समुद्र मंथनातून जेव्हा अमृतकुंभ बाहेर आला तेव्हा देवांना प्रश्न पडला की, जर दानवांनी या अमृताचे प्राशन केले तर ते अमर होतील आणि अखिल विश्वाला सळो  कि पळो करून सोडतील. तेव्हा हे टाळण्यासाठी देवांनी इंद्रपुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पळून जाण्यास सांगितले. पण दानवांनी मात्र हा अमृतकुंभ मिळवण्यासाठी घनघोर युद्ध केल. या युद्धकाळात अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. या सांडलेल्या अमृत थेंबानी पावन झालेली एक जागा म्हणजे; अमृतवाहिनी गोदावरीच्या तीरावर वसलेली टुमदार 'नाशिकनगरी'!

सत्ययुगात प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेली 'पंचवटी' अन् द्वापारयुगात 'जनस्थान' म्हणून नामाभिधान लाभलेली पुण्यभूमी! साधारणतः ख्रिस्तपूर्व दिडशे वर्षांचा काळ असावा तो, जेव्हा भरतभूमीवरील सगळ्यात मोठी बाजारपेठ येथे उदयास आली होती. पुढे सातवाहन काळात इथले रेशीम युरोपीय देशांत प्रसिद्ध झाले आणि 'जनस्थान' या नावाचे खरेच सार्थक झाले. सुंदर अशी 'त्रिकंटक' नामक बौद्ध लेण्यांची या भूमीवर निर्मिती झाली ती याच सातवाहन काळात! 'त्रिकंटक'लेणी म्हणजे आजच्या काळातल्या 'पांडवलेणी' ! या पुण्यनगरीस फार मोठी अध्यात्मिक, तसेच कला-अविष्कारांची परिपूर्ण अशी परंपरा लाभली आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेची नासिका कापली म्हणून पंचावातीचे पुढे 'नासिक' हे नाव उदयास आले अशी प्रसिद्ध आख्यायिका आहे. इथे असणारी फुलांची बाजारपेठ आजही प्रसिद्ध आहे. इ.स.१४८७ मध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली याच फुलांच्या बाजारपेठेमुळे नासिकला 'गुलशनाबाद' म्हणजे फुलांचे शहर म्हटले जाऊ लागले. पुढे इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी ही जागा काबीज केली आणि ती 'नाशिक' झाली.

इ.स.१७३८ साली रामकुंड परिसरात प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराची बांधणी झाली. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे देशातील हे असे एकमेव शिवमंदिर आहे जेथे महादेवासमोर नंदी नाही. यामागे अनेक आख्यायिका आहेत. महादेवांना पापक्षालनासाठी रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला नंदीने दिला होता. त्या अर्थाने नंदी महादेवाचा गुरु झाला आणि त्याच्या सन्मानार्थ नंदीची सेवा याठिकाणी महादेवांनी घेतली नाही. रामकुंड अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण परिसर आहे. उगमापासून पूर्व दिशेला वाहत येणारी गोदावरी या स्थळावर दक्षिणमुखी होते. यामुळे ती दक्षिण गंगा नावानेदेखील ओळखली जाते. देशातल्या प्रमुख नद्यांपैकी ती एक आहे. रामकुंड परिसरातील तिच्या अस्तित्वाला विशेष महत्व आहे, याचे कारण तिच्यात असणारी अस्थिविघटनाची शक्ती ! अस्थि विसर्जित करण्यासाठी अनेक वर्षांपासून आजतागायत लाखो लोक येऊन गेले असतील. मात्र गोदामाई रामकुंडात अस्थि विरघळून टाकण्याची किमया कशी करते हे रहस्य उलगडू शकलेले नाही आणि कधी अस्थिअवशेषही सापडलेले नाहीत ! याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात मोक्षप्राप्तीसाठी रामकुंडात शाहीस्नान करण्याच्या उद्देशाने दर बारा वर्षांनी लाखो लोक येऊन जातात.

याच परिसरात सुंदर नारायण मंदिर, दहीपूल, रामसेतू काळाराम मंदिर, सीतागुंफा, दुतोंड्या मारुती अशी प्रेक्षणीय आणि पौराणिक स्थाने आहेत. केवळ सिंहस्थ काळात उघडण्यात येणारे गंगा-गोदावरी माता मंदिरही रामकुंडावर आहे. याशिवाय आज नाशिक महानगरपालिकेचे चिन्ह असलेली नारोशंकर राजे बहाद्दर यांनी बांधलेली नरो सहकाराची घनता आणि रामेश्वर मंदिरही याच आवारात आहे. दुतोंड्या मारुती आणि नाशिककर यांचे एक अनोखे नाते आहे. अगदी पूर्वीपासून पावसाळ्यात पाऊस योग्य पडला याची खात्री द्यायला प्रत्येक नागरिकास दुतोंद्याची हमी हवी असते. त्याने एकदा नखशिखान्त आपल्या अंगाखांद्यावरून गोदामाईच्या पुरास जाऊ दिले म्हणजे वर्षभर पाण्याची चिंता मिटली अशी त्यामागे भावना असते.

याशिवाय नाशिकला तपोभूमीचे सामर्थ्य आहे. नाशिकच्या भूमीवर कपिलमुनींनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेला कावनाई येथे सुरुवात केली. या जागेला आज कपिलधारा असेही म्हणतात. शेगावच्या गजानन महाराजांनीदेखील कावनाई येथे बारा वर्षे तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रांच्या निस्सीम भक्त हनुमानाची जन्मभूमी अनाजानेरीची तर सानार्थ रामदासांची तपोभूमी टाकली येथील ! जिथे जीवनाचे ध्येय प्राप्त होऊन ज्ञानप्राप्ती झाली त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी श्री. निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जंगलामध्ये मिळणारे रुद्राक्षाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असणारे त्र्यंबकेश्वर म्हणजे तर महाराष्ट्राची कशी अन् नाशिकचा स्वर्ग ! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर त्र्यंबकेश्वरी आहे. याशिवाय शास्त्रांच्या ज्ञानार्जनासाठी येथे असणाऱ्या संस्कृत पाठशाला व वेदशाळांमध्ये देशभरातून विद्यार्थी येतात. गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीवरच झाला आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरच्या भूमीत, ब्रह्मगिरीच्या सावलीत पवित्र कुशावर्तात केलेले शाही स्नान जणू मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला करून देते अशी भावना आहे.

ही झाली नाशिकची पौराणिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी ! याशिवाय नाशिकला किंबहुना संपूर्ण जिल्ह्याला वीरत्वाचाही वारसा लाभला आहे. इ.स.१८५७च्या स्वातंत्र्य समरातील प्रमुख नायक तात्या टोपे यांची जन्मभूमी नाशिक जिल्ह्यातील येवल्याची. तसेच इंग्रजसरकारला आपल्या कृतीने आणि वक्तव्यांनी देशातच नव्हे तर परदेशातही पाळता भुई थोडी करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूरचा. देशभक्तीचे बीज तरुण मनांमध्ये रुजवून त्यासाठी 'अभिनव भारत' म्हणजे तत्कालीन 'मित्रमेळा'ची स्थापना इ.स.१८९९ साली झाली ती याच तपोभूमीत. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात जॅक्सनच्या वधासाठी स्वतःच्या प्राणांची अवघ्या अठराव्या वर्षी आहुती देणारे हुतात्मा अनंत कान्हेरे याच तपोभूमीवरचे एक स्वातंत्र्ययोगी होत. स्वातंत्र्य, समता, बंधुतेसाठी अविरतपणे ज्यांनी आयुष्य वेचले त्या युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला तो नाशिकच्या काळाराम मंदिरात. अनेक ज्ञात-अज्ञात सामिधांची आहुती नाशिकनगरीने स्वातंत्र्य यज्ञास अर्पण केली अन् स्वराज्यप्राप्तीच्या तपश्चर्येत आपले सामर्थ्य सिध्द केले.

नाशिक महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा जिल्हा ! इ.स.१८६९ साली जिल्हा म्हणून मान्यता पावलेले नाशिक यंदा दीडशेव्या वर्ष्हात पदार्पण करत आहे. अनेक चढ-उतार व बदल पहिले या गुलाबी थंडीच्या जिल्ह्याने या काळात! नाशिकच्या अनोख्या भौगोलिक स्थानामुळे त्याला प्रतीमहाराष्ट्र असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे नाशिकच्या पेठ-सुरगाणा आणि इगतपुरी तालुक्यांची भौगोलिकता कोकणाची आठवण करून देते. तर पश्चिम महाराष्ट्राची छबी निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण प्रतिबिंबित करतात. याशिवाय उरलेली विदर्भाची दाहकता येवला, नांदगाव, चांदवड तालुके भरून काढतात. पूर्वेस असणारे दख्खनचे पठार अन् पश्चिमेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगा नाशिकच्या साजि-या रुपाला गुलाबी थंडीची लाली चढवतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वोच्च कळसुबाई शिखर म्हणजे जणू नाशिकच्या मनाचा मुकुट ! नाशिकचा इगतपुरी तालुका याच कालासुबीच्या कुशीत वसला आहे. जागतिक कीर्तीचे 'धम्मागिरी' हे आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राचे मुख्य विश्वविद्यालय याच ठिकाणी स्थापन केलेले आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण इगतपुरीच्या पठारांवर होते. याच चित्रपट सृष्टीची भारतीयांना ज्यांनी प्रथमतः निर्मिती करून दाखवली ते चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे देखील नाशिकच्या त्र्यंबकनगरीचे सुपुत्र! आधुनिक भारताच्या प्रगतीत योगदान देणारे एक महत्वपूर्ण व्यक्ती होते दादासाहेब!

पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही नाशिकने आपली घोडदौड थांबवली नाही. देशातील आर्थिक चलनवलनासाठी वापरत येणाऱ्या नोटांचा छापखाना नाशिक येथे आहे. याशिवाय शासकीय कागदपत्रे आणि स्टँपपेपरचा कारखाना येथेच आहे. 'हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड' या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांचा निर्मिती कारखाना नाशिक्जावाल्च ओझर येथे आहे. तर देशाच्या सिमाराक्षानास्ठी लागणारा शस्त्रसाठा नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील आर्टीलरी सेंटर येथे आहे. महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणी निर्मिती नाशिक जिल्ह्यातील येवाल्यातच होते. दिवाळीत काढल्या जाणाऱ्या मोठ्या रांगोळ्या आणि संक्रांतीचा पतंगोत्सव हि येथील आणखी दोन आकर्षणे ! भारतातील पहिले मातीचे गंगापूर धरण नाशिकमध्ये असून संपूर्ण नाशिकला त्यातूनच पाणीपुरवठा होतो. याशिवाय वैतरणा येथे असणारे स्वयंचलीत जलविद्युत केंद्र देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. देशासोबतच जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यात नाशिक मागे राहिलेले नाही.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विपश्यना विश्वविद्यालयाचे मुख्य केंद्र नाशिकच्या धम्मगिरी येथे इगतपुरी तालुक्यात आहे. जगभरातून लाखो लोक दरवर्षी विपश्यनेसाठी या ठिकाणी येतात. सटाणा तालुक्यापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मांगीतुंगी येथे जैन तीर्थंकर ऋषभदेवांचा १०८ फुट उंचीचा जगातला सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आलेला असून २०१६ साली त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सर्वांपलीकडे नाशिक प्रसिद्ध आहे ते कांदा, सोयाबीन व टोमॅटोच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी; आणि त्याहीपेक्षा जास्त 'वाईन सीटी' म्हणून ओळख प्राप्त करून देणाऱ्या टपोऱ्या गोडगोड द्राक्षांसाठी ! देशाच्या आर्थिक उलाढालीत आज मोठा हिस्सा नाशिकच्या द्राक्ष आणि वाईनच्या व्यापाराचा आहे. प्रतिवर्षी दहा हजार टनांपेक्षा जास्त द्राक्ष उत्पादन होणाऱ्या नाशिकमध्ये देशातील ४६ पैकी २२ वाईनरीज स्थापन झाल्या आहेत. 'महाराष्ट्राचे कॅलीफोर्निया' म्हणून नावारूपास येणाऱ्या निफाड येथे 'विंचूर वाईन पार्क' नावाची खास वाईन निर्मितीची औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आलि आहे. इ.स.१९२५मध्ये रावसाहेब गायकवाड यांनी सुरु केलेली द्राक्षबाग लागवड आज जागतिक रूप धारण करत आहे हे जिल्ह्याच्या यशाचे द्योतकच नव्हे काय??

तर असा आहे जनस्थांच्या युरोपीय बाजारपेठेत रेशमाच्या प्रसिद्धीपासून सुरु होऊन वाईन सिटीच्या जागतिक बाजारपेठेतील अधिराज्य गाजवण्यापर्यंतचा प्रवास ! आध्यात्मिक, पौराणिक, आधुनिक अशा अनेक प्रकारच्या वारसा लाभलेल्या या नाशिकनगरीत वास्तव्याचा मोह अनेकांना आवरला नाही. म्हणूनच पुरातन काळात अनेकांनी तपोभूमी म्हणून तर आधुनिक काळात अनेकांनी कर्मभूमी म्हणून नाशिकची निवड केली. सर्वांची मनोरथ नाशिकमध्ये नक्कीच पूर्ण झाले, यातच या भूमीचे लाघवीपण सामावले आहे. नाशिकची जनस्थान म्हणून असणारी ओळख अढळ रहावी म्हणून व मराठी साहित्य क्षेत्रात योगदानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या 'जनस्थान पुरस्कार' सोहळ्याची इ.स.१९९१साली सुरुवात केली. कुसुमाग्रज हे नाशिकचा  अभिमान आहेत. आकाशातील एका ताऱ्याला त्यांच्या नावाचे वेगळे तेज आहे.

आज 'वाईन सीटी' म्हणून नवी ओळख उदयास येत असतानाच नाशिकची गुलशनाबाद ही ओळख पुसली जाऊ नये असा एक प्रयत्न यंदा जिल्ह्याच्या दीडशेव्या वर्षी झाला आहे. दुबईच्या मिराकाल गार्डनच्या धर्तीवर भारतातील पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये उभे राहिले आहे. तब्बल आठ एकरच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त नानाविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांमध्ये साकारलेले पशु, पक्षी, राईड्स, खाऊगल्ली येथे आहेत. तर अशी आहे नाशिकनगरी... मंत्राभूमिकडून यांत्राभूमिकडे जाऊन तंत्रज्ञानात प्रगती करणारी ! रुद्राक्षाच्या पवित्र्यासह द्राक्षांचा गोडवा जपणारी, सर्वांच्या स्वागतास उत्सुक असणारी ! कधी येतंय मग प्रती-महाराष्ट्राच्या गुल्शानाबादमध्ये द्राक्ष खायला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
anahita

I am surprised that these wonderful books are not yet translated in Marathi. Someone should.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to आरंभ : मार्च २०२०


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
वाड्याचे रहस्य
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
कल्पनारम्य कथा भाग १
रत्नमहाल
मृत्यूच्या घट्ट मिठीत