एका गावात राम नि श्याम असे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब तर श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला," मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू?" हे ऐकून श्याम म्हणाला," तू मला माझ्या कामात मदत कर, म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही." दुसऱ्या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले परंतु श्याम हळूहळू रामकडून जास्त काम करून घेवू लागला आणि त्याचा अपमानही करू लागला. त्याच्या ह्या वर्तनाने राम दु:खी झाला. रामने श्यामचे घर सोडले आणि जंगलात गेला. तेथे त्याची भेट एका साधुशी झाली. त्याची दु:खमय कथा ऐकून त्या साधूला त्याची दया आली, त्याने त्याच्या कुबदावरून मायेचा हात फिरविला आणि काय आश्चर्य ! रामचे कुबड नाहीसे झाले. त्याबरोबरच साधूने रामच्या हातात एक पिशवी दिली व सांगितले," हि पिशवी सत्कर्माची पिशवी आहे, ह्यात सोन्याचा मोहोरा आहेत. तू सत्कर्माने वागला आणि सत्कर्मासाठी जर यातील धन खर्च केले तर ह्या पिशवीतील धन कधीच नष्ट होणार नाही." राम गावी परत आला. त्याने सत्कर्मासाठी म्हणजे लोंकाच्या भल्यासाठी अनेक उत्तम कामे केली. त्यासाठी त्याने जितका पैसा खर्च केला तितका आजवर कोणीच केला नव्हता. हे पाहून श्यामच्या मनात असूया निर्माण झाली. त्याने राम ला हे सर्व कसे झाले हे विचारले. तेंव्हा रामने खरे ते सांगितले. श्याम जंगलात गेला व साधू महाराजांना आपले कुबड दाखवीत म्हणाला माझ्या मित्रासारखे मला नीट करून द्या व मलाही पैश्याची पिशवी द्या. श्यामचा हा स्वार्थी स्वभाव पाहून साधू महाराजांनी त्याला बरे तर केले नाहीच पण त्याला तेथून हाकलून दिले व सांगितले कि सत्कर्म करणाऱ्याला देव सहकार्य करतो.
तात्पर्य - लोभ, मत्सर बाजूला ठेवून मन सत्कर्मात गुंतविले तर आपला भविष्यकाळ हा अतिशय चांगला असतो. सत्कर्माच्या वाटेने नेहमी चालले पाहिजे.