मनाची एक अवस्था ...व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जाणारी केवळ मनस्वी...

मी माझी मैत्रीण  तिच्या घरी गप्पा मारत होतो  उन्हाळ्याचे दिवस.होते बाहेर चिटपाखरुही नव्हते.सगळे शांत ऊन रखरखत होते ...
रस्यावर शुकशुकाट होता.तेवढयात  बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, . उन्हाने दमली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाशी ती थांबली.

डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.

मैत्रीण पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं. बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये, म्हणून  तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. 'बाई, केव्हढं उन्ह आहे बाहेर...'
बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात माझी मैत्रीण  म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते  'पाटे टाकवण्याच' काम ती करीत होती.

किती घेता पाटयाचे?'
'वीस रुपये.'
'अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?'
'दहा मिळाले तर डोक्याहून पानी' ती
नवरा आहे?'
नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.'
किती सहज ती 'डिव्होर्स' बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?
'मुलं आहेत?'
'दोन हायेत.' ती
'शाळेत जातात?'
'कधी मधी! पाऊस झाला, अन् शेण गोळा कराया न्हाई गेले, तर सालेत जातात कारप-रेशनच्या'(corporation)
100 रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!
मैत्रीणीच्या डोळ्यात पाणी आलं. 'तिचं ते  हळूवारपण मनाला जाणवलं ...
तिची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे 'कुटुंबिय'च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. 'केळीचे सुकले बाग असुनिया पाणी' तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.
पाणी हवयं का ?मैत्रीणीने तिला विचारलं.
'नाही बाई, काम शोधाया पाहिजे. 'येर'(वेळ) घालवून कसं व्हईल?'

'एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या' सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २० रुपये झाले. माझ्या मैत्रीणने तिला पन्नास  रुपये दिले.

'नको बाई, कामाचे पैशे द्या फक्त.' ती म्हणाली. बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं.

'बर, थांबा एक मिनिट' आणखी काम द्यायचं, म्हणून तिने पुन्हा  आतून वरवंटा आणला.*

याला टाकवा.' तिने वरवंटा पुढे केला.

बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली,

लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही'

जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती.

बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ!
मला माझ्या लेकीच्या बारशाचा तो भूतकाळातील दिवस आठवला ...निरागस लेकराला दुनियादारी माणुसकी माहित नसते...आपलं नामकरण करतानाचे ते हळूवारपण ..संवेदना जिव्हाळ्याचे कोण माहित नसते..त्या त्या वेळचं ते हळूवारपण त्या संवेदना देता आणि घेता ही यायला मोठं भाग्यच लागत असावं कदाचित .त्या बाईची त्या निर्जीव वरंवट्याप्रतीचे ते हळूवारपण बघून मन थोडे विसावले ........
अशा 'लेकराला'  हातोड्याचे घाव घालायचे, या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते.बहुधा एका दगड फोडणा-या जीवाचा तो मनातील हळूवारपणा मनात घर करुन गेला...

अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.

'तिचं व माझ्या मैत्रीणीचं ही ते हळूवारपण सहृदयता ... त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं....

हळूवारपणा हा उपजत दैवी गुण त्यातूनच येते दाखवली जाते ती संवेदना ..जी केवळ मनस्वी गृहीतकांवर संस्कारावरच आधारलेली असावी ...नकळत त्या दगड फोडणा-या बाईचं मन किती हळूवार होतं हे समजून गेलं शेवटी हळूवारपणा हा मनातूनच असायला हवा व्यवहाराची औपचारिकता त्याचं असणं ही कलूषित करत असावी..असे हळूवारपण ...आज बघितले..अन् मन सुखावले..हळूवारपण मना मनाचे बंध साधणारा एक सद्गुण एक हळूवार जाणीव नात्याचं बिरुद झुगारुन फक्त एक माणूस म्हणून प्रथम बघायला शिकवणारी सुसंस्कृत मनाची संस्कारीत अवस्था ....हळूवारपणा....!!

कालचच ताज उदाहरण "संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर " यांनी आपला आँक्सिजन बेड देवून मृत्यू अटळ असला तरी जाता जाता काही तरी वेगळ करुन दाखवलेला  हा त्यांचा  हळूवारपणाच..त्यांना सलाम...!!.

.म्हणून ....

खूप वर्षापूर्वी लिहलेली  ही माझ्या मनाची जाणीव ..आज पुन्हा  मांडाविशी वाटली...!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel