( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

त्यावर तो म्हणाला या तलावात फक्त दोनच रंगाचे मासे आहेत .सोनेरी व सावळ्या रंगाचे.

फक्त या दोनच  रंगांचे मासे कां?आणि मासेमारीला बंदी कां आहे,  त्यासंबंधीची कथा फार मोठी आहे.

उद्या सरोवराचा परिसर फिरत असताना तुम्हाला सांगेन.असे म्हणून त्याने तो विषय बंद केला .

आमची उत्सुकता वाढवून तो दुसऱ्या विषयावर गप्पा मारू लागला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर दुपारचे जेवणाचे डबे बरोबर घेऊन आम्ही पाराशरबरोबर  सरोवराच्या काठी पुन्हा आलो.सरोवराच्या सभोवती एक पायवाट  होती. पायवाटेने फिरता फिरता त्याने आम्हाला सरोवराच्या काठी थोडा वेळ उभे राहून सरोवराचे निरीक्षण करण्यास सांगितले.सरोवरात मासे फिरत होते .सरोवराचे पाणी खरोखरच  स्फटिकासारखे स्वच्छ होते. सरोवराचे पाणी स्वच्छ व नितळ होते.फक्त दोनच रंगाचे मासे दिसत होते. 

पाराशराने माशांसंबंधीची कथा सांगायला सुरुवात केली.सरोवर  निर्मितीच्या अगोदरपासून येथे दोन जमाती रहात होत्या .अजूनही त्या येथे राहतात.या सरोवराच्या उत्तरेकडच्या बाजूला जे उंच उंच  पर्वत दिसतात त्यामध्ये परीस नांवाची जमात राहते. सरोवराच्या पूर्वेला जो सपाट प्रदेश आहे तिथे किरात नावाची जमात  रहाते.

यक्ष  गंधर्व देव इत्यादी जनसमुदाय आपल्याला मानव समुदायापेक्षा उच्च प्रतीचा समजत असे . ही परीस जमातही मानवापेक्षा स्वतःला उच्च समजत असे. (अजूनही समजते) हल्ली जसा जाती जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव असतो,तशीच वृत्ती त्याकाळीही या दोन जमातींमध्ये होती .परीस असे नाव पडण्याचे कारण बहुधा त्या प्रदेशात परीस मिळत असावा असे कांही संशोधकांचे मत आहे. 

किरात ही अर्थातच  मानवसमुदायापैकी एक जमात होती आणि आहे .नावाप्रमाणे शिकार हा यांचा मूळ व्यवसाय होता .थोडीबहुत शेतीही ते करीत असत. शिकार धनुष्य बाणाने केली जाई .परीस पर्वत श्रेणीमध्ये राहात होते .त्यांना सपाटीवर येण्याचे विशेष कारण पडत नसे .परीस व किरात यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार होत नसे.

परीस लोकांची एक खासियत होती .त्यांना पंख होते .हे पंख त्यांना आपल्या शरीरामध्ये ओढून घेता येत असत .त्यांना पाहिले तर ते एखाद्या मानवाप्रमाणेच दिसत .आवश्यकता असेल तरच ते पंख शरीरातून बाहेर काढून उडू शकत असत.

प्रत्येक जमात आपापल्या प्रदेशात सुखी होती. त्यांच्यामध्ये संघर्ष नव्हता.अशीच शेकडो वर्षे गेली .आणि एक दिवस भूकंपातील उलथापालथीमुळे या सरोवराची निर्मिती झाली .सुदैवाने किरात जमातीतील लोक राहत असलेल्या ठिकाणी सरोवर निर्मिती झाली नाही .नाहीतर कदाचित ती जमातच पूर्णपणे नष्ट झाली असती.

सरोवर निर्मिती हे आसपासच्या सर्व जमातीना एक नाविन्य व आश्चर्य होते .स्फटिक सरोवराला सर्वच भेट देत असत.सुरुवातीला सरोवरावर बरीच गर्दी असे.हळहळू सरोवराचा सराव झाला.काहीही नाविन्य राहिले नाही.केव्हातरी कुणीतरी भेट देत असे .सरोवराच्या जवळच्या जमातीना सरोवरातील मासे पकडणे हे एक आकर्षण होते .सुरुवातीला गंगा नदीतील जलचर सरोवरात येत असत.विविध प्रकारचे मासे, सुसर, मगर, कासव, खेकडे,  विपुल प्रमाणात असत .त्यांना खाण्यासाठी पकडत असत.

पुढे केव्हातरी पुन्हा भूकंप होऊन पृथ्वीमध्ये स्थित्यंतर झाल्यामुळे,गंगा नदी व तलाव यांच्यामध्ये एक डोंगर निर्माण झाला.कां कोण जाणे परंतु हळूहळू काही जलचरांच्या जाती नष्ट झाल्या.

मासे व कासव एवढेच शिल्लक राहिले.तलावाच्या किनारी जवळपास  मासे मिळत नाहीसे झाले.झाडांचे मोठे बुंधे पोखरून होड्या तयार करण्यात येऊ लागल्या. तलावाच्या मध्यभागी जाऊन मासेमारी होऊ लागली .

शेकडो चौरस मैल पसरलेल्या विस्तीर्ण जलाशयामध्ये या होड्या फारच तुरळक बिंदुरूप दिसत असत .         

एके दिवशी परीस जमातीच्या राजाची मुलगी आकाशमार्गे जात होती .तिला हे सरोवर अजून माहीत नव्हते.विस्तीर्ण जलाशय स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे सर्व पाहून तिला जलविहाराची इच्छा निर्माण झाली.ती खाली उतरली.आणि सरोवरात स्वच्छंद विहरू पोहू लागली.परीस जमातीतील लोक, स्त्रिया व पुरुष  देखणे, किंचित सोनेरी वर्णाचे ,सोनेरी केसांचे आहेत व होते .ही परी नावांची राजकन्या तर त्यातही जास्त देखणी सुंदर व सोनेरी वर्णाची,सोनेरी केसांची होती.मनसोक्त  जलविहार झाल्यावर ती आकाश मार्गाने आपल्या राज्यात गेली.

नंतर तिला या सरोवरावर वारंवार येण्याचा छंदच लागला .कधी एकटी कधी मैत्रिणींबरोबर ती निदान आठवड्यातून एकदातरी येत असे.विस्तीर्ण जलाशयात जिथे होड्या नसतील, मानवाचे अस्तित्व नसेल, अशा ठिकाणी ती जलविहारासाठी उतरत असे .एके दिवशी असाच तिचा जलविहार चाललेला असताना किरात जमातीचा  एक तरुण तिथे आला .त्याला एक मुलगी जलविहार करताना दिसली .आतापर्यंत त्याने एवढी सुंदर मुलगी पाहिली नव्हती .त्यांच्या जमातीतील सर्व पुरुष व स्त्रिया सावळ्या रंगाचे होते.कथ्थू जरी सावळा असला तरी  धडधाकट धष्टपुष्ट रेखीव पाणीदार डोळे व कमावलेली शरीरयष्टी असलेला होता.  

तो तिथेच एका झुडपात लपून बसला .झुडपातून अनिमिष नेत्रांनी तो तिच्याकडे पाहात होता. त्या दिवशी ती एकटीच होती.काही वेळाने ती पाण्यातून बाहेर आली.तिचे ओलेते सौंदर्य पाहतांना या तरुणाचे भान हरपले.या तरुणाला कथ्थू म्हणत असत.तिला आकाशमार्गाने जाताना पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटले .

नंतर या कथ्थूला हा एक छंदच लागला.तो वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सरोवरावर येउ लागला.असाच एक दिवस परीला न्यहाळीत असताना  परीने त्याला  पाहिले. हा कथ्थू सावळा वर्ण सोडला तर चांगला देखणा होता.एखाद्या दगडात कोरून काढलेल्या शिल्पाप्रमाणे तो दिसत असे.तिचे आपल्याकडे लक्ष गेलेले पाहून तो दचकला.न घाबरता पुढे जाऊन त्याने तिचे कौतुक केले.तो काय बोलतो ते तिला कळत नव्हते .ती काय म्हणाली तेही त्याला कळत नव्हते .दोघांची भाषा भिन्न होती.

परीलाही कथ्थू आवडला . डोळ्यांची भाषा एकच असते .प्रेमाची भाषा एकच असते.ती त्या दोघांनाही अर्थातच कळली . नंतर वारंवार दोघांच्या भेटी होऊ लागल्या .हळूहळू  एकमेकांची भाषा परस्परांना समजू लागली.एक दिवस राजाच्या कानावर ही बातमी गेली.एका सामान्य मानवाला आपली मुलगी भेटते म्हणजे काय ?राजा रागाने हिरवा पिवळा झाला. आपण वरिष्ठ उच्च वर्गाचे वर्णाचे, हा मानव कनिष्ठ वर्गाचा वर्णाचा त्याला आपली मुलगी भेटते ते त्याला सहन झाले नाही . उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, या भावना,हा अहंकार हल्लीसारखाच  त्यावेळीही होता. राजाने राज्यकन्येला, परीला राजवाड्याबाहेर जाण्याची बंदी केली .

इकडे कथ्थू परीची रोज वाट पाहात असे.तिकडे राजवाड्यात परी कथ्थूला भेटण्यासाठी तळमळ होती.तिची अन्न पाण्यावरची वासना गेली.ती हळूहळू थकत चालली .तिची प्रकृती राजवैद्याला दाखण्यात आली.राजवैद्याने तिला मोकळ्या हवेत बागेत फिरण्याचा सल्ला दिला .ती रोज आपल्या सखींबरोबर बागेत फिरायला जावू लागली. राजाची तिच्यावर कडक नजर होती.एक दिवस पहारेकऱ्यांची नजर चुकवून तिने आकाशात उड्डाण केले.तिच्या पाठोपाठ सैनिक तिला पकडण्यासाठी आकाशमार्गे निघाले.

परी स्फटिक सरोवराजवळ उतरली.पाठोपाठ सैनिक येतच होते.ते आपल्याला पकडून नेणार याची  परीला खात्री होती. कथ्थू वेडापिसा होऊन  तिची तिथे वाट पाहात होता.दोघेही एका मोठ्या झुडपात लपले होते .राजाचे सैनिक दोघानाही शोधत होते.             आपल्याला  कुणीही सुखाने जगू देणार नाहीत याची दोघांनाही कल्पना आली .राजाच्या सैनिकानी कथ्थूला ठार मारला असता.तिने सर्व हकीकत कथ्थूला सांगितली.  त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट करण्याचे ठरविले . कत्थूजवळचा बाण घेऊन  परीने आपले पंख कापून काढले. तेव्हापासून परीसजमातीतील सर्वांचे पंख गळून पडले.परीस जमातीतील लोक तेव्हापासून आपणा सर्वांसारखेच आहेत.प्रेमिकांचा शाप त्या सर्वांनाच बाधला. तिची ताकद पंखामध्ये होती.आता ती समर्थपणे पोहू शकणार नव्हती. आकाशात उडू शकणार नव्हती.

एकमेकांना मिठ्या मारून दोघांनीही सरोवरात उड्या घेतल्या.दोघेही पाण्यात बुडाले. त्यांची प्रेतेही वर आली नाहीत.त्या दोघांचे रूपांतर माशात झाले असे म्हणतात .एक सोनेरी मासा व दुसरा सावळा मासा .सरोवरातील इतर मासे यथावकाश मृत्यू पावले.कासवे नष्ट झाली .सरोवरात आता दिसणारे मासे ही परी व कथ्थू यांची प्रजा आहे असे म्हणतात . त्यामुळे सरोवरात फक्त दोनच रंगांचे मासे आहेत.सोनेरी व सावळ्या रंगाचे मासे . 

या सरोवरातील माशांची हत्या करायची नाही.मासे पकडायचे नाहीत.अशी तेव्हांपासून प्रथा पडली.तसे केल्यास ते परीला व कथ्थूला ठार मारल्यासारखे होईल. ती प्रथा आजतागायत चालू आहे .इथपर्यंत रस्ता आज ना उद्या होईल .येथे पर्यटन वाढेल .हॉटेल्स रेस्टॉरंट्स राहण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या सुविधा उपलब्ध होतील .बोट क्लब सुरू होईल. बोटिंगची सोय होईल.परंतु फिशिंग  मच्छीमारी कधीही सुरू होणार नाही.

कथा ऐकताना आम्ही सरोवरासभोवार फेरी मारीत होतो.पाराशर आम्हाला प्रथम परी कुठे उतरली. ती कुठे पोहत असे. ती कथ्थूला नेहमी कुठे भेटे.तिने आपले पंख कुठे कापले .त्या दोघांनी स्फटिक सरोवरात देहसमर्पण कुठे केले .वगैरे जागा दाखवीत होता .त्या त्या ठिकाणी दोघांचे पुतळे तयार करून बसविलेले होते .परीचे पुतळे सोनेरी रंगाचे होते.कथ्थूचे पुतळे  सावळ्या रंगाचे होते.  

पाराशर सांगत असलेली परीकथा ऐकताना संध्याकाळ केव्हा झाली ते आमचे आम्हालाच कळले नाही.आम्ही सर्व स्तब्ध ,उदास झालो होतो .एकप्रकारची  खिन्नताही आली होती.मूकपणे पाराशरसह आम्ही उतरलो होतो तिथे आलो. नंतर दोन दिवस आम्ही स्फटिक सरोवराच्या परिसरात फिरत होतो.किरात जमातीच्या एका खेड्यालाही भेट दिली.एक दिवस आम्ही सरोवरात स्नानही केले .सरोवराचे पाणी अतिशय चविष्ट व आरोग्यदायी आहे.असे पाराशराने सांगितले.पाण्याची चव खरेच अतिशय मधुर होती .

आल्या वाटेने आम्ही परत देवप्रयाग येथे आलो.

परत येताना डोंगर चढल्यावर आम्ही  विहंगावलोकन केले .

*समोर स्फटिक सरोवर पसरले होते.*

*त्या विस्तीर्ण सरोवराकडे पाहताना आम्हाला कथ्थूने सांगितलेली कथा आठवत होती.*

*आमच्या दृष्टीसमोर  आकाशातून विहरत येणारी सोनेरी रंगाची परी दिसत होती.*

* तलावाकाठी बसलेला तिची प्रतीक्षा करणारा सावळा कथ्थूही दिसत होता.*

(समाप्त)

२४/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel