तो शेतकर्‍याचें साधे कपडे वापरूं लागला, परित्यक्त व दीनदरिद्री यांच्यांत मिसळूं व बसूं-उठूं लागला. विजयी व उन्नत होण्यासाठीं तो नमला होता. आपल्या नबाबी अलगपणापासून तो सामान्य जनतेच्या पातळीवर येऊन उभा राहिला आणि असें करीत असतां सर्व मानवजातीला नैतिक भव्यतेच्या उंच स्थानावर, नवीन उच्च भूमिकेवर तो नेत होता. सारें जग त्याला नवीन धर्मदाता म्हणूं लागलें, त्याचा जयजयकार करूं लागलें; पण त्याच्या कुटुंबीयांनीं त्याला वेडा ठरविलें. आपला पति बुध्दिभ्रष्ट होत आहे असें त्याच्या पत्नीला वाटूं लागलें. त्याचें डोकें ठिकाणावर नाहीं असें वाटून ती घाबरली. तो मानवांच्या बुधुत्वाविषयीं बोलूं लागला कीं त्याचीं मुलें जांभया देऊं लागत व निघून जात. केवळ नि:स्वार्थ जीवन जगणें म्हणजे मूर्खपणाची निश्चित निशाणी असें त्यांना वाटे. आपल्या ध्येयासाठीं त्यानें स्वत:ला खुशाल वाहून घ्यावें ! पण आपल्या सर्व कुटुंबियांचा त्यासाठीं होम करण्याचा त्याला काय अधिकार असा त्यांचा सवाल असे. तो स्वत:च्या घरांतहि जणूं अपरिचित झाला ! त्याची ध्येयें कोण ओळखणार ? त्याचें अंतरंग कोणाला कळणार ? आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रांत तो म्हणतो, ''मला अगदीं एकटें एकटें वाटतें. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसणार नाहीं; पण वस्तुस्थिती अशी आहे खरी. माझें जें सत्य स्वरूप, माझा जो खरा मीं, त्याचा भोंवतालच्या लोकांकडून उपहास केला जात आहे, त्याची ते सारे उपेक्षा करीत आहेत.

अशा मानसिक वेदना होत असतांहि तो आपलें कार्य पुढें रेटीतच होता. ख्रिस्ती धर्माचा अर्थ तो एकोणिसाव्या शतकाच्या भाषेंत समजावून सांगत होता. ख्रिस्तानें ईश्वराचें राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, तर टॉल्स्टॉयनें मानवांचें लोकराज्य स्थापण्याचा यत्न केला. भूतदया, प्रेम, अन्यायाचा अप्रतिकार, हीं तत्त्वें जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठीं त्यानें अनेक निबंध लिहिले, अनेक गोष्टी लिहिल्या. त्याचें पारितोषिक म्हणून चर्चनें त्याला १९०१ सालीं धर्मबाह्य ठरीविलें. तो वृध्द होत चालला, तसा त्याच्या शिकवणींत आणखी एक नवीन रंग आला. तो लोकांपासून, कुटुंबीयांपासून, पत्नीपासून, मुलापासून विमुख झाला होता. तो सर्वांचा होता; पण त्याचें कोणीच नव्हते. सर्व मानवी व्यवहारांकडे तो निराळयाच गूढतेनें पाहूं लागला, दिव्य दृष्टीनें पाहूं लागला. तो संन्यासी झाला. पूर्वी त्यानें व्यभिचाराला धिक्कृत केलें होतें. आतां वयाच्या सत्तराव्या वर्षी तो लोकांना 'संपूर्णपणें ब्रह्मचारी राहावें' असें शिकवूं लागला. ''जो कोणी एकाद्या स्त्रीचा--स्वत:च्या पत्नीचाहि-विषयबुध्दिनें विचार करील. त्यानें तिजशीं व्यभिचार केल्यासारखेंच आहे.''  आपल्या क्षीण इच्छांनुसार जगाची पुनर्रचना करूं पाहणार्‍या बुध्दचें दर्शन एक प्रकारें करुणास्पद असतें. अशा बुध्दला पाहून त्याची कींव येते. 'संपूर्ण ब्रह्मचर्य पाळल्यामुळें मानवजात नष्ट झाली तरी हरकत नाहीं' असें तो म्हणे ! पण त्या वेळीं त्याची बुध्दि व त्याचें मन त्याला हळूहळू सोडून जाऊं लागलीं होतीं. त्याचा गूढवाद त्याच्या बुध्दीला संपूर्णपणें ग्रासूं पाहत होता. रिसरेक्शन (पुनरुध्दर) या आपल्या शेवटच्या कादंबरींत तो एका पाप्याच्या शरीरांत संताचा आत्मा घालतो. या कादंबरींतला नायक नेखलडोव्ह आरंभीं दुष्ट व पापी असतो, पण शेवटीं हुतात्मा होतो. त्याच्या जीवनांत आकस्मिक क्रान्ति होते व थोडक्याच वर्षांत तो एकदम पाप्याचा संत होतो. पाप-शिरोमणीची पुण्य-मूर्ति होते ! अपूर्व बुध्दीच्या टॉल्स्टॉयला जी स्थिती गांठण्यासाठीं जीवनावधि धडपडावें लागलें, ती हा पापात्मा थोड्याशा अवधींतच मिळवितो ! रिसरेक्शन ही कादंबरी म्हणजे जगांतील अत्यंत सुंदर व करुण काव्यांपैकीं एक आहे; पण ती एका वुध्दाची कृति आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel