विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते. बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.
संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८ व्या शतकातील 'श्रीविठ्ठल स्तवराज' या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच 'नमो भगवते विठ्ठलाय' अशी आहे. 'छंद देवता कीलक न्यास' या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे. 'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.