एकदा एका गुरूच्या आश्रमात तीन शिष्य अध्यात्माचे शिक्षण घेत होते. गुरुनी त्यांना अनेक उत्तोमोत्तम विद्या शिकविल्या, अनेक प्रकारचे शिक्षण दिले. जेंव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेंव्हा ते तीनही शिष्य गुरूंची आज्ञा घेवून घरी परत निघाले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले कि, आपण चालत असलेल्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात काटे पसरले आहेत. पहिला शिष्य मनात म्हणाला, " आपल्याला या काट्यानपासून बचाव करून मग घरी परतावे लागेल." तो हळूहळू काट्यानपासून वाचत घरी परतला. दुसरा शिष्य खिलाडू वृत्तीचा होता. त्याने उद्या मारत ते काटे पार केले व घरी जावून पोहोचला. तिसऱ्या शिष्याने मात्र असे न करता ते काटे उचलले व रस्त्याच्या एका बाजूने जमवून त्यांचा ढीग केला. असे करताना त्याचा हाताला पायाला खूप काटे टोचले, ओरखडले, रक्त आले पण त्याने आपले काम सोडले नाही. त्याने तो रस्ता स्वच्छ केला. तेवढ्यात त्या रस्त्याने त्यांचे गुरुजी आले. त्यांनी शिष्याचे हे काम पाहिले व पहिल्या दोन शिष्यांना बोलावणे पाठविले. काही वेळातच ते दोघेही तेथे परत आले. तेंव्हा गुरुजी म्हणाले," पहिल्या दोघांचे अजून शिक्षण पूर्ण करावयास हवे कारण ज्यांना दुसऱ्याच्या उपयोगी आपले शिक्षण लावता येत नाही त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ कळत नाही. तुम्ही लोंकांसाठी काय करू शकता हे पाहण्यासाठी मीच या रस्त्यात काटे पसरून ठेवले होते. जो इतरांचे जीवन सुसह्य करतो तोच आयुष्यात मोठा होतो." एवढे बोलून त्यांनी तिसऱ्या शिष्याला आशीर्वाद दिले व घरी परतण्याची आज्ञा दिली
तात्पर्य - शिक्षणातून समाजोपयोगी कामे झाल्यासच शिक्षणाचा फायदा आहे.