‘मंगा, मी काय करू?’
‘सांगू?’

‘सांग. समुद्रात उडी टाकू? फास लावू? अंगावर तेल ओतून लावू काडी? सांग.’
‘मधुरी, ती पेटी इकडे आण.’
‘तीत विष आहे? जालीम विष?’
‘तू ती पेटी आण व उघड.’

मधुरीने पेटी आणली व उघडली. तो आत सर्व मौल्यवान दागिने. तिने डोळे मिटले. तिला त्या दागिन्यांना हात लाववेना. ती थरथरत म्हणाली,
‘मंगा, नको मला लाजवू.’

‘मधुरी, मी लाजवणार नाही. माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेव. मी मरणाच्या दारी आहे. अशा वेळेला मनुष्य खरे ते बोलतो. परमेश्वर त्याच्या समोर असतो. त्यामुळे लपंडाव नाही करता येत. तुला मी त्या दागिन्यांनी नटवणार आहे. आण ते इकडे.’

मधुरीने ते दागिने मंगाजवळ नेले. मंगा ते तिच्या अंगावर घालू लागला.
‘मधुरी, मला शक्ती नाही. घाल ते दागिने. मोत्यांनी नटलेली मधुरी मला पाहू दे.’
मधुरीने दागिने घातले. तिच्या डोळयांतून अश्रू गळत होते.

‘मधुरी, डोळे पूस व माझ्यासाठी हस.’
तिने डोळे पुसले. ती हसली.

‘ये, माझ्याजवळ बस.’
‘मंगा, काढून ठेवते दागिने.’

‘ते तुझे आहेत. तुला नको असतील तर मनीला होतील. वेणूला होतील.’
‘मंगा, ते बाळ जगले नाही.’
‘कळले मला, सारा इतिहास कळला.’

‘मंगा, मी वाईट आहे का?’ खरे सांग.
‘नाही हो. तू आपल्या दिवाणखान्यात माझे चित्र टांगले आहेस. समोरासमोर आपण आहोत. माझ्यासमोर तू. तुझ्यासमोर मी. माझ्या डोळयांसमोर शेवटी तू असतेस. तुझ्या डोळयांसमोर शेवटी मी असतो. खरे ना? मी तुझ्या दिवाणखान्यात जाऊन आलो.’

‘जाऊन आलास?’
‘हो. आलो जाऊन. मुलांना भेटून आलो.’
‘मुले काय म्हणाली?’
‘म्हणाली, या चित्रासमोर आई कधी कधी रडते.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel