एके दिवशी अकबर बादशहाने संगीत सम्राट तानसेन यांना बोलावणे पाठविले. तानसेन दरबारात आले. बादशहा गायक तानसेन यांना म्हणाला," तानसेन ! तुम्ही तर खूप सुंदर गाता. खुदाची तुमच्यावर असीम कृपा आहे. पण मला तुमच्या गुरूंचे गाणे ऐकायची इच्छा आहे. कारण तुम्ही इतके सुंदर गाता तर तुमचे गुरु हे तुमच्यापेक्षा कधीही वरचढ गाणे गात असतील. त्यांना तुम्ही इथे दरबारात गायनकरण्यासाठी बोलवा. आपण त्यांना ते जे मागतील ते देवू पण मला त्यांचे गाणे ऐकवा." यावर तानसेन म्हणाला," महाराज! आपण कितीही मोठी रक्कम दिली किंवा इनाम दिले तरी ते इथे येणार नाहीत किंवा त्यांचे गाणे इथे म्हणणार नाहीत. कारण त्यांचा आपल्याशी काहीच देणं घेणं नाही." हे ऐकून बादशाहाला थोडा राग आला, पण त्याची गाणे ऐकण्याची प्रबळ इच्छा होती. बादशाहने मग तानसेनाला सांगितले कि ते आपल्याकडे येत नाहीत तर आपण त्यांच्या इथे वेश बदलून जावू आणि त्यांचे गाणे ऐकू. गुरु हरिदास हे तानसेन यांचे गुरु होत. बादशहा आणि तानसेन गुरूंच्या घरी गेले. एका साध्या झोपडीमध्ये गुरु बसलेले होते. बादशहा झोपडीबाहेरच उभा राहिला. तानसेन आत गेला, गुरुणा वंदन केले आणि त्याने गुरुंसमोर चुकीचा राग आळवायला सुरुवात केली. गुरुंना हे आवडले नाही, ते म्हणाले," थांब! तुला राग म्हणता येत नसेल तर तंबोरा माझ्याकडे दे." असे म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली. बादशहा व तानसेन त्या स्वर्गीय गाण्यात रंगून गेले. बादशाहाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. परत येत असताना बादशहा म्हणाला,"तानसेन! तुझ्यापेक्षा तुझ्या गुरूंचे गाणे हे जास्त आत्म्याला भिडले याचे कारण काय?" तानसेन म्हणाला,"महाराज ! मी तर केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी गातो पण माझे गुरु परमेश्वरासाठी गातात. ते त्यांच्या अंतरात्म्यातून केवळ प्रार्थना म्हणून गातात. म्हणून त्यांचे गाणे हे सर्वश्रेष्ठ आहे." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.
तात्पर्य :- ईश्वराच्या भक्तीत म्हटले जाणारे गाणे, शब्द हे जर आपल्या अंतकरणापासून निघत असतील तर ते निश्चित परमेश्वरापर्यंत पोहोचतात.