । तपे शोषिला देह समस्त । तेणे प्राणांत मांडिला ॥६१॥
त्याचे पाहूनि अद्भुत कष्ट । नारदमुनी नरवरिष्ठ । पितृलोकी जाऊनि स्पष्ट । त्याचे पित्यासी सांगतसे ॥६२॥
तुझा पुत्र पुत्रकामी । तेणे जाहला वनी श्रमी । जाऊ पाहे निर्वाणधामी । उपाय तुम्ही करावा ॥६३॥
ऐसे सांगोनि तयासी । नारद पातला यमलोकाशी । तव भोगिती नरकव्यथेशी । भृशुंडीचे पितृगण ॥६४॥
त्यांची अत्यंत व्यथा पाहिली । तेणे मुनीसि दया उपजली । म्हणोनि नारदे धाव घेतली । स्वारी पातली भूलोकी ॥६५॥
भृशुंडीस म्हणे महामुनी । काय करावे तुझे ज्ञानालागुनी । अरे तुझे पापे करुनी । पितृजनी नरकव्यथा ॥६६॥
करी त्यांचा आता उद्धार । तरीच तू सत्पुत्र नर । ऐसे ऐकता त्याचे उत्तर । मनी फार तप्त जाहला ॥६७॥
भृशुंडी करी मनी विचार । कैसा होईल त्यांचा उद्धार । संकष्टिचतुर्थीव्रत थोर । पुण्यतर तयेचे ॥६८॥
प्रार्थोनिया गजानन । संकष्टिचतुर्थीव्रताचे पुण्य । करिता जाहला अर्पण । संकल्प करून तेधवा ॥६९॥
तेणे पुण्ये जळोनि पाप । त्याचे जाहले दिव्यरूप । विमान पाठवी गणाधिप । आपणासमीप आणावया ॥७०॥
मातापितादारासुत । कन्याव्याहीजावयी समस्त । सुह्रदसखेबंधूआप्त । गेले समस्त उद्धरुनी ॥७१॥
एके दिवसाचे व्रतयोगे । उद्धरोनि गेले सर्व वेगे । एक वर्ष आचरता निजांगे । अगाध पुण्य गणवेना ॥७२॥
श्रोते ऐका पूर्वानुसंधान । नारदाचे वचन ऐकून । कृतवीर्यपिता संतप्तमन । मग तेथोन निघाला ॥७३॥
सत्यलोकी जाऊनि ते समयी । दंडवत पडे विधीचे पायी । कमलासने उठविला लवलाही । म्हणे का रे ग्लानी करितोसी ॥७४॥
येरू म्हणे गा प्रजापती । माझी खुटली येथून संतती । पुत्र तप करी वनाप्रती । प्राणावरती उठोनिया ॥७५॥
जरी पुत्र न होता त्याशी । तरी तो मरेल एक दो दिवशी । कोण कारण संतती न होण्याशी । ते मजशी कथी का ॥७६॥
ऐकोनि बोले विष्णुसुत । ऐक राया आता निवांत । सोमनामा अंत्यज अद्भुत । तुझा सुत पूर्वी होता ॥७७॥
तेणे मार्गी तपोधन । द्वादश मारिले ब्राह्मण । दिवसास करोनि उपोषण । चंद्रोदयी पारणे तेणे केले ॥७८॥
माघकृष्णचतुर्थीशी । गणेशा गणेशा म्हणे पुत्रासी । न कळत व्रत घडले त्याशी । तेणे राज्याशी पावला ॥७९॥
परि ब्रह्महत्या पापराशी । तेणे न होय संततीशी । ऐसे ऐकता मानसी । राजा कंपाशी पावला ॥८०॥
करूनिया दीनवदन । म्हणे तू दयाळू रक्षी भक्तजन । आता यासि उपाय कथन । कृपा करून करी का ॥८१॥
वेधा म्हणे कृतवीर्यपित्यासी । करिता संकष्टिचतुर्थीसी । नासेल ब्रह्महत्या पापराशी । तेणे संततीशी पावेल तो ॥८२॥
अंधमूकजडपंगू जाण । करिता चतुर्थी व्रताचरण । सर्वदा त्याचे कल्याण । गजकर्ण करीतसे ॥८३॥
ऐसा अगाध व्रतमहिमा । तुज कथिला राजोत्तमा । जेणे पुरेल सकलकामा । करवी नेमा तयाहुनी ॥८४॥
श्रोते पुढे सावधान । ऐका अंगारकीचे महिमान । जेणे तुष्टोनि वारणानन । भक्तजन रक्षीतसे ॥८५॥
जयजयाजी वेदसारा । भक्तवत्सला लंबोदरा । तूच उद्धरशील मज पामरा । भरवसा पुरा हाचि माते ॥८६॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराण रसभरित । उपासनाखंड अद्भुत । षोडशोध्याय गोड हा ॥८७॥
श्रीगणेशार्पणमस्तु ॥ अध्याय ॥१६॥ ओव्या ॥८७॥