जयजय रघुनंदन प्रभु, दिन दयाघना ।

भो ! अनाथनाथ तात, पतितपावना ॥धृ०॥

जयजय घननीळ घनःश्‍याम सुंदरा

जयजय गुणगंभिर धिर, विर धनुर्धंरा ।

जयजय महाराक्षस खळ, कटक मर्दना ॥जय० ॥१॥

झाला तळिं तल्पक तो, शिरिं धरी धरा ।

झाली पदकमलयुगुलिं भ्रमरि इंदिरा ।

लागलें तव गहन ध्यान, मदनदहना ॥जय० ॥२॥

जयजय रघुवीर कमल, विमल लोचना ।

जयजय भव फंद द्वंद्व, बंधमोचना ।

जयजय श्रीसच्चिद्‌घन, चित्तरंजना ॥जय० ॥३॥

भो जानकीनाथ, सदय, हृदयकोमला ।

हा प्रपंचताप निपत, नको नको मला ।

आलों तुज शरण रक्षि, न करि वंचना ॥जय० ४॥

तूं करुणामृतसिंधु दीनबंधु राघवा ।

तूं निर्गुण सगुणरुप, रंग आघवा ।

जयजय क्षिति गगनानल, जल प्रभंजना ॥जय० ॥५॥

तूं तारक भवसागरपुर, भक्‍त-सारथी ।

तुज अर्पण गंध धूप, दीप आरती ।

विष्णुदास भजन पुजन, नमन प्रार्थना ॥जय० ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel