मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.