इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले..

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सागन्याव्रुनच केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel