पु ल ह्यांनी वसंतरावाबद्दल लिहिले आहे :
पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्याही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले- 'अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजाहीर असे दण-दणदनदण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!' वसंताच्या स्वभावाताच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऎकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा 'मिजाज' आहे. निखार्व असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! ,म्हणूनच की काय कोण जाने "शतजन्म शोधितांना" 'असे जीत पहा'. यासारख्या किंत 'रवी मी भाळी चंद्र असे धारिया' ह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रिक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे. पण कलावंताला म्युनिसिपाकिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता! वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. 'कट्यार काळजात घुसली' मध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारतली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे! पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. पण तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हभासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही. नागर आणि ग्रामीण हिंदिचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतारावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट! कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला. आधात्म अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती-त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही. आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्दा तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे 'कारकुनी' ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा. पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही. मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिजे आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी -पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमला पाठ असाव्यात त्याला! जिनमध्ये लाइम कॉंडियलचे प्रमाण काय इथपासून ते अवकहडा चक्र म्हणजे इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य! वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चपूंताईचा घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालवणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे. कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनदं घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदाअर मामला आहे. भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी. परवांनचीची गोष्ट. 'कट्यार' मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे भीमसेनने मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. 'वश्याबुवा, हा तुझा तबलजी!" जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणुन रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो. ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात. एवढ्याने काय झाले आहे. हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन "ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या - हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोबंला." अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना, तीन वर्षापूर्वी प्रथम ऎकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या सुलतान षरके यार या गाण्यापासून अगदी परवा ऎकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे. आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला" त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या सेन्हाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी ातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे. वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऎकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते. वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपंणाने मिरवीत जाणारी नाही. दर्याखोर्यातुन बेफाम दौडत जाणार्या जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. वसंताचे गाणे ऎकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. संराच्या हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्यांना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्या बर्या ! वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.