आज स्वतःला अभिमानाने हिंदू म्हणवून घेणाऱ्या भारतीयांचे पूर्वज सनातन काळापासून या भारतभूमीत राहत होते. कित्येक विदेशी आक्रमणानंतर आपल्या पूर्वजांनी आपली हिंदू ही ओळख कायम ठेवली आहे. हिंदू हा जाती-पंथवाचक शब्द नसून तो पुरातन  काळापासून भौगोलिक अर्थाने वापरला जाणारा व्यापक असा राष्ट्रवाचक शब्द आहे. हिंदू या शब्दापासून हिंदुत्व हा शब्द निघाला आहे. हिंदू या शब्दाची व्याख्या करताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात...

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ||"

म्हणजेच, सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुनदीपासुन ते सिंधु सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती, जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु! मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना. सावरकरांनी हिंदू या शब्दाची केलीली व्याख्या सर्वसामावेशक असून त्यात सनातन हिंदूंपासून ते हिंदुस्थानात निर्माण झालेले सर्व पंथ, मत, संप्रदाय देखील येतात.

''हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थान प्रचक्षते॥''

म्हणजेच, हिमालय पर्वतापासून ते हिंदू महासागरापर्यंत पसरलेल्या देव निर्मित प्रदेशाला हिंदुस्थान म्हटले जाते. बृहस्पती आगम या पुरातन ग्रंथामध्ये हिंदुस्थानाच्या केलेल्या व्याख्येतून आपल्याला हिंदुभूमीचा बोध होतो. त्यामुळे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. जाती-पंथ, भाषा-प्रांत, मत-संप्रदाय या भिन्नता असूनही, हिंदुत्व हा आपल्या राष्ट्राला जोडणारा समान धागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान या पराक्रमी वीरांनी परकीय आक्रमकांपासून आपल्या मातृभूमीचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणाला लावले. या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, परकीय आक्रमकांशी संघर्ष करून देव, देश आणि धर्मरक्षणाचे व्रत स्वीकारलेल्या आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या आपल्या पूर्वजांमुळेच आपली 'हिंदू' म्हणून असणारी ओळख टिकून आहे. म्हणूनच हिंदूंना आपण हिंदू असल्याचा अभिमान वाटायला हवा. परंतु आपल्या देशावर लादलेली तथाकथित सेक्युलरिझमची संकल्पना आपल्याला असा अभिमान देखील बाळगू देत नाही. म्हणूनच आज आपल्या देशात 'गर्व सें कहो हम हिंदू है।' असे म्हणणे जातीयवादी, संप्रदायिक मानले जाते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची केलेली सर्वसामावेशक व्याख्या हिंदूंना आपल्या मूळ अस्तित्वाचा, राष्ट्रीयत्वाचा बोध करून देणारी असल्याने, आपल्या देशात सेक्युलरिझम ही भ्रामक संकल्पना पसरवू इच्छिणाऱ्या काँग्रेस सरकारने सावरकरांना जातीयवादी ठरवून नेहमीच त्यांचा अपमान केला. इतकेच नव्हे तर आजवर धर्माचा मार्ग दाखवणाऱ्या हिंदू साधू-संतांना ढोंगी, अंधश्रद्धा पसरविणारे दाखवून, त्यांच्या विरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची बदनामी करून, त्यांची समाजातील प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे सर्व कशासाठी? तर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी. हिंदूंना आपल्या हिंदुत्वाचा बोध होऊ नये आणि त्यांनी सतत जाती-पंथ, भाषा-प्रांत, मत-संप्रदाय यांवरून भांडत रहावे याकरिता हिंदूंना हिंदूंपासून तोडण्याचे हे एक षड्यंत्र आहे. आपल्या देशात राहून देशाची अखंडता तोडू पाहणाऱ्या अनेक राष्ट्रविरोधी शक्तींचा हाच एकमेव अजेंडा आहे. म्हणूनच देशातील ज्या-ज्या ठिकाणाचा हिंदू  स्वतःला हिंदू समाजापासून वेगळा मानून असंघटित राहिला त्या-त्या ठिकाणी त्याच्यावर अत्याचार केले गेले किंवा त्याला धर्मांतरित तरी केले गेले. अशा ठिकाणी कालांतराने हिंदू अल्पसंख्याक होतो. त्याचे त्या ठिकाणी जगणे मुश्किल होते. यातून त्याच्या पदरी फक्त आणि फक्त संघर्षच येतो. आशा परिस्थितीत त्याच्या पुढे दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक तर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करणे किंवा ते ठिकाण-प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास जाणे. हे सर्व घडण्यामागचे मूळ कारण जागृकतेचा अभाव हेच आहे. खरे पहता आपल्या देशातील आजच्या मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांचे पूर्वज हिंदूच होते; परंतु हे सत्य नेहमीच नाकारले गेले. परकीय आक्रमकांनी कधी प्रेमाने, गोडी-गुलाबीने तर कधी बळाने त्यांना धर्मांतरित केले होते. हा खरा इतिहास नेहमीच लपवला जातो. कारण हिंदू जागृत झाला, संघटित होऊन एक झाला तर आपल्याला त्याच्यावर सत्ता गाजवता येणार नाही; या गोष्टीची देशात सत्तर वर्षे सत्ता गाजवलेल्या  काँग्रेस पक्षाला भिती वाटत होती. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीयांमध्ये मतभेद निर्माण करून राज्य करण्याच्या इंग्रजांच्या कुटील नीतीला काँग्रेसने पुढे नेले. परिणाम स्वरूप जाती-पंथ, भाषा-प्रांत, मत-संप्रदाय यामध्ये विभागलेल्या हिंदू समाजातील एकात्मतेची भावना दुबळी होऊ लागली. यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या बहुसंख्य भारतीयांच्या मनात आपल्या राष्ट्राची सुस्पष्ट कल्पना देखील तयार झालेली नसते. त्यातूनच त्यांच्या मन-मस्तिष्कावर लहानपणापासूनच सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष राष्ट्र या संकल्पनांचा परिणाम व्हावा यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केलेले असतात. त्यातूनच हिंदुत्व व राष्ट्रीयत्व या भिन्न गोष्टी आहेत अशी त्यांच्या मनाची धारणा तयार होते.

भारताची जगात असलेली ओळख ही भारताच्या प्राचीन संस्कृतीमुळे आहे. सनातन काळापासून चालत आलेली ही भारतीय संस्कृती म्हणजेच  हिंदू संस्कृती आहे. या संस्कृतीची विशेषता म्हणजे ही संस्कृती सर्वात प्राचीन असूनही तितकीच वैज्ञानिक आहे. चिरंतन आहे. जगाला शाश्वत सत्याचा अनुभव करून देणारी आहे. या संस्कृतीने जगाला मानवतेची शिकवण, उच्च आदर्श, नीतिमूल्ये आणि समस्त विश्वाच्या कल्याणासाठी त्याग आणि सेवा हे सूत्रही दिले. याच संस्कृतीच्या वारसदारांना आज स्वतःच्या अस्तित्वाचा बोध नसल्यामुळे आपल्या राष्ट्रापुढे नानाविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे  हिंदूंना आपल्या राष्ट्रीयत्वाचा बोध झाल्याखेरीज आपल्या राष्ट्राची मूळ हिंदू चेतना जागृत होणार नाही. आपल्या राष्ट्राचा आधार असलेल्या या हिंदू चेतने विषयी बोलायचे झाल्यास शब्द नेहमीच अपुरे पडणार आहेत. तरी देखील मोजक्या शब्दात मांडायचे झाल्यास मी म्हणेन...

काळाच्या कसोटीवर संघर्ष करताना आत्मविस्मृत झालो असलो तरी,

हृदयात कुठेतरी सुप्तावस्थेत दडलेल्या संवेदना सांगतात....

ज्यांनी पशुसम जीवन जगणाऱ्या प्राण्यास  'मानव' ही ओळख  मिळवून दिली... ते आम्ही आहोत.

ज्यांनी  विश्वाचा वेध घेऊन, दूरदर्शी दृष्टीने, सभ्यता  व संस्कृतीचा  पाया रचला... ते आम्ही आहोत.

ज्यांना शरीर,मन,बुद्धीच्याही पलीकडे जाऊन आत्म्याचा साक्षात्कार करून घेता आला... ते आम्ही आहोत.

ज्यांनी चरा-चरात ईश्वराचे अस्तित्व जाणले, ज्यांनी वसुधैव कुटूंबकम्  मानले... ते आम्ही आहोत.

ज्यांनी आपली ओळख कायम ठेवून आश्रितांना अभय देऊन, सर्वांना सामावून घेतले... ते आम्ही आहोत.

लोभ, असमाधान, महत्त्वकांक्षा, स्वार्थाने परिसीमा गाठली तेव्हा शाश्वत सुखाचा ज्यांनी शोध लावला... ते आम्ही आहोत.

अनन्य अन्याय अत्याचार झाले तरीही अहिंसेच्या मार्गाने जगाला शांतीचा संदेश ज्यांनी दिला... ते आम्ही आहोत.

असं असूनही ज्यांच्यामुळे जगाला स्वाभिमान, पराक्रम, पुरुषार्थाची ओळख झाली.... ते आम्ही आहोत.

ज्यांना जनकल्याणासाठी त्याग, तपस्या, निस्वार्थ परोपकार भावनेने फक्त देणेच माहिती.... ते आम्ही आहोत.

ज्यांनी अनंत काळापासून भ्रमित वाटसरुंना मार्ग दाखवण्याची जबाबदारी आपणहून स्वीकारली... ते आम्ही आहोत.

ज्यांनी युध्दजन्य परिस्थितीत विश्वविजय करून, गुरुदक्षिणा म्हणून पृथ्वीे अर्पण केली... ते आम्ही आहोत.

ज्यांकडे देवतांनाही दान मागण्याची वेळ येते व जे स्वप्नातही दिलेल्या वचनाला जागतात... ते आम्ही आहोत.

ज्यांचे चारित्र्य,सद्गुण,आचार,विचार,आचरण पाहून देवतांनाही ज्यांच्याशी मैत्री कराविशी वाटते... ते आम्ही आहोत.

ज्यांनी स्वाभिमान दुखावता,  देवतांनाही आव्हान देऊन कर्तृत्वबळावर देवर्षी पदाची प्राप्ती केली... ते आम्ही आहोत.

गौरवशाली इतिहास असलेल्या देवदुर्लभ पुण्यभूमीत ज्यांना जन्म प्राप्त झाला, असे भाग्यवान पुण्यवान... ते आम्ही आहोत.

याच इतिहासाचे स्मरण ठेवून, पुनरुत्थानातुन, मातृभूच्या परम वैभवासाठी कार्य तत्पर असणारे... ते आम्ही आहोत.

जे 'राष्ट्रीयत्वाची' हरवलेली चेतना जागृतीसाठी सज्जनांचा 'हिंदू चेतना संगम' घडवून आणू शकतात... ते भारतीय आम्ही आहोत.

जे तत्व भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आशा ना-ना प्रकारे व्यक्त केले गेले असले तरी परम सत्याचे ज्ञान असणारे... ते सनातनी हिंदू आम्ही आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel