मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर गावात बाजारपेठेत भोजराज लेखवाणी या सिंधी व्यापाऱ्याच मोठा कापडाचा दुकान होतं. त्याचा कापडाचा धंदा उत्तमप्रकारे चाललं होतं. लोक कापड खरेदीसाठी इतर कुठेही न जाता फक्त त्याच्याकडेच कपडे खरेदी करत. एकदा एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठमोठे कलाकार बऱ्हाणपूरला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर भोजराजानी या सगळ्या कलाकारांना जेवणासाठी नेलं होतं. जेवणाची व्यवस्था एका चंद्रमौळी टपरीत केली होती. हि टपरी बाहेरून एखादी झोपडीच वाटत होती. त्याची उंचीही खूपच कमी होती. झोपडीच्या छताला मध्येमध्ये भोके पडली होती. त्यातून आभाळातील चांदण्या दिसत होत्या. भोजन मात्र उत्तम होते. झोपडीच्या शेजारीच भोजराजाचा आलिशान बंगला दिसत होता. पण जेवण मात्र या टपरीत का? असा प्रश्न एका कलाकाराने भोजराजाला विचारला, तेंव्हा ते म्हणाले," सिंधमधून आम्हाला हाकलून दिल्यावर घर ना दार या अवस्थेत आमचे कुटुंब पहिल्यांदा इथे आलं. तेंव्हा या झोपडीने, जमिनीने आधार दिला. या झोपडीने आम्हाला सावली दिली. ऊन-वाऱ्यापासून आमचा संरक्षण केलं. हि जमीन आणि झोपडी नसती तर आमचा काय झाला असता नंतर आम्ही उद्योग धंदा करून पैसा मिळविला, बंगला बांधला पण या झोपडीच्या शेजारी. हि झोपडी आमच्या सुखाचं, वैभवाच उगमस्थान आहे. आमच्या वाईट दिवसात हिने आम्हाला दिलेली साथ -आसरा याचा विसर आम्हालाच काय भविष्यातील आमच्या पिढ्यांनासुद्धा पडू नये अशी आमची भावना म्हणून हि झोपडी दाखविण्याचा निमित्त ! या झोपडीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या वाईट दिवसांचे स्मरण होते व वाईट वागण्यापासून आम्ही दूर राहतो.
तात्पर्य - आपण आपल्या मूळ गोष्टीना विसरू नये. ज्यांनी संकटकाळात आपली मदत केली त्यांना कधीच विसरू नये.