आख्यायिका -
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे.तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची) प्रथा आहे असे मानले जाते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.