विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वती पूजन , अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्याMनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.