थंडीमुळे आज
चाफा ही गारठला होता,
सुगंध पसरायला जरा
त्याला वेळच झाला होता.

काटे असूनही गुलाब
थंडीत सुंदर दिसत होता,
केसात माळला जाईन..
की देवाच्या चरणी जाईन
याचाच विचार करत होता.

अबोली मात्र
शांत बसली होती,
थंडीची मखमली
चादर तीने लपेटली होती.

मोगऱ्याला उठण्यास
जरा उशीरच झाला होता,
पण.. सुवास मात्र त्याने
मध्यरात्रीच दरवळला होता.
रात्रभर जागरण करून

रातराणी नुकतीच उठली होती,
पानावरच्या दवबिंदुशी
काही तरी गुजगोष्टी करत होती.
गंधाळलेल्या नजरेनी

सदाफुली गुलाबी सदैव मोहरलेली
सुंगधाची उणीव नसलेली
मात्र रंगाने मोहून घेणारी
मोग-च्या बहरण्याची वाट पहात होती

निशीगंध सारे पहात होता,
थंडीतल्या कोवळ्या किरणाना
तो हसत अंगावर घेत होता.

प्राजक्त मात्र आपला सडा टाकून
मोकळा ही झाला होता
दुसऱ्या ला भरभरुन देता यायला हवं
रितेपणातली समृद्धी तो जगतो

गुलाबी थंडीतही ही
फुलांची अशी मजा चालली होती,
संकटातही मजेत रहा, असे
प्रत्येक पाकळी जणू सांगत होती.

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel