ऑडिटोरियम हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरला होता .नामांकित पुढार्‍याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते .हे पुढारी अत्यंत शिवराळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.ते कोणाबद्दल काय बोलतील आणि केव्हा बोलतील कसे बोलतील याचा काहीही पत्ता लागत नसे.त्यांच्या बोलण्याला मात्र मजा येत असे .कोणीही त्यांचे बोलणे गंभीरपणे घेत नसे .हशा टाळ्या आरोळ्या यासाठीच सर्व येत असत .तसे गंभीरपणे कुणीच त्यांना घेत नसे. संभाव्य पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे काही जण पाहत असत .लोकांचे काही सांगता येत नाही .कुणाला केव्हा डोक्यावर बसवतील कुणाला केव्हा पायदळी तुडवतील सांगता येत नाही.

या नेत्यांबद्दल आणखी एक अफवा होती .कारण अज्ञात होते परंतु ते आपल्या शत्रूला मिळालेले आहेत अशी अफवा होती.जर ते निवडून आले तर देशाचे वाटोळे होईल अशी प्रामाणिक भावना अनेक जणांची होती .कोणत्याही परिस्थितीत त्यांना सत्तेवर येऊ द्यायचे नाही  अशी काही जणांची योजना होती .विरोधी मत हे असलेच पाहिजे .लोकशाहीमध्ये ते अत्यंत आवश्यक आहे .विरोधी मतांचा आदर केला पाहिजे .जो विरोध करतो त्याला हाणून पाडायचे त्यांचा खून करायचा ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे .विरोधी मतांचा मुकाबला दंडुकेशाहीने नव्हे तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार मांडून केला पाहिजे ही जाणच काही लोकांजवळ नसते .जो विरोध करतो त्याला नष्ट करा अशी प्रवृत्ती असते .माणसे मारता येतात .माणसे गाडता येतात.परंतु विचार जिवंत राहतात हे बर्‍याच लोकांना कळत नाही.मांडला विरोधी विचार केला त्याला खलास अशी ही भयानक प्रवृत्ती आहे .

दुर्दैवाने अशी प्रवृत्ती सदानंद व शिवम या दोघांजवळ होती .हा पुढारी कसाही असो विचारांचा मुकाबला नेहमी विचारानेच केला पाहिजे यावर या जोडगोळीचा विश्वास नव्हता .या पुढाऱ्याला संपवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली होती .

थोड्याच वेळात ते नामांकित पुढारी आले .त्यांच्या मागे पुढे चमच्यांचा घोळका होता .त्यांना झेड दर्जाची सिक्युरिटी होती .डोळ्यात तेल घालून ही सिक्युरिटी सर्वत्र पाहात होती .त्याशिवाय त्यांच्या पक्षाचे बाऊन्सर त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूला होते .माणसांची एकच गर्दी उडाली होती .सभागृहातच काय परंतु सभागृहाच्या आवारातही घुसणार्‍यांची  कसून तपासणी केली जात होती . सिक्युरिटीने कार्यक्रमाच्या अगोदर चोवीस तास सभागृहाचा ताबा घेतला होता.कसून सर्वत्र तपासणी केली जात होती . जिकडे तिकडे सीसीटीव्ही लावलेले होते .या सर्व कडक तपासणी मधून सदानंद व शिवम यांना आपला कार्यभाग साधायचा होता.त्यासाठी त्यांनी एक अफलातून योजना आखली होती .बऱ्याच जर तर वर त्यांच्या योजनेची यशस्विता अवलंबून होती .

तासभर नेत्याचे खणाखण भाषण झाले .विरोधी मते नव्हे तर विरोधी मते मांडणारे सुद्धा वाटेल तसे पायदळी तुडविले गेले .अर्थात हे शाब्दिक पायदळी तुडविणे होते .चमचे लोकांनी टाळ्या वाजविल्या .सर्वसाधारण जनता करमणुकीसाठी आली होती त्यांची करमणूक झाली .आभार प्रदर्शन वगैरे झाले.नेते परत निघाले .सभागृहाच्या दरवाज्याजवळ त्यांची सही घेण्यासाठी बर्‍याच जणांची गर्दी झाली होती. त्या गर्दीमध्ये सिक्युरिटी व बाउन्सर जरा आगेमागे झाले.

दरवाज्यात असतानाच सदानंदने नेम धरून तीन गोळ्या झाडल्या.आदरणीय नेते दरवाजातच कोसळले .शिवम ऑडिटोरियममध्ये दरवाजा जवळच होता .हातातील पिस्तूल त्याने त्याच्याकडे फेकले .शिवमने लगेच त्या पिस्तुलातील उरलेल्या गोळ्या सभागृहात छताकडे अस्ताव्यस्त  मारीत पिस्तूल रिकामे केले.या धडाक्याने सर्वत्र धावपळ व गदारोळ उडाला .झडप घालून शिवा व सदा दोघांनाही पकडण्यात आले.सदाने गोळ्या झाडताना अनेक जणांनी पाहिले होते .सदाने पिस्तुल फेकतानाही अनेक जणांनी पाहिले होते .शिवाच्या हातातील पिस्तुलाने माननीय नेत्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या याबद्दल कुणालाही संदेह नव्हता .माननीय नेत्यांना अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले .शिवम व सदा याना ताब्यात घेण्यात आले.शिवाच्या हातातील  पिस्तूल जप्त करण्यात आले.माननीय नेत्यांचा मृत्यू झाला .त्यांची अंत्ययात्रा व इतर गोष्टीत पोलीस एक दोन दिवस गुंतलेले होते .

फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोलीस आणि इतर खाती यांनी केस तयार करण्याला सुरुवात केली .शिवाच्या हातातील पिस्तुलाने गोळ्या झाडण्यात आल्या नाहीत असे आढळून आले .नेत्यांच्या शरीरातील गोळ्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्या यांचा कुठेच ताळ मेळ नव्हता.शिवाने गोळ्या झाडल्या त्यासाठी तो गुन्हेगार होता परंतु त्यामुळे कुणाचा मृत्यू झाला नव्हता .त्याला माननीय नेत्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरता येत नव्हते .कारण त्यांच्या हातातील पिस्तुलाने मृत्यू झाला नव्हता .सदाने गोळ्या झाडताना सर्वांनी पाहिले होते.परंतु त्याच्याजवळ पिस्तूल नव्हते . ते त्याने शिवाकडे फेकले हेही सर्वांनी पाहिले होते .परंतु शिवाजवळील वेपन मर्डर वेपन नव्हते.मर्डर वेपन सापडणे आवश्यक होते .दुसऱ्या कुणीतरी गोळ्या झाडल्या आणि मला बळीचा बकरा बनवण्यात आले असा कांगावा सदाने केला असता.

मुळात एवढी टाइट सिक्युरिटी असताना पिस्तूल सभागृहात आलेच कसे हा मोठा प्रश्न होता .नेत्यांच्या जवळील कुणीतरी फितूर असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही असे सर्वांचे म्हणणे होते.हा फितूर कोण हे शोधणे महत्त्वाचे होते .अन्यथा दुसऱ्या कुणा नेत्याच्या बाबतीत असाच प्रसंग कदाचित पुन: घडला असता .

सदा व शिवाने पुढील प्रमाणे योजना आखली होती .चार दिवस अगोदरच दोघांनी पिस्तुले सभागृहात नेली होती .प्लॅस्टिक पिशवीत बंद केलेली पिस्तुले टॉयलेटमधील फ्लशिंग टँकमध्ये  ठेवण्यात आली .सभागृहाच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये जे छत होते त्यावरती चित्रविचित्र डिझाइन्स काढलेली होती .त्यामध्ये दिसणार नाही अशाप्रकारे मॅग्नेट बसवण्यात आला .टँकमधील पिस्तुले ताब्यात घेतल्यानंतर शिवाकडे दोन महत्त्वाची कामे होती.पिस्तुले स्वत:जवळ बेमालूमपणे लपविणे.पिस्तुले अत्याधुनिक  होती.ती हाताच्या मुठीमध्ये सहज मावतील अशी होती .

माननीय नेत्यावर क्षणार्धात गोळ्या चालविणे .गोंधळामध्ये तेवढ्याच चपलतेने पिस्तुल वर उडविणे.अशा कसबाने उडविणे की छतावर फिट केलेल्या मॅग्नेटला ते चिकटून बसेल.त्याच क्षणी दुसरे पिस्तुल शिवाकडे उडविणे .या गोष्टी इतक्या सफाईने होणे आवश्यक होते की कुणाच्याही ते लक्षात येऊ नये .सदाने हे सर्व सफाईने केले त्याच्या कसबाने कौशल्याने व दैव त्याच्या बाजूला होते म्हणून  सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्या.संधी मिळाल्यावर चार दिवसांनी छताला चिकटलेले पिस्तुलही गायब करण्यात आले .

खून झाला .मर्डर वेपन सापडले नाही .शिवाला पकडले परंतु त्याच्यावर काही आरोप ठेवता आला नाही.केवळ पिस्तुल बाळगणे व फायरिंग करणे यासाठी त्याला काही शिक्षा भोगावी लागली .सदानंद तर कोणताही आरोप ठेवल्याशिवाय सही सलामत सुटला . त्यांच्या योजनेमध्ये जराजरी मागे पुढे झाले असते तर दोघेही फाशी गेले असते .

१५/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel