(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .व्यास नदीच्या निर्माणाची ही सत्यकथा आहे असे समजू नये .)

{जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक म्हण आहे.एखाद्या शास्त्रज्ञाने बियास नदीचा उगम असा झाला असा शोध लावला तर  आश्चर्य वाटू नये!!}

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . इसवीसनाच्या  पूर्वीची ही गोष्ट अाहे.महाभारताचा काळ चार पाच हजार वर्षांपूर्वीचा होता असे काही जण म्हणतात .त्या अगोदरची ही कथा आहे .हिमाचल प्रदेशातील उत्तुंग पर्वतरांगांमध्ये घडलेली ही गोष्ट आहे .पंजाबात मुख्य पाच नद्या वाहतात हे आपल्याला माहीत आहेच .रावी सतलज बियास(व्यास) झेलम व चिनाब .त्या महाभारतपूर्व काळात  पंजाबात फक्त चारच प्रमुख नद्या होत्या. बिआस ही नदी त्यावेळी अस्तित्वात नव्हती .जिथे कुलू शहर हल्ली वसलेले आहे त्या ठिकाणी पूर्वी  एक मोठे प्रचंड सरोवर होते .ते त्या वेळी प्रवाहित झालेले नव्हते .या सरोवराच्या उत्तरेला बर्फाळ प्रदेशात एक आदिवासी जमात राहात असे. त्या आदिवासी जमातीचे नाव मुंगटू होते. डोंगर उतारावर पावसाळ्यात व उन्हाळ्यातही  तिथे काही पिके काढली जात .सफरचंद पीच अक्रोड यांच्या काही बागाही होत्या . शिकार हाही एक व्यवसाय होता .वस्तू विनिमय पद्धत होती .वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात असे .विविध प्रकारची फळे विविध प्रकारची धान्ये मासे व मांस यांचा प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे  विनिमय करून सर्वांच्या गरजा भागविल्या जात असत .

लहान लहान नद्या व लहान लहान जलाशय  होते. त्या नद्या व जलाशयांमध्ये  मासेमारी चालत असे.  नेहमी धूसर वातावरण असे.प्रचंड प्रमाणात धुके असल्यामुळे सूर्याचे दर्शन क्वचित  होत असे.

जेव्हा जेव्हा  उगवत्या किंवा मावळत्या  सूर्याचा लालभडक गोळा दिसे त्यावेळी त्यांचा  आनंद गगनात मावत नसे .त्या सोनेरी गोळ्याकडे पाहून ते नाचू लागत असत .त्या मुंगटू जमातीच्या इशान्येला एक मोठी घळ होती .त्या घळीमध्ये वाळूमिश्रीत सोन्याचा चुरा पसरलेला होता. वाळूचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे सुवर्णकण सर्वत्र पसरलेले आहेत असे वाटत असे. 

त्या जमातींमध्ये सोन्याला काहीही महत्त्व नव्हते.सोने वितळवून त्यापासून दागिने करण्याची कला त्यांना अवगत नव्हती . त्यांचे दागिने मणी कवडय़ा रंगीत खड्डे यापासून तयार केली जात .

वर्षातील काही दिवसच उगवता किंवा मावळता सूर्याचा लाल पिवळा गोळा दिसत असे .एरवी तो धुक्याने आच्छादलेला असा उगवत किंवा मावळत असे .पूर्वेला उगवताना किंवा पश्चिमेला मावळताना सूर्य दिसला असे सहसा होत नसे.ज्यावेळी  सूर्याचा पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला उगवताना किंवा मावळताना सुवर्णाच्या रंगाचा गोळा दिसत असे.अशा वेळी आनंदाने बेहोश होत तेथील मुंगटू जमातीचे लोक तो सोन्याचा चुरा हातात  घेऊन दरीमध्ये फेकीत असत .ही दरी अतिशय खोल होती तिथे जाणे किंवा गेल्यास परत येणे फार बिकट होते.जवळजवळ अशक्य होते. अश्याप्रकारे वेळोवेळी फेकलेले ते सुवर्णकण ती सोन्याची वाळू त्या दरीमध्ये सर्वत्र पसरली होती .अशी शेकडो वर्षे गेली .त्या घळीमध्ये असलेला सुवर्णकणांचा,सुवर्ण वाळूचा, साठा संपत गेला.आणि शेवटी तिथे सुवर्णवाळू शिल्लक राहिली नाही.शिल्लक असलेल्या लवाळूतील सुवर्णाचे प्रमाण नगण्य होते .

त्याकाळात लोकवस्ती अतिशय विरळ होती . लोक नदीच्या काठी व सपाट सुपीक प्रदेशात वस्ती करून राहात असत.प्रवास करणे अतिशय बिकट असे.प्रवास केलाच तर सपाटीच्या प्रदेशात केला जाई .जीव धोक्यात घालून डोंगरदऱ्यांमध्ये उंच पर्वतराजीमध्ये बर्फाळ प्रदेशात कुणीही जात नसे. त्यामुळे बाहेरच्या जगाला या मुंगटू जमातीची, त्या सरोवराची,किंवा त्या सुवर्ण रंगाच्या वाळूची काहीही माहिती नव्हती.केव्हातरी एक धाडसी प्रवासी या जमातीच्या प्रदेशांमध्ये आला . सुवर्णवाळू व ती दरीमध्ये फेकण्याची प्रथा याची त्याला माहिती झाली.दरीमध्ये ती सुवर्णाच्या रंगाची वाळू चकाकताना त्याने पाहिली. सूर्यदेवाच्या देवळात ती वाळू जपून ठेवलेली होती. त्यातील काही वाळू त्या जमातीच्या प्रमुखाने नमुना म्हणून दाखविली .त्याला जाताना थोडी भेट म्हणून  दिली .तो आपल्या घरी परत आल्यावर त्याने ती वाळू सोनाराला दाखवली .त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे कण आहेत असे आढळून आले . नंतर त्याने दरीमध्ये अशीच सुवर्णवाळू सर्वत्र पसरलेली आहे.दरी अत्यंत खोल आहे .दरीत उतरणे शक्य नाही .भिंतीसारखा एखाद्या किलोमिटरचा  पहाड असल्यामुळे तो उतरून जाणे शक्य नाही. इत्यादी माहिती सर्वांना दिली .

ही सर्व माहिती मिळाल्यानंतर  कित्येक धाडसी पर्यटक व गिर्यारोहक त्या जमातीच्या प्रदेशात गेले.उंचावरून सूर्याच्या प्रकाशात सोनेरी वाळू चकाकताना दिसत होती. दरीमध्ये उतरण्याचे अनेक प्रयत्न विफल झाले.शेवटी हे प्रयत्न सोडून देण्यात आले .

त्यानंतर काही दशकांनी त्या खोऱ्यात मोठी उलथापालथ झाली.हिमालय हा तुलनात्मक तरुण पर्वत आहे .हिंदुस्थानचा भाग भौगोलिक घडामोडींमध्ये हिमालयाला दाबत असतो .त्यामुळे खोऱ्यांमध्ये भूकंप होतात .नवीन पर्वत, नवीन शिखरे ,नवीन डोंगर निर्माण होतात. काही भूसपाटही होतात.नद्या आपली जागा बदलतात. काही नद्या लुप्त होतात.  काही नवीन निर्माण होतात .हल्ली हे भूकंपाचे व उलथापालथीचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे .त्या काळात अश्या उलथापालथी मोठ्या प्रमाणात होत असत .

अश्या उलाढालीत तिथे असलेल्या सरोवराला अडवणारा पर्वत दुभंगला गेला .आणि त्या तलावातून पाणी वाहण्याला सुरुवात झाली .कालांतराने सरोवर लुप्त झाले. थोडक्यात एका नवीन नदीची निर्मिती झाली .ही नदी ज्या खोऱ्यात सुवर्ण वाळू फेकलेली होतील त्या खोऱ्यातून वाहू लागली.त्यामुळे नदीचे पाणी सोनेरी दिसत असे.तळाला व काठावर ही सुवर्ण वाळू पसरत गेली.तर काही वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळाली .

त्या जुन्या काळात सुवर्ण प्राप्त करून घेण्याचा एक मोठा धंदा या नदीकाठी चालत असे .वाळूमध्ये सोने मिसळलेले असे .ही सुवर्ण मिश्रीत वाळू घेऊन त्यातून सुवर्ण मिळविण्याचा हा उद्योग होता .या उद्योगात कितीतरी लोक एकेकाळी गुंतलेले होते.हळूहळू वाळूतील सुवर्णाचे प्रमाण कमी कमी होत नष्ट झाले.दोन्ही किनाऱ्यांवर केवळ पांढरी वाळूच राहिली .

स्वाभाविक त्यानंतर हा धंदा बंद झाला .ज्या नदीला पूर्वी सुवर्णसरिता असे नाव होते ते नाव काळाच्या ओघात हळूहळू नष्ट झाले.

या नदीच्या काठी व्यास महर्षी यांचा आश्रम होता .ज्यानी महाभारतासारखा प्रचंड सर्वसमावेशक ग्रंथ लिहिला तेच हे व्यास होय.

म्हणजेच सुवर्णसरिता महाभारत काळापूर्वी अस्तित्वात होती.सुवर्ण नाहीसे झाल्यामुळे ते नाव काळाच्या ओघात हळूहळू नष्ट झाले.नदीकाठी व्यास ऋषींचा आश्रम असल्यामुळे त्याला व्यास नदी हे नाव पडले .त्याचाच अपभ्रंश होउन  बियास नदी हे नाव निर्माण झाले.

अशी ही पंजाबमधील व हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध नदी बिआस हिची जन्मकथा आहे.

३१/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel