दुसऱ्याच दिवशी,  मी पुन्हा  सर्व काम पूर्ण केल्यावर थेट मुंबईला पोहोचलो आणि तिथे महेंद्रनाथ सद्गुरूला भेटलो.

आधुनिक सजावट केलेल्या खोलीत महेंद्रनाथ सद्गुरू  सिंहासनावर बसला होता, चंद्रकांत जोशी यांच्या शरीरामध्ये...!

आता मला रहस्य उलगडले कि माझ्या छावणीत आलेल्या तरुणाचा चेहरा मला इतका परिचित का वाटत होता. मी पाहिलेला माणूस महेंद्रनाथ सद्गुरू सारखा होता परंतु बराच तरुण आणि दाढी मिशा न वाढवलेला होता.

मी महेंद्रनाथ सद्गुरू कडे व्यंगात्मक स्मित केले आणि म्हणालो- “पन्नास वर्षांमध्ये, फक्त आठ वर्षे, सहा महिने आणि चौदा दिवस शिल्लक आहेत. तुला काय वाटत? माझा अंदाज बरोबर आहे ना?”

माझे शब्द ऐकून महेंद्रनाथ सद्गुरू लगेच चपापला आणि रागावलेल्या सिंहाप्रमाणे गर्जना केली, “वत्सा, काय बोलतोयस? काय फाजीलपणा आहे हा?”

"अरे! तुला हे सुद्धा माहित नाही, सारिकाच्या आत्म्याला विचार, मी काय बोलतो आहे?"

सारिका हा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडताच महेंद्रनाथ सद्गुरूचा चमकणारा चेहरा गोरामोरा झाला.

"मला तुझी सर्व रहस्ये माहित आहेत, महेंद्रनाथ! तू कोण आहेस, हे कोणाचे शरीर आहे आणि तुझे तंत्र मंत्र काय आहे हे मला कळले आहे.”

मी सिगारेट पेटवत सोफ्यावर बसलो आणि पुढे म्हणालो, “योग तंत्र मंत्र यांच्या नावाखाली विवश आत्म्यांच्या मदतीने तू काय करतोस हे मला चांगले माहित आहे. आत्तापर्यंत तू किती घरे उद्ध्वस्त केलीत, किती स्त्रियांची शुद्धता तू नष्ट केली आहे आणि किती निष्पाप मुलींच्या निष्कलंक शरीराशी तू खेळला आहेस,  तेही माझ्यापासून लपलेले नाही.”

“मग तुझ्या सारख्या व्यक्तीला जिवंत सोडला नाही पाहिजे.” असे म्हणत महेंद्रनाथ सद्गुरूने त्याच्या शेजारी लपवलेली दारूची बाटली उचलली आणि तोंडाला लावली. दुसऱ्याच क्षणी त्याच्याभोवती अनेक आत्म्यांच्या सावल्या घिरट्या घालू लागल्या. त्याला काय करायचे आहे ते मला समजले.

मी हसलो आणि म्हणालो, “महेंद्रनाथ! तू मला मारण्यासाठी या गरीब बिचाऱ्या आत्म्यांना का त्रास देत आहेस! ते मला काही इजा करू शकणार नाहीत.”

आणि मी सोबत आणलेला चंद्रकांत याचा हस्तलिखित ग्रंथ उघडला. अचानक, खोलीच्या वातावरणात एक भयानक काळी असुरी सावली उदयास आली आणि पटकन महेंद्रनाथ सद्गुरूजवळ आली.


तो महापिशाच्च होता जो चंद्रकांत आणि दत्ताराम यांच्या आत्म्याच्या एकत्रित शक्तीने तयार झाला होता. दुसऱ्याच क्षणी महेंद्रनाथ रडवेल्या आवाजात ओरडू लागला.

मी दुसरी सिगारेट पेटवली “महेंद्रनाथ सद्गुरू, आता तुझी सुटका नाही.”

महापिशाच्चाने महेंद्र्नाथला जेरबंद केले. पण  महेंद्रनाथला त्यावेळी शुध्द कुठे होती? तो सारखा ओरडत होता आणि त्याच परिस्थितीत विनवणी करू लागला.

"मला सोडा, मला सोडा, मी मरेन, मी मरेन"

“हे बघ तू सारिकाला मुक्त कर,  मी तुला या महापिशाच्चापासून वाचवीन. अन्यथा तुला माहिती आहे तुझी काय हालत होईल?”

"मला वाचव ... तू म्हणशील मी करेन. मी वचन देतो  " महेंद्रनाथ ओरडला आणि मूर्च्छित होऊन दुसऱ्याच क्षणी कोसळला.

मी तेथून थेट पुन्हा साईट वर परतलो आणि दुसऱ्याच दिवशी महेंद्रनाथ सद्गुरूने फाशी घेऊन आत्महत्या केली अशी बातमी कानावर आली.

चंद्रकांतच्या अखेरच्या इच्छेनुसार मी त्या तिघांचे सापळे वेताळ मंदिराजवळच विधिवत दहन केले. आशा केली कि आता त्या तिघांना गती मिळेल.


पण तरीही सारिका, दत्ताराम आणि चंद्रकांत जोशी यांच्या आत्म्याला शांती मिळाली कि नाही हे सांगू शकत नाही. मात्र त्या वाड्यातून येणारे किंचाळण्याचे आवाज त्या दिवसापासून बंद झाले.

पण मला वाटतं  महेंद्रनाथ याने फक्त चंद्रकांत जोशीच्या शरीराचा त्याग केला असावा. त्यानंतर महेंद्रनाथ कदाचित अजूनही दुसऱ्या रुपात दुसऱ्या कोणाच्यातरी शरीरात जिवंत असू शकतो.
तुमच्या आमच्या आसपास! तेव्हा सावध राहा! तो तुम्हाला इच्छामरण किंवा तत्सम एखादी विद्या देण्याचे आमिष दाखवून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. हा एक सापळा आहे.

 

लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel