महात्मा गांधी लहानपणीचे
गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. करमचंद हिंदू मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णणव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदास वर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वांग्मय यातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबुल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात "त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व: ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.
इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.
त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता - "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब " ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल ते नाखूश होते.