जैन धर्म
हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.
निर्वाण लाडू
या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या आकाराचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात.
अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत.
सिंधी
सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.