_*ऑटोभास्कर!*_

_लेखक- सु. र. कुलकर्णी._

हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटोभास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने तो आपली ओळखपण सांगतो.
याची माझी पहिली ओळख एका पावसाळी रात्री आकरा वाजता झाली. औरंगाबादहून मी नगरच्या ताराकपूर बसस्टँड वर उतरलो होतो.
मी आणि बायको काहीश्या चिंतेतच होतो. कारण या वेळी रिक्षा मिळणे कठीण असल्याचा आजवरचा आमचा अनुभव होता. आणि मिळालीच तर अवाच्या सव्वा मागतात. त्यात आज पावसाची भर पडली होती.
समोर एक ऑटो उभा होता, आम्हाला पाहून ऑटोवाल्याने रिक्षा जवळ आणून उभा केली. "प्रोफेसर चौकातून डावी कडे----" मी पावसात भिजत त्याला पत्ता सांगत होतो.
"बरं! पैले गाडीत बसा! मग सांगा पत्ता!"
"पण किती घेणार?"
"दोनलाख! काका, पैले बसा!" मी गुमान सामानासह बसलो. हा किमान शंभर रुपये तरी घेणार! नक्की! दिवस असता तर, पन्नास साठ रुपयात घरी गेलो असतो.
बायको जाम गाल फुगवून बसली होती. 'नेहमी, मेलं लेचंपेचं काम! आधी भाडं पक्क ठरवून बसलेले बरं असतं. पण या बाबाला व्यवहार कसा तो जन्मात जमला नाही! घरी पोहचल्यावर रिक्षेवाला 'द्या दोन शे!' म्हणलं तर? तर देऊन मोकळे होतील!' हा तिचा मनातला विचार, मला स्पष्ट वाचता येत होता.
घराच्या पोर्च पर्यंत त्याने रिक्षा आणून उभी केली. सामानातली जड बॅग त्याने ओट्यावर ठेवली. मी त्याच्या हातावर शंभराची नोट ठेवली. त्याने ती खिशात घातली. मी दार उघडण्यासाठी वळणार, तोच त्याने मला आवाज दिला.
मी बायकोला दार उघडण्यासाठी किल्ली दिली आणि त्याच्याकडे वळलो. "कारे? कमी वाटतात का?"
"हा! हे घ्या!" त्याने पन्नास रुपये मला परत दिले!
"बरोबर झाले का?"
"हो. बस झाले. मी इतकेच घेतो!"
"तू, नगरचा दिसत नाहीस!"
"इथलाच आहे!" तो निघून गेला.
"घेतले ना दीडशे? म्हणून म्हणते आधी ठरवत जा!" बायको घरात पाय टाकल्याबरोबर तडकली.
"नाही! फक्त पन्नास घेतले!"
"तरी ज्यास्तच घेतले! आधी घासाघीस करून ठरवलं असतं तर, चाळीस मध्ये आला असता!" ही, अशीच आहे. तिला पैसे चाळीस-पन्नास महत्वाचे नव्हते, मी आधी भाडे ठरवले नाही याचा राग होता. ०००
एकदा मी बँकेतून पेन्शन घेऊन घरी निघालो होतो. मागून हा आला. "चला काका, घरी सोडतो! मी त्याच भागात जातोय!"
"अरे जाईन कि चालत."
"कुठं उन्हात जाणार? अनमान नका करू बसा!" त्याच्या आवाजात एक प्रकारचा आग्रह होता. मी बसलो.
चाळीशीच्या आसपास असावा. थोडासा स्थूल, गालावर दाढीची काळी पांढरी खुंटं वाढलेली. चेहऱ्यावर सात्विक भाव, अन गळ्यात तुळशीची माळ. "तुझं नाव काय आहे?" मी विचारलं.
तेव्हड्यात त्याचा फोन वाजला. "हॅलो, बोला आजी?... हा, आलोच! तिकडचं येतोय!"
"काय झालंय?"
"अहो, आजीला दवाखान्यात न्यायचंय. त्या एकट्याच हैत! तुमाला सोडतो कोपऱ्यावर, मग जाईन त्यांच्याकडं."
"का? त्यांच्या घरी नाही का कोणी?"
"पोरगा गेला आसन कामाला. सुनंचं पटत नाही म्हातारीशी. पोरगा माझ्यावर दवाखान्याचं काम टाकून जात असतो. आजीला तर माझ्या वर त्यांच्या पोरापेक्षा ज्यादा विश्वास आहे."
हे जरा मला अजब वाटलं. पोटच्या पोरापेक्षा एका रिक्षेवाल्यावर विश्वास? "म्हणजे? काय जादू केलीस?"
"जादू काय नाय. त्येन्ला दवाखान्यात नेतो, डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठीची औषधे घेतो, मग फळाच्या गाड्यावर नेतो. केळी, मोसंबी घेत्यात. मग दोन गुड्डेची बिस्कीटं पुड्याची खरेदी असते. म्हातारपणी काय तरी लागतं तोंडात टाकायला. मग घरी सोडतो!"
"तू, इतकावेळ देतोस? मग पैशे पण ---"
"नाही काका! पैशे फक्त पन्नासच घेतो!"
"अरे, तासभर तरी मोडत असेल ना?"
"हो, पण माझं पैशाचं नुकसान होत नाही. वर आजीचा आशीर्वाद बोनस मध्ये असतो!"
पुन्हा त्याचा फोन वाजला. असेच कोणीतरी बोलावत होते.'तासभर लागलं!' त्याने उत्तर दिले.
"मी बोलावलं तर येशील?" मी विचारले.
"हा! घ्या माझा नंबर."
मी त्याचा नंबर मोबाईल मध्ये घेतला. "काय नावांनं सेव्ह करू?"
"ऑटोभास्कर करा नाव!अन, मला एक मिसकाॅल मारा, म्हणजे तुमचा नंबर येतो माझ्याकडे."
मी कॉल केला. त्याने तो सेव्ह करून ठेवला. घराजवळच्या कोपऱ्यावर सोडून तो आजीला घेऊन जाण्यासाठी निघाला.
"अरे थांब. पैशे घे. इथवर आलास ना?"
"नको काका, इकडं यायचंच होत. तुमच्यासाठी काय वेगळं पेट्रोल लागलं नाही. खर्च नाही मग उगाच पैशे कशाचे?" तो निघून गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel