गरीब शेतक-यांची मुले शाळेत आली तर घरी कोण मदत करणार ?  मुले शाळेत उद्योग शिकून, साक्षर होऊन घरी मदतही आणतात, असे आईबाप पाहतील तर आनंदाने मुलांना शाळेत पाठवतील, नाहीतर सक्ती मानगुटीस बसेल. महात्माजींच्या या शिक्षणपध्दतीत अपार सामर्थ्य आहे. हा प्रयोग पुढे नेऊन जगाच्या शिक्षणशास्त्रात भर घालूया. महात्माजींचा हा पाचवा अवतार.

हिंदुस्थानात लाखो खेडी आहेत. त्यांची का हजार-पाचशे शहरे बनवायची ?

महात्माजी म्हणतात -
1)    संपत्ती एका हाती नको.
2)     सत्ता एका हाती नको.
3)    लोकही एखाद्या शहरात कोंबू नका.

संपत्तीचे, सत्तेचे व प्रजेचे विकेन्द्रीकरण. हिंदुस्थानात जनतेचे आधीच विकेन्द्रीकरण आहे. लाखो खेडयांतून जनता आहे, ती तेथे राहो. तेथेच त्यांचे उद्योगधंदे उर्जितावस्थेत आणू. त्यात शोधबोध करू. स्वस्त वीज पुरवू. सुधारलेला चरका, सुधारलेली तेलघाणी. सारे सुधारू. हे धंदे गांवोगाव राहिले तर संपत्तीचे विकेन्द्रीकरण आपोआपच होईल. काही मोठे कारखाने लागतील. आगगाडी, विमान, विजेची यंत्रे ही कारखान्यांतूनच होणार. हे कारखाने राष्ट्राचे करावे. अशारीतीने यंत्रे व ग्रामोद्योग यांचा अविरोधी समन्वय करावा असे महात्माजी सुचवतात. तदर्थ त्यांनी अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ काढला. त्यांना शोध हवे होते. ते शास्त्राचे उपासक होते. सुधारलेल्या चरख्याला त्यांनी बक्षिस ठेवले होते. महात्माजींचा हा सहावा अवतार.

गाय म्हणजे करूणेचे काव्य असे महात्माजी म्हणाले. कृषीप्रधान राष्ट्राला गायीची जरूरी. गोपालकृष्णाने गायीचा महिमा वाढवला. परंतु आपण म्हशीचे उपासक बनलो. गायीचे दूध औषधालाही मिळत नाही. नुसते पांजरापोळ काय कामाचे ? खाटीकखान्यात गायी जातात का? या परवडत नाहीत. गायी दूध देणा-या, सकस दूध देणा-या व्हायला हव्यात. गायीच्या दुधाने उंची वाढते, आरोग्य सुधारते. बुध्दी सतेज राहते, युरोप-अमेरिकेत सर्वत्र गायीचे लोणी. आपल्याकडे फक्त शब्दच उरले! महात्माजी म्हणाले, 'गाय आर्थिक दृष्टीने परवडेल तेव्हाच ती खाटक्याकडे जाणे बंद होईल. 'यासाठी गायीची अवलाद सुधारली पाहिजे. शास्त्रीय गोरक्षण सुरू व्हायला हवे. गायीचेच दूध पिईन अशी  प्रतिज्ञा करणारी माणसे हवीत. स्वर्गीय जमनालालजींना हे काम अपार आवडले. वर्ध्यांजवळ त्यांनी गोपुरी वसवली. महात्माजींनी सर्वत्र ध्येयवाद कृतीत आणायला शिकविले. गायीच्या शेपटीला हात लावून गायीचा महिमा वाढणार नाही. शास्त्राची उपासना तर वाढेल. महात्माजींचे गोरक्षणाचे कार्य हे सातवे अवतार कार्य.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel