संंत तुकाराम

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

संत तुकारामतुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel