हिंदू धर्म
हिंदू देव शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप.
हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या कामसूत्र या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप.
मनुस्मृती
मनुस्मृतीमध्ये समलैँगिकतेसाठी दिलेली शिक्षा कठोर किंवा प्राणघातक अशी नसून सौम्य आहे अशी म्हटली जाऊ शकते.
ब्राह्मणस्य रजः कृत्वा घ्रातिर् अघ्रेयमद्ययोः ।
जैह्म्यं च मैथुनं पुंसि जातिभ्रंशकरं स्मृतम् ॥ ११.६७ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.६८)
...
अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु ।
रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥ ११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३)
...
गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पि: कुशोदकम् ।
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥ ११.२१०-२१२
पहिल्या उतार्यात अन्य कार्यांसोबत, द्विज माणसाने पुरुषासोबत मैथुन केल्यावर जातिभ्रंश म्हणजेच जात गमावणे ही शिक्षा सांगण्यात आली आहे. परंतु दुसर्या उतार्यात अमनुष्यांत, मासिक पाळी येणार्या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये वीर्य शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे असे म्हटले आहे. गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही, तूप कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय. वरील ११.१७२ (किंवा ११.१७३) हा उतारा अगदी तसाच्या तसाच कूर्म पुराणात (उत्तरभाग, ३३.१०) पण आहे.
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे.
कन्यैव कन्यां या कुर्यात् तस्या: स्याद द्विशतो दमः ।
शुल्कं च द्विगुणं दद्यात शिफाश्चाप्नुयाद दश ॥
या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति ।
अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥ ७.३६९-३७०
जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात. पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल.