दोघी बोलत बोलत गावात आल्या. त्यांचे रस्ते आता अलग होणार होते.

''मला इकडून गेले पाहिजे. मी जाते.'' हेमा म्हणाली.

''सकाळी ये. टोकाचे घर. मी बाहेर उभी असेन. पहिला मजला. बाबांना विचार.'' ती म्हणाली.

हेमा घरी आली. रंगराव अजून घरी आले नव्हते. हायपाय धुऊन हेमा एकटीच वरती गच्चीत जाऊन बसली. तेथे फुलांच्या कुंडया होत्या. जाईजुईचे वेल होते. आणि आकाशात लाखो तारे चमचम करीत होते. थंडगार वारा वाहत होता. हेमा गाणे गुणगुणू लागली.

गेली आई दूर
जिवलग, गेली आई दूर॥
जगी न आता मजला कोणी
अनाथ जणु मी पडले रानी
डोळयातून ये निशिदिन पाणी
सदैव हृदयी मम हुरहुर॥गेली.॥
आशा नाही उरली तिळभर
सभोवती हा भरला तिमिर
किमर्थ जगणे या पृथ्वीवर
नेरे मजसिही काळा क्रूर॥गेली.॥

''हेमा, काय बडबडत बसली आहेस? जेवायचे नाही का? तू आताशा तऱ्हेवाईकच वागतेस, आणि तिर्‍हाईताप्रमाणे राहतेस.''

''बाबा.''

''काय?''

''माझ्यामुळे तुम्हांला काही आनंद नाही. मी निराळी राहू का? गावात एखादी खोली घेऊन राहीन. तुम्हांला भेटत जाईन. जर मी तुमच्याकडे यावे असे तुम्हांला वाटले, तर परतही येईन. परंतु तुम्ही अलीकडे मला विटला आहात. मी डोळयांसमोर तुम्हांला नको असते. माझे तुम्हांला सारे वाईटच दिसते. राहू का मी स्वतंत्र? तुमची परवानगी आहे?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel