महंमदांच्या काही पत्‍न्या प्रवचने करीत. स्त्रीला वारसा हक्क देणारे पैगंबरा स्त्रीला कमी मानीत नसत. पुरुष काय, स्त्री काय एकाच मातीतून आलात, ते म्हणत. अरबस्तानात लहान मुलींना वाळूत जिवंत पुरुन मारीत. आईबापांना मुलींना सांभाळणे कठीण जाई. कशाला मुलगी जन्मली, असे म्हणत. परंतु पैगंबरांनी या गोष्टीला आळा घातला. कुराणात पुनःपुन्हा मुलींना नीट वागवा. असे उल्लेख आहेत. परंतु इस्लाममध्ये पडदा आला खरा. केमालपाशाने तुर्कस्थानातून तो दवडला परंतु इतर मुस्लिम राष्ट्रांतून तो अजून आहे. हिंदूस्थानातही आहे. मुस्लिम संस्कृतीने हिंदु संस्कृतीसही हा बुरखा बहाल केला. पडदा म्हणजे प्रतिष्ठितपणाचे लक्षण !. गरिबांना पडदा घेऊन कसे चालेल ? त्यांना तर कामाला जायला हवे. गरिबांत मोकळेपणा राहिला. ही दळभद्री चाल श्रीमंतांत, नवाबांत, राजेरजवाड्यांत राहिली.

सरदारकन्यांची, राजेराजवाड्यांच्या मुलांची लग्ने पुष्कळदा राजकीय हेतूने होत. या लग्नांवरुन कधी युद्धेही होत. मुलगी म्हणजे जणू स्वातंत्र्यहीन वस्तू. देण्याघेण्याची चीज. खऱोखर या अशा लग्नाची चीड येते. त्यातून दुःखद घटनाही घडत. मिराबाई, कृष्णाकुमारी यांच्या कथा माहीत आहेत. परंतु शेकडो अज्ञात कथा असतील. बड्या लोकांचे हे प्रकार, तर सामान्य जनतेतही निराळ्या रीतीने तेच प्रकार होते. एक तर बालविवाह सर्रास रुढ झाले आणि स्त्रियांना व्यक्तिमत्त्व असे उरलेच नाही.

परंतु उत्तरेतील पडदा दक्षिणेत आला नाही. गुजरातमध्येही पडदा नाही. इकडे अधिक मोकळेपणा राहिला. मद्रासच्या बाजूला तर अधिकच स्वातंत्र्य. मलबारकडे तर स्त्रियांना अधिक मान. त्या मोकळेपणाने हिंडतील, फिरतील, तळ्यावर स्नानास जातील. मुक्त स्नान करतील. परंतु असा मोकळेपणा असला तरी लग्ने लहानपणीच होत. ज्ञानप्राप्तीला संधी नाही, वाव नाही. क्वचित् भिन्नजातीय विवाह होत, परंतु अपवादात्मकच. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये क्वचित कधी लग्ने झाल्याची उदाहरणे आहेत. दक्षिणेकडे अगदी बालविवाह होत नसावेत, असे वाटते. परंतु मुलीच्या लग्नाला अडचणी फार. तिकडे मुलीचे लग्न करताना दागदागिने देण्याची पद्धत. कानांत निदान हिर्‍यामोत्यांची कुडी तरी आईबापांनी द्यायलाच हवीत. महाराष्ट्रातही मोकळेपणा होता. ज्ञानेश्वराबरोबर त्याची बहीण मुक्ताबाई ही मुक्तपणे हिंडते. ती व्रती असते. तिचा छळ झाला नाही. तिला नाव ठेवल्याचे माहीत नाही. संन्याशाची मुले म्हणून सामान्यतः त्यांच्यावर बहिष्कार असे एवढेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel