श्रावण शुद्ध पंचमी- या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.
श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
नारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.
याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.
याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.
श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/'कृष्ण जन्माष्टमी'
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.
पिठोरी अमावास्या/ पोळा
या महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[३]