कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी । हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी ॥ १ ॥

पांडव असतां वनवासी । कळलें कौरवांसी । त्यानें पाठविलें ऋषींसी । सत्त्व हरावयासी ॥ २ ॥

साठि सहस्त्र खंड्या अन्न । दुर्वासा भोजन । सत्त्व जातील घेऊन । अंतर पडतां जाण ॥ ३ ॥

रात्र जाहली दोन प्रहर । आले ऋषेश्वर । भोजन मागती सत्वर । कैसा करूं विचार ॥ ४ ॥

आज कां निष्ठुर जाहलासी । होईल बा गति कैसी । अनाथ मी देवा परदेशी । धांव तूं वेगेंसी ॥ ५ ॥

आतां न लावी उशीर । अनर्थ करील हा फार । एवढा करी उपकार । दे दर्शन सत्वर ॥ ६ ॥

कंठ शोषला अनंता । प्राण जाईल आतां । पद पसरतें अच्युता । पावे रुक्मिणीकांता ॥ ७ ॥

ऐकुनि बहिणीची करुणा । आला यादवराणा । द्रौपदी लोळत हरिचरणा । एका जनार्दना ॥ ८ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel