महालक्ष्मीव्रत हे एक कमी व्रत या दिवशी करतात.व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी.तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा.मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी.देवीला सोळा परींची पत्री व फुले वहावीत.सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा.पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी.मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा.मग सोळा दूर्वा आणि सोळा अक्षता हातात घेवून महालक्ष्मीची कथा ऐकावी.
तांदुळाच्या पिठाचा मुखवटा- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात.नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजल कुंकवाने रेखाटतात.हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात.मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.
घागरी फुंकणे-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात.घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्व आहे.