"हॅलो अभ्या झाली का रे उद्या ची तयारी, सकाळी सहा ला निघायचं आहे आपल्याला,तू काही लवकर उठत नाही म्हणून अलार्म लावून ठेव ,उगाच वेळ नको व्हायला" अमोल

" हो  अम्या उठतो मी उद्या लवकर नको काळजी करू .तू सम्या आणि  निल्याला केला का फोन ते वेळेत पोहचणार आहेत न? " अभय

" फोन केला होता मी त्यांना गाडी घेऊन येतील ते वेळेत. बरं चल झोप तू  ,नाहीतर जाग नाही यायची लवकर .गुड नाईट" अमोल

" ओके, भेटू उद्या गुड नाईट" अभय..

अभय देशपांडे, अमोल काळे,समीर पाटील आणि निलेश पवार हे चौघे एकमेकांचे जिगरी दोस्त अगदी बालपणासुन . अभय  हा बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होता ह्याचा स्वभाव खूप समंजस ,साहसी ,देवावर श्रद्धा ठेवणारा . अमोल ही स्वभावाने समंजस पण त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही पेशाने वकील . समीर म्हणजे राजकारणी कुटुंबातील एकुलता एक कुलदीपक त्याच्या कुटूंबात परंपरागत राजकारण चालून आले होते .शिवाय घरी बक्कळ शेती वाडी, जमीन जुमले ,बंगले आणि वाडे असे एकंदरीत धनाढ्य कुटुंब.पण इतकं सगळं असूनही समीरला कसलाही अभिमान नव्हता खूप दिलदार ,साधा सरळ होता तो .निलेशचा स्वतःचा व्यवसाय होता  .अंगापिंडाने पैलवान गडी मनाने मात्र सस्या सारखा भित्रा.  ह्या चौघांचेही अजून लग्न व्हायची होती.आपापल्या कामाच्या व्यापातून चांगली आठ  दिवसाची सुट्टी काढून चौघे फिरायला जाणार होते . कुठे ते घरी कोणालाही   माहीत नव्हते . एका अश्या ठिकाणी जिथे कदाचित त्यांनी नको जायला पण तरीही त्यांच नशीब त्यांना तिथे घेऊन जातं. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले एक सुंदर गाव सोनगाव .वस्ती तशी विरळच पण  खूप सुंदर असं हे गावं. तिथे राहून तिथून जवळ असणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा आणि अजून काही निसर्ग रम्य ठिकाण ते पाहणार होते.

  सकाळी ठरलेल्या वेळेत सगळे एकत्र येतात आणि समीरच्या गाडीने जायला निघतात. कमीत कमी सात आठ तासांचा प्रवास असतो. त्या गावात समीरचा वडिलोपार्जित वाडा असतो तिथेच हे चौघे राहणार असतात.पण तो वाडा अनेक वर्षांपासून बंद असतो.

निलेश: सम्या आपण तुझ्या वाड्यावर चाललो तर आहे पण तो वाडा इतके वर्षांपासून बंद आहे ,किती वाईट अवस्था असेल त्याची.

समीर: अरे गावात जना काका आहेत न त्यांना फोन करून वाडा स्वच्छ करायला सांगितला आहे मी.

अभय: आता हे जना काका कोण??

समीर: जना काका तिकडची आमची शेती बघतात खूप प्रामाणिक आणि चांगले गृहस्थ आहेत, शेतीचा सगळा हिशोब द्यायला ते नेहमी घरी येत राहतात, त्यांच्याच तोंडून मी पहिल्यांदा या वाड्याबद्दल ऐकलं होतं. बाबांशी काहीतरी बोलत होते.  मी आग्रह केला म्हणून मला सांगितलं सोनगाव ला आपला एक मोठा वाडा आहे आणि तो बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. पण का ते नाही सांगितलं.वरून बाबांनी बजावल की सोनगाव च्या आजूबाजूला ही भटकायचं नाही.म्हणून घरी न सांगता आपण तिकडे चाललो आहे.

निलेश: काय लेका सम्या त्या वाड्यात भूत बित असेल म्हणून तर तो वाडा बंद आहे आणि यामुळेच तुला तिकडे जाऊ नको असं सांगितलं . ए आपण नको जाऊया त्या वाड्यात उगाच भूत असेल तर.

अमोल: ए गप रे निल्या भित्री भागूबाई कुठचा. नुसत्या त्या भयकथा वाचून वाचून डोकं फिरलं आहे तुझं काही भूतखेत नसते मनाचे खेळ नुसते.आपल्याला तिकडे मस्त जंगल सफारी करायची उगाच नसते विचार करू नको.

अभय: सम्या त्या काकांनी जर तुझ्या घरी सांगीतलं की आपण तिकडे जात आहोत तर मग??

समीर: त्याची काळजी नका करू काका अजिबात घरी काही सांगणार नाही तसा शब्द दिला आहे त्यांनी मला.

    चौघांचाही मनात त्या वाड्याविषयी वेगवेगळे विचार सुरू असतात. आठ तासाचा प्रवास करून ते सोनगावात पोहचतात.पोहचत पर्यंत संध्याकाळ चे सहा वाजलेले असतात.गावात पोहचल्या वर समीर जनाकाकांना फोन करतो,ते त्यांना घ्यायला येतात .वाड्यात जाण्यापूर्वी जना काका मुलांना घेऊन त्यांच्या घरी जातात. चौघे फ्रेश होतात तोवर जना काकांची बायको सावित्री काकू त्यांच्या साठी चहा नाश्ता करतात. जना काकांचा चेहरा कसल्याश्या भीतीने घाबरा झालेला असतो समीरच्या ते लक्षात येतं.

समीर: काका काय झालं तुम्ही असे घाबरलेले का दिसता आहेत?

जना:  मालक तुम्हांस्नि मी म्हणलो व्हतो न ,हिकडं वाड्यातनी जाऊ नका . लय वंगाळ हाय तो वाडा दिवसा बी कोण फिरकत नाय तिकडं. मले तुम्ही तो वाडा सपा करायले सांगितला पण माई काय हिम्मत झाली नाही .कोणी गडी माणसं बी तिकडे याले तयार व्हत नाही. कस तरी दोन गड्याले तयार करून  नेलं अन दिवसा काठी कसा तरी सपा केला वाडा.

  समीर आता हसायला लागतो..

समीर: काय काका किती घाबरता तुम्ही.

जना: मालक हसण्यावारी नेऊ नका जी . तो वाडा भुतांनी झपाटलेला हाय. शापित वास्तू हाय ती . तुम्ही जाऊ नका तिथ. माणसं च काय तर जनावरं सुद्धा भटकत नाही तिकडं.
माझा ऐका मालक नका जाऊ वाड्यात. मोठ्या मालकास्नि  माहीत झालं की तूम्ही हिकडं येऊन त्या वाड्यात गेले तर लय रागावतील मायावर .त्यात तुम्ही मले आन घातली कोणाले बी न सांगण्याची .

अमोल: काका तुम्हाला तर त्या वाड्याचा इतिहास माहिती असेलच न??

जनाकाका :  मले थोडी फार माहिती ठाव आहे पन समधं ठाव नाही , ( समीरकडे बघून)  मालक पण तुमच्या वडिलांना बी समधी माहिती नाही ठावं त्या वाड्या बद्दल. तुमच्या खापर पणजोबान बांधला व्हता तो वाडा . तुमचे खापरपणजोबा म्हणजे आबासाहेब पाटील गावच प्रतिष्ठित गृहस्थ.लई दबदबा त्यांचा गावात त्यांचा एकुलता एक मुलगा रावसाहेब पाटील म्हणजे तुमचे पणजोबा ते बी मनानी लय चांगले त्यांच्या शब्दाला गावात मान व्हता.अडल्या नडल्या ची मदत करायचे .त्यांची दोन मुलं थोरले म्हणजे तुमचे आजोबा माधवराव त्यास्नि भाऊसाहेब म्हणतं . भाऊसाहेब देव मानुस त्यांच्या बा च्या अन आज्या च्या पावलांवर पाऊल टाकलं त्यांनी .तर धाकल मालक संग्रामराव .  तुमच्या वडीलांच्या जन्मा आधीच दादासाहेब हा वाडा सोडून गेले अन नंतर तेंव्हा पासून वाडा बंद आहे .पण त्या माग काय कारण व्हत  मला बी नाय ठावं .  पण तो वाडा झपाटलेला हाय हे खरं हाय. म्या इंनती करतो तुम्हांसनी मालक नका जाऊ तिथं.

समीर: काका मला तर आता त्या वाड्याच रहस्य शोधून काढायला हवंच .नेमकं काय घडलं असेल तेव्हा आणि तुम्ही म्हणता तस खरंच तो वाडा भुताने झपाटलेला आहे की त्या मागे अजून काही कारण आहे मला शोधायलच हवं..

निलेश: अरे सम्या, ते काका एवढे विनंती करत आहेत तुला ऐक लेका त्यांच नको जायला आपण तिथे .आपल्या ला काही झालं म्हणजे.

अमोल : काही होणार नाही आपल्या ला .माझा नाही विश्वास भुताखेतांवर जाऊच आपण वाड्यावर..

अभय:  तिथे जाऊन तर बघायला हवंच एकदा. आता आम्हाला पण वाड्याच रहस्य जाणून घ्यायच आहे .

निलेश: अरे पण आपण इथे त्या। वाड्याच रहस्य शोधायला नाही आलेलो उगाच तुम्ही कशाला त्याच्या मागे लागले.

समीर : निल्या आता हा प्रश्न फक्त वाड्याच रहस्य शोधण्याचा राहिलेला नाही तर माझ्या पूर्वजांचा इतिहास मला जाणून घ्यायचा आहे .आणि त्यासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही.पण मित्रांनो मी तुमचा जीव नाही धोक्यात घालू शकत म्हणून तुम्ही इथेच गावात एखाद्या लॉजवर रहा .मी एकटाच जातो वाड्यात.

अमोल : वेडा झालास का तू ? म्हणे एकटा जातो वाड्यात. मी पण येणार तुझ्यासोबत होऊ दे काय व्हायचं ते.

अभय: हो सम्या मी पण येणार .तुला एकट नाही जाऊ देणार आम्ही.

निलेश: मीही येणार सम्या . मला कीतीही भीती वाटली तरी मी तुझ्यासाठी त्या वाड्यात येणार.

समीर: अरे पण..

अभय : आता पण वगैरे काही नाही बस ठरलं आहे आमचं.चल निघूया.

जना काका : थांबा पोरांनो. तुम्ही माझं काही ऐकना .लय मोठी हिंमत लावत हाईसा तिथं जायची.( जनाकाका आतल्या खोलीत जाऊन काहीतरी घेऊन येतात) मालक तुमचा ईस्वास असो नायतर नाय पन तिथे वाईट शक्ती हाय.ही रुद्राक्षाची माळ हाय चौघे बी घाला अन मंगच जावा अन हा आपल्या गावातील सोमनाथ शंभूचा अंगारा हाय हा बी असू द्या सोबत.आणि काही झालं तरी या माळी गळ्यातून काढू नका. मी येत जात राहील रोज तिथं.

चौघेही त्या माळी गळ्यात घालतात आणि वाड्याच्या दिशेने जायला निघतात. काय असेल नेमकं त्या वाड्या मागचं रहस्य याची त्यांना उत्सुकता लागलेली असते..

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel