जोहार मायबाप जोहार । याच गांवचा मी महार । सांगेन सार्‍या गांवचा विचार । सविस्तर परिसा की जी मायबाप ॥ १ ॥

गांवचे धनी मिरासदार । पाटलीण आवा खबरदार । तेथें पांच पोरांचें घर । बांधोनी रहाती की० ॥ २ ॥

जोहार जी पाटीलबोवाजी । पाटलीण आवा करुनी राजी । सारे गांवची केली भाजी । परी धनी नाहीं ठेविले राजी ।

गुंतला पाहून आबाजीस की० ॥ ३ ॥

तुमची वागणूक पाहून बरी । धन्यानें गांवचे केले अधिकारी । गांवांतील जमीन वर्तवाल सारी । ती तुम्ही केली पडीक भारी की० ॥ ४ ॥

शेत अवघें साडेतीन चाहूर । तुम्ही येथील वतनदार । पीक पिकवावें सार असार । मुद्दल धन्याचा विचार करा की० ॥ ५ ॥

मुळींच केलें नाहीं पीक । पुढें बाकीसाठीं कराल काय एक । धन्याची बाकी टक्का एक । रहाणार नाहीं की० ॥ ६ ॥

बाकीची मुदत सरलियावरी । यमाजीची येईल स्वारी । ते पुढें घालूनियां निर्धारी । नेतील की० ॥ ७ ॥

धन्याची तुमची नाहीं भेट । यमाजीबोवा मारून करती कूट । मग तुम्ही तेथें बोभाट । कोणाचा कराल की० ॥ ८ ॥

शेत तुमचे हाती आहे । तंव चोखट करुनी ठेवा भोय । एका जनार्दनाचे पाय । उगेच धरा की जी मायबाप ॥ ९ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel