एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता' (इंग्लिश: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' (इंग्लिश: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत. व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही, तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे, जरी काही जण समलैँगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात, तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, कला व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात अमेरिकेतील 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि 'अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन' ह्या महत्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना 'लेस्बिअन' (इंग्लिश: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना 'गे' (इंग्लिश: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच लिंगाच्या संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुन लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रियतेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. कार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.