भूता खेतांच्या कथा आम्ही नेहमीच ऐकत आलो आहोत. हडळ, ब्रम्हराक्षस, देवचार असल्या गोष्टी प्रत्येक गावांत ऐकायला मिळतात पण हि कथा मात्र वेगळीच आहे. 

कुलकर्णी ह्यांनी भारतीय पुरातत्व विभागांत अनेक वर्षे काम केले होते. त्यांचे सहकर्मचारी विनोदाने आणखीन काही वर्षांत हे रिटायर नाही झाले तर ह्यांनाच राष्ट्रीय ठेवा घोषित करण्यात येईल असे विनोदाने म्हणत. तसे त्यांचे निवृत्तीचे वय झाले असले तरी त्यांचा दांडगा अभ्यास आणि कामाप्रती रुची पाहून सरकारने त्यांना खास नेमणूक दिली होती. 

पण कोंकणातील जंगलात हे नवीन काम आले होते त्यामुळे ते बरेच दमले होते. अतिशय पुरातन असे गांव जंगलांत सापडले होते. बरीच मातीची घरे, विहिरी, शेतीची अवजारे इत्यादी गोष्टी सापडल्या होत्या आणि ह्या अत्यंत पुरातन म्हणजे किमान ३००० वर्षे जुन्या असाव्या असा कयास होता. कोंकणात इतक्या जुन्या संस्कृती सापडणे हे आश्चर्यच होते. आणि इथे सापडणाऱ्या गोष्टी खरोखर वेगळ्या होत्या. इतर जमाती शी त्याचे काहीही देणे घेणे वाटत नव्हते. त्यामुळे कुलकर्णी ह्यांची बरीच दमछाक होत होती. शेकडो लोक अन स्वयंसेवक ह्या कामात लागले होते आणि प्रत्येक छोट्या गोष्टीचे कॅटलॉग बनवून त्याला व्यवस्थित पणे मुंबईतील लॅब मध्ये पाठवणे गरजेचे होते. 

इतक्यांत कुणी तरी कुलकर्णी साहेबाना आवाज दिला. काहीं तरी मोठे सापडले होते. कुलकर्णी धावत गेले तर एका विहीर सदृश्य खड्ड्यांत एक मोठे मातीचे भांडे होते. त्याला वरून झाकण लावले होते आणि फोडल्याशिवाय आंत काय आहे समाजाने मुश्किल होते. त्यांनी उचलून पहिले तर त्यांचे वजन खूपच कमी होते त्यामुळे त्यांत सोने वगैरे असणे शक्य नव्हते. 

कुलकर्णीनी बराच वेळ त्याचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला कि ह्या मडक्यांत कदाचित जमातीच्या एखाद्या अध्यात्मिक गुरुचे मृत शरीर ठेवले असावे. त्यांनी ते मडके उचलून व्यवस्थित पाने तंबूत ठेवण्याचा आदेश दिला. 

संध्याकाळी काम आटोपून सर्व मंडळी घरी जात होती तेंव्हा अचानक एक व्यक्ती कुलकर्णी ह्यांचा तंबू पुढे हजर झाली. पांढरे धोतर, सदरा आणि खांद्यावर काळी कांबळ आणि हातांत मोठा सोटा घेऊन एखादा गुराखी वाटत होता. कुलकर्णी हे इतिहास आणि समाजशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांना अश्या लोकांबद्दल खूपच प्रेम आणि आदर असायचा कारण ह्यांच्याकडून खूप काही शिकायला त्यांना मिळत असे. 

"साहेब, तुम्ही इथून काही तरी मोठं हलवलं आहे. ते वापस करा. नाहीतर काहीतरी वाईट होईल " तो सांगत होता. 

"तुला रे कसे कळले ? कुणी सांगितले आम्ही काय हलवले आहे इथून ? " कुलकर्णी ना आश्चर्य वाटले कि इतक्या लवकर बातमी बाहेर पोचली कशी. 

"मी दुपारी झोपलो होतो तेंव्हा स्वप्नांत दिसले मला. तुम्ही मिघाई ला हलवले आहे." त्या गुराख्याने कुलकर्णी ह्यांना म्हटले. 

"मिघाई ? हे काय आहे ?" त्यांनी कुतूहलाने विचारले. त्यांचा इतिहासाचा अभ्यास गाढ असल्याने बहुतेक गोष्टी, दंतकथा त्यांना ठाऊक होता पण मिघाई पहिल्यांदाच ते ऐकत होते. 

"इथे एक म्हातारी आई असायची. तिला पशु पक्षी इत्यादींची भाषा यायची. ती शेकडो वर्षे जंगली म्हणतात. तिला साक्षांत देवीचं मानायचे लोक. शेवटी तीचा बुद्धी भ्रम झाला किंवा इतर लोकांना तिची भीती वाटू लागली. तिला मारून एका मोठ्या भांड्यांत घालून पुरले. ती त्या भांड्यातून बाहेर आली तर खूपच वाईट होईल साहेब" त्याने सांगितले. 

"हे तुला कसे ठाऊक ? " 

"हि कथा आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकली. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून. मिघाईला आम्ही लहानपणापासून घाबरतो. म्हणून इथे फिरकत सुद्धा नव्हतो. तुम्हीच आलात आणि इथल्या गोष्टींना हात लावला. बरे नाही केले". त्या गुराख्याने सांगितले. 

"तू नक्की कोण आहेस ?" कुलकर्णी नि त्याला विचारले. 

"मला मंगू म्हणतात. मी इथे जवळच राहतो. आमची धनगरांची जात आहे." त्याने सांगितले. 

"हे बघ मंगू, मला इथल्या सर्व गोष्टींचा प्रचंड आदर आहे आणि हे जे भांडे आहे ना ते मी उघडणार नाही. आमच्याकडे क्स रे मशीन आहे त्यातून न उघडता आंत काय आहे हे आम्ही पाहू शकतो. मग हे भांडे मुंबईला जाईल. तिथे मोठ्या संग्रहालयांत सुरक्षित ठेवले जाईल. आणि ते कधीही उघडले जाणार नाही. पण हे इथे ठेवले तर आज न उद्या कुणी तरी चोर वगैरे येऊन ते खजिन्याचा नादांत उघडेल. त्यामुळे तू काळजी नको करूस" कुलकर्णीना खरोखरच लोकांच्या परंपरांचा आदर होता. 

मंगू ने डोके हलवले. त्याला मेनी नवहते पण तो करणार तरी काय होता ? त्यामुळे तो निघाला. 

उत्खनन संपले आणि विविध गोष्टी ट्रक मध्ये टाकून ते सर्व ट्रक मुंबईला रवाना झाले. कुलकर्णी ह्यांनी सर्व गोष्टींचे व्यवस्थित कॅटलॉगिंग केले होते आणि त्या मडक्यावर त्यांनी मंगू चे मत सुद्धा लिहून ठेवले होते आणि ते उघडू नये आणि त्यांत कदाचित मृत अवशेष असू शकतील असे लिहिले होते. कुलकर्णी सर्व गोष्टींचे लॅब मध्ये क्स रे वापरून विश्लेषण सुद्धा करणार होते. पण त्याच दिवशी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते परलोक वासी झाले. 

बहुतेक सामान तसेच लॅब मध्ये पडून राहिले. कुणालाच त्यांत विशेष रस नसल्याने कुणी हात सुद्धा लावला नाही. काही वर्षे गेली आणि लॅब काही विद्यार्थ्यांचा हातांत आली. लॅब च्या स्टोर रूम मध्ये ते मडके तसेच पडून होते. काव्या आणि रमेश हि विद्यार्थ्यांची जोडी एक कपल म्हणून प्रसिद्ध होती. दोघेही लॅब मध्ये बराच वेळ सोबत घालवायचे आणि त्यांनी प्रणय क्रीडा सुद्धा चालू असायची. 

अशीच एक रात्र होती आणि रमेश विशेष मूड मध्ये होता. "हे चल ना आपण स्टोर रूम मध्ये  जाऊ" त्यांनी काव्याचा हात धरून म्हटले.  "तिथे कशाला ?" तिला ठाऊक होते कशाला पण तिने खट्याळ पणे विचारले. "तू ये तिथे सांगतो" त्याने तिला जवळ जवळ ओढूनच स्टोर रूम मध्ये नेले. तिथे अंधार होता. दोघेही दूरच्या कोपऱ्यांत गेले आणि रमेश ने तिला ओढून तिचे चुंबन घेतले. तिने सुद्धा तसाच प्रतिसाद दिला तर रमेशने तिला एका कपाटाच्या बाजूला नेले आणि त्याने तिचा त शर्ट काढायचा प्रयत्न केला. तिने शेवटी ती शर्ट काढून फेकलाच आणि त्याच प्रणय क्रीडेच्या नादांत तिची पाठ धाडकरून त्या कपाटाला आदळली. कपाटाच्या वर एक मडके ठेवले होते ते घरंगळले आणि वरून खाली पडले आणि फुटले. 

त्या आवाजाने दोघेही घाबरली आणि त्यांचा रसभंग झाला. काव्याने पळत टीशर्ट उचलले आणि घातले. त्यांनी फुटलेल्या मडक्याकडे पाहिले.  मडक्यांत तसे काहीच नव्हते. त्यांनी लाईट्स लावल्या तेंव्हांच त्यांना दिसले कि मडक्यांत एक मृत मांजर होते. आश्चर्य म्हणजे आत्ताच मेले असावे असे वाटत होते. 

"शीट ! हे ना आपण साफ करू आणि फेकून देऊ. कुणालाच कळणार नाही." काव्या म्हणाली. 

"नाही, साफ सुद्धा करायची गरज नाही. आम्ही ना गुपचूप घरी जाऊ. काही दिवसांनी प्युन येईल त्याला हे सापडेल. मडके आपणहून पडले असावे असेच सर्वाना वाटेल." रमेश ची युक्ती होती. त्यामुळे दोघांनीही एकही शब्द न काढता पोबारा केला. 

आश्चर्य म्हणजे पुढील काही दिवसांत कुणीही मेलेले मांजर किंवा फुटलेले मडके ह्याबद्दल काहीही बोलणे काढले नाही. प्युन साफ सफाई सुद्धा करून गेला पण त्यांनी सुद्धा काही म्हटले नाही. काव्या आणि रमेश ने सुद्धा जाऊन पहिले तरी तिथे काहीही अवशेष नव्हते. 

पण काही आठवड्यांत अनेक गोष्टी बदलल्या लॅब च्या बाहेर अचानक मांजरांचे घोळके दिसू लागले. हे मांजरे आली तरी कोठून हे कुणालाच समजत नव्हते. तिथून कोकणातून मंगू ट्रेन पकडून मुंबईत आला. त्याला अनेक स्वप्ने पडली होती. त्यामुळे कुलकर्णी साहेबांची भेट घेण्यासाठी तो आला होता. मिघाई सुटली होती. आता ती बदला घेणार म्हणून मांगूला भीती वाटत होती. कुलकर्णी साहेबांचे निधन झाले हे ऐकून त्याला आणखीनच भीती वाटली. 

कुणी तरी त्याच्यावर दया खाऊन जुने कॅटलॉग पहिले. त्यांत मंगू चे नाव होते आणि त्या मडक्याची माहिती सुद्धा होती. त्यामुळे एका ASI अधिकारण्याने लॅब मध्ये फोन करून मंगूला ते मडके दाखवा असा आदेश दिला. तो आदेश नेमका काव्यालाच मिळाला. काव्या घाबरली. तिने आणि रमेश ने मिळून एक डाव केला. तश्याच प्रकारचे एक मडके त्यांनी कुठून तरी आधीच आणून ठेवले. आणि मंगू येताच त्याला ते मडके दाखवले. 

ते पाहून त्याचा जीव भांड्यांत पडला. रमेश ने त्याला त्याच्या भीतीचे कारण विचारले. मंगूने सविस्तर पणे सांगितले. त्याला स्वप्नातून कथा दिसली होती. मिघाई मांजरीचे रूप घेऊन भटकत असे. तिच्यापासून काहीही लपत नसे. तिला मारणे सुद्धा शक्य नव्हते. शेवटी तीच कंटाळून तिने समाधी घेतली आणि समाधीचा भंग कधीही करू नये अशी सक्त ताकीद दिली. काळाच्या ओघांत हि एक दंतकथा बनून राहिली. मंगू ची जमात खूप जुन्या काळापासून त्यांचं भागांत असल्याने त्यांना हि माहिती थोडीफार होती. 

मंगू ट्रेन ने पुन्हा गावी गेला पण रमेश आणि काव्याच्या हृदयांत भीती घालून गेला. तेंव्हापासून काव्या आणि रमेश मांजरांना घाबरू लागले. मग एक दिवस काव्य गायब झाली. सर्वानी प्रचंड शोध घेतला. रमेश अक्षरशः वेडा झाला. काव्या चे मृत शरीर शेवटी वस्तुसंग्रहालयाच्या तळघरांत सापडले. पोलिसांना म्हणे ते मिळवण्यासाठी अक्षरशः शेकडो मांजरांना तेथून हाकलावे लागले होते. तिचा मृत्यू मांजरांच्या हल्ल्याने झाला होता असे समजले. पुढील बळी रमेश चा होता. रमेश एक दिवस आपल्या रूम वर आला तेंव्हा त्याला समोर आपल्याच बेड वर एक मोठे मांजर दिसले काळेभोर. आपलाच काळ समोर ठाकला आहे हे त्याला समजले. पुढे काय झाले ठाऊक नाही पण त्याने १० व्य मजल्यावरून खाली उडी घेतली. 

मुंबईतील वस्तुसंग्रहालयांत ते केले मांजर अजून फिरते आहे असे म्हणतात. बाकी खरे खोटे देव जाणे ! 


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel